झी मराठीवरील ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत अभिनय करून, अभिनेत्री तेजश्री प्रधान घराघरात पोहचली. सर्वत्र तिला मालिकेतील ‘जान्हवी’ या नावानेच ओळखले जाऊ लागले. जान्हवी सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. फोटो व व्हिडिओ शेअर करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच तिने बुधवारी (२ जून) तिचा ३३ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस झाल्यानंतर प्रथमच तेजश्रीने खास पोस्ट शेअर केली आहे, जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
तेजश्रीचे तिच्या आई वडिलांवर खूप प्रेम आहे आणि हे प्रेम ती सतत वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करत असते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिच्या आई वडिलांसोबत दिसली आहे. यामध्ये अभिनेत्रीच्या समोर एक छोटा केक आणि ओवाळणी देखील ठेवलेली आहे. या खास फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये आपल्या आई वडिलांच्या प्रती तिचे प्रेमही व्यक्त केले आहे.
फोटो शेअर करत तेजश्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लहान असताना माझा असा विश्वास होता की, तुमच्या वाढदिवसाला देवबाप्पा तुमचं सगळं ऐकतो. म्हणून माझ्या वाढदिवशी माझे आई-वडिल माझ्याजवळ असणे, हीच ईश्वराने मला दिलेली देणगी आहे, ज्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. म्हणून माझ्या वाढदिवशी मी प्रार्थना करते की, देव बाप्पा, सगळ्यांना आरोग्य दे.. सगळ्यांच्या आयुष्यात त्यांच्या माणसांचा सहवास चिरंतर राहू दे, प्रत्येकाला धैर्य दे आणि आपल्या सगळ्यांवर आलेलं हे संकट लवकर दूर कर.” या फोटोला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. शिवाय चाहते पोस्टखाली कमेंट करून, तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत.
तेजश्रीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘झेंडा’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर बऱ्याच चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले अढळ स्थान निर्माण केले. तिला खरी ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेतून मिळाली. याशिवाय ती ‘बबलू बॅचलर’ या हिंदी चित्रपटातही दिसली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-