‘मुलीला तांदूळ निवडता आले पाहिजे…’, ‘या’ अभिनेत्रीने आपल्या मुलाच्या भावी पत्नीबद्दल व्यक्त केल्या अपेक्षा


रोमान्स, कॉमेडी, इमोशनल ड्रामा, प्रेम, सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत या सगळ्या गोष्टींना पूरक असणारी मालिका म्हणजे झी मराठी वरील ‘माझा होशील ना’ मालिका. या मालिकेने हाहा म्हणता केवळ एका वर्षभरात यश मिळवले. सर्वत्र या मालिकेची चर्चा असते. या सोबतच चर्चा आहे ती म्हणजे या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे कलाकार सई आणि आदित्य. ही पात्र विराजस कुलकर्णी आणि गौतमी देशपांडे निभावत आहेत. त्यांच्या प्रेम, मस्ती, रुसवे फुगवे, काळजी या गोष्टी प्रेक्षकांना प्रामुख्याने पसंत पडतात. मालिकेत आदी आणि सईचं लग्न तर थाटामाटात झाले आहे. पण विरजसचे काय??

विराजस‌ म्हणजेच आपल्या सर्वांचा लाडका आदित्य देखील लवकरच त्याच्या आयुष्यात लग्न बंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. या गोष्टीची माहिती दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वतः त्याची आई मृणाल कुलकर्णी हिने दिले आहे. खरंतर मृणाल कुलकर्णीला एवढा मोठा मुलगा आहे ही गोष्ट अद्याप अनेकांना माहीत देखील नव्हती. पण हळूहळू प्रेक्षकांना विराजस तिचा मुलगा असल्याची माहिती समजली. एकुलता एक मुलगा असल्याने घरात येणाऱ्या सूनेची देखील ओढ लागली आहे. लोकमतला दिलेल्या एका मुलाखीत तिने तिच्या सूनेबद्दल असलेल्या अपेक्षा सांगितल्या आहेत. या अटी सांगताना विराजस देखील तिथे हजर होता.

या मुलाखतीत मृणालला जेव्हा तुम्हाला होणारी सून नक्की कशी हवीये?? काही अटी आहेत का?? हे प्रश्न विचारले तेव्हा तिने सुरुवातीला अत्यंत मजेशीर उत्तर दिली. तिने सांगितले की, “सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या मुलीने मला चालून दाखवावं, म्हणजे मला कळेल तरी लंगडी वगैरे तर नाहीये ना. सोबतच तिने मला तांदूळ देखील निवडून दाखवावे. म्हणजे तांदळात खडे किती दिसतात यावरून मला तिच्या दृष्टीचा अंदाज लावता येईल. आणि हो!! एखादं गाणं पण म्हणावं.” गमतीने तिने उत्तर दिली तेव्हा तिथे असलेले सगळेच हसायला लागले.

पुढे तिने सांगितले की,” माझ्या सूनेबद्दल काहीच अपेक्षा नाहीयेत. विराजसला पूरक अशी त्याला मैत्रीण मिळावी आणि तीच मैत्रीण आमच्या घरात सून म्हणून यावी एवढीच आमची अपेक्षा आहे. हे त्याचे आयुष्य आहे आणि त्याच्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा त्याला पूर्ण अधिकार आहे. तो याबाबत जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल आणि त्यात आम्ही आनंदी असू.”

काही दिवसांपूर्वी विराजस आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे हे दोघे रिलेशनमध्ये असल्याची बातमी आली होती. त्यांचे सोशल मीडियावर देखील एकमेकांसोबत अनेक फोटो आहेत. विराजस आणि शिवानीने सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांच्या लग्नाला देखील एकत्र हजेरी लावली होती. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवानी सध्या स्टार प्रवाह वरील ‘सांग तू आहेस का ?’ या मालिकेत काम करत आहेत. ती सिद्धार्थ चांदेकर सोबत मुख्य भूमिकेत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.