ऍक्शन, ड्रामा, रोमान्स, कॉमेडी सर्वच प्रकारच्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा अभिनेता म्हणजे गोविंदा. मोठ्या संघर्षाने आणि मेहनतीने गोविंदाने स्वतःचे मोठे प्रस्थ बॉलिवूडमध्ये तयार केले. गोविंदा हिंदी सिनेसृष्टीतील विनोदाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. गोविंदाचे मूळ नाव गोविंद अहुजा, आज त्याचा ५८ वा वाढदिवस साजरा करत आहे. २१ डिसेंबर १९६३ मध्ये जन्म झालेल्या गोविंदाने वयाच्या २३ व्या वर्षी ‘इलजाम’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अपयशातून शिकत यशाची अनेक शिखरे चढल्यावर गोविंदाने आज बॉलिवूडमध्ये त्याचे अढळ स्थान मिळवले. सलमान, शाहरुख, आमिर, अक्षय यांना जोरदार टक्कर देत गोविंदाने त्याकाळात त्याची वेगळी ओळख तयार केली. विनोदाचे अचूक टायमिंग, बोलण्याची, कपड्यांची हटके स्टाईल, अचूक संवादफेक आणि जबदस्त डान्स यांमुळे गोविंदाने त्याचा एक वेगळा फॅन क्लब तयार केला.
गोविंदाचा जन्म चित्रपटांशी जोडलेल्या परिवारातच झाला. गोविंदाचे वडील अरुण कुमार अहुजा एक चित्रपट निर्माता आणि अभिनेता होते. गोविंदाची आई निर्मला अहुजा ह्या शास्त्रीय गायिका आणि अभिनेत्री होत्या. गोविंदाचा मुंबईतल्या कार्टर रोड परिसरात मोठा बंगला होता. मात्र चित्रपटनिर्मितीत झालेल्या तोट्यामुळे गोविंदाच्या वडिलांनी तो बंगला विकून विरारला चाळीत राहायला सुरुवात केली. गोविंदाने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन करून नोकरीसाठी प्रयत्न केले. मुंबईतल्या प्रसिद्ध हॉटेल ताजने गोविंदा इंग्लिश बोलता येत नसल्याने नोकरी नाकारली. त्यानंतर त्यांनी चित्रपटसृष्टीत काम मिळवण्यासाठी धडपड केली. त्याआधी गोविंदाने काही जाहिरातीत काम केले होते. गोविंदाने एक मुलाखतीत सांगितले होते की, ‘मला फक्त माझ्या कलागुणांवर काम मिळत गेले. मी माझ्या आई, वडिलांच्या नावाचा कधीही उपयोग केला नाही. माझ्या आई, वडिलांनी इंडस्ट्री सोडल्यांनंतर मी इंडस्ट्रीत येईपर्यंत सुमारे ३३ वर्षाचा काळ लोटला होता. त्यामुळे मी माझ्या मेहनतीवर काम मिळवत गेलो.’
गोविंदाने १९८६ मध्ये पदार्पण केल्यानंतर जवळजवळ ४० चित्रपट साइन केले होते. गोविंदाने त्याच्या संपूर्ण करियरमध्ये १६५ चित्रपटात काम केले आहे. गोविंदा, डेव्हिड धवन आणि कदर खान हे त्रिकुट म्हणजे चित्रपटाच्या यशाची हमी समजली जायची, या तिघांनी अनेक हिट सिनेमात एकत्र काम केले. शिवाय गोविंदाने रविना टंडन आणि करिष्मा कपूर सोबत १० चित्रपटात एकत्र काम केले. गोविंदाने डबल रोल देखील केले, मात्र ‘हद कर दि आपने’ सिनेमात त्याने ६ रोल एकत्र केले होते.
आंखें, राजा बाबू, कुली नंबर १, आंदोलन, हीरो नं १, दीवाना मस्ताना, दूल्हे राजा, बड़े मियाँ छोटे मियाँ, अनाड़ी नंबर १, जोड़ी नंबर १, हसीना मान जायेगी, साजन चले ससुराल, हद कर दी आपने, पार्टनर, भागम भाग आदी सिनेमातून भूमिका साकारल्या. गोविंदाने राजकारणात देखील त्याचे नशीब आजमावले होते. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसकडून उभे राहून भाजपच्या राम नाईकांचा पराभव केला होता. मात्र काही काळाने गोविंदाने राजकारणातून काढता पाय घेतला.
हेही वाचा-