Monday, June 17, 2024

सिनेसृष्टीत अमिताभ बच्चन यांना ५५ वर्ष पुर्ण; AI च्या अवतारात फोटो केला शेअर

बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना सिनेसृष्टीत पदार्पण करुन ५५ वर्ष पुर्ण झाले आहेत. 80 हून अधिक वय असलेले अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यातही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी AI च्या अवतारात स्वतःचा फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही माहिती दिली आहे.

अमिताभ बच्चन यांनी सिनेसृष्टीतील ५५ वर्षाच्या प्रवासामध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यानिमित्त्याने AI ने खास फोटो बनवला आहे. जो बिग बींनी सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. जो AI ने तयार केला आहे. AI तंत्रज्ञानाने बनवलेल्या या फोटोत बिग बींच्या डोक्यात कॅमेरे आणि फिल्म प्रोडक्शन मशीन भरलेली आहे. यासोबतच अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘चित्रपटाच्या या अद्भुत दुनियेत 55 वर्षे… आणिAI ने मला तपशील दिला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अमिताभ बच्चन यांच्या करिअरला सात हिंदुस्थानी या चित्रपटातून सुरुवात झाली. ख्वाजा अहमद अब्बास यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केलं होतं. सात भारतीयांच्या साहसाची ही कथा होती. ज्यांनी गोव्यातील पोर्तुगीज शासनाला नष्ट करण्यासाठी जीवाची बाजी लावली होती. या चित्रपटाला त्या काळी अनेक पुरस्कार मिळाले होते. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटामधून बॉलीवूडला त्यांचा महानायक मिळाला. त्यानंतर बिग बी यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

७० च्या दशकात जंजीर चित्रपटाने अमिताभ यांना सुपरस्टार बनवले. ‘शोले’, ‘दीवार’, काला पत्थर, अमर अकबर एंथनी, आणि ‘डॉन’ या चित्रपटांमध्ये काम करत अमिताभ यांनी चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

बिग बींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ‘कल्की एडी 2898’ हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात ते सुपरस्टार कमल हासन आणि प्रभाससोबत रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. याशिवाय दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

….म्हणून मी प्रियांका चोप्राचं नावं घेतलं नाही; बिग बॉस फेम मनाराचा मोठा खुलासा
अल्लू अर्जुनचा चाहत्यांना सुखद धक्का; पुष्पा 2 रिलीजपूर्वीच केली मोठी घोषणा

हे देखील वाचा