‘गोविंदा’ बॉलिवूडमधील सुपरस्टार. नुसते नाव जरी उच्चारले तरी डोळ्यासमोर त्याचा डान्स आणि अतरंगी कपडे घातलेली प्रतिकृती सर्रकन जाते. गोविंदाने त्याच्या अभिनयाने, त्याच्या कॉमेडीने आणि त्याच्या ऍक्शनने सर्वच वयातील प्रेक्षकांना भुरळ घातली. गोविंदा आणि डान्स या तर एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून आजही ओळखल्या जातात. गोविंदा जेवढा यशस्वी त्याच्या व्यावसायिक आयुष्यासाठी ओळखला जातो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टींमुळे देखील ओळखला जातो. या क्षेत्रात आल्यानंतर गोविंदाने तब्ब्ल चार वर्ष त्याचे लग्न सर्वांपासून लपवून ठेवले होते. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया हाच किस्सा.
उत्तम डान्सर, उत्तम अभिनेता असणारा अभिनेता गोविंद अहुजा याचा आज वाढदिवस. गोविंदाने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आणि स्वतःचा असा एक वेगळा प्रेक्षकवर्ग त्याने निर्माण केला. कारण त्यावेळी प्रतिस्पर्धी खूप होते. त्यामुळे अभिनयाव्यतिरिक्त इतरही कलागुण असणं आवश्यक होतं. हीच बाब गोविंदाकडे नेमकी होती. बॉलिवूड दिग्दर्शकांनी त्याला संधी दिली. गोविंदाचे चुलते आनंद सिंह हे स्वतः बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक आणि निर्माते होते. गोविंदाने ‘तन बदन’ या सिनेमामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज आपल्या सर्वांचा लाडका गोविंदा हा ५८ वर्षांचा झाला आहे. आपल्याला माहीत आहे का की गोविंदाने चार वर्षे त्याच लग्न हे जगापासून लपवून ठेवलं. त्याने असं का केलं होतं याबद्दलच आज आपण वाचूयात.
गोविंदाने २०१५ मध्ये पत्नी सुनीताशी पुन्हा एकदा लग्न केलं. हे त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितलं. वयाच्या ४९ व्या वर्षी गोविंदाने पुन्हा लग्न करावं अशी त्याची आई निर्मला देवी यांची इच्छा होती. गोविंदाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी ११ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी पत्नी सुनीता मुंजाळशी पुन्हा लग्न केले. ज्यात त्यांची मुलं टीना आहूजा आणि यशवर्धनही उपस्थित होते.
सुनीता ही गोविंदाचे काका आनंद सिंग यांची मेहुणी होती. दोघेही काही भेटीनंतरच एकमेकांवर मनापासून प्रेम करू लागले. एके दिवशी पार्टीमधून परतताना गोविंदाच्या हाताचा चुकून सुनीताच्या हाताला स्पर्श झाला परंतु त्या दोघांनीही आपला हात काही बाजूला सारला नाही आणि अशा प्रकारे दोघांनीही एकमेकांच्या प्रेमास सहमती दर्शविली. काही दिवस रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ११ डिसेंबर १९८७ रोजी गोविंदा आणि सुनीताचं लग्न झालं.
ज्या वेळी गोविंदा आणि सुनीताने लग्न केलं होतं, त्या वेळी गोविंदाची बॉलिवूडमधील कारकीर्द स्थिर नव्हती, म्हणून दोघांनीही लग्न केलं खरं परंतु ही गोष्ट संपूर्ण जगापासून लपवून ठेवली. नंतर जेव्हा गोविंदाने सर्वांना आपल्या लग्नाविषयी सांगितलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले होते.
गोविंदाने ३४ वर्षांच्या त्याच्या कारकिर्दीत कुली नंबर १, हिरो नंबर १, राजा बाबू, अखियोंसे गोली मारे, या सारखे अनेक सुपर हिट सिनेमे दिलेले आहेत. सध्याच्या घडीला गोविंदाला बॉलिवूड मध्ये हिरो नंबर १ आणि चिची या नावाने देखील ओळखलं जातं.
हेही वाचा :
अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर
नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो
लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी