×

सीमेवर लढणारा जवान अन् काळजीत असलेले कुटूंबीय, ‘भारत माझा देश आहे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

प्रत्येक भारतीय नागरिकाला आपल्या देशासाठी सिमेवर लढणाऱ्या जवानाबद्दल नेहमीच आदर वाटत आला आहे. देशासाठी आपला जीव पणाला लावणाऱ्या, घरदारस आई वडिलांची माया सोडून महिने महिने सिमेवर लढणाऱ्या प्रत्येक वीर जवानाशी प्रत्येकाचेच भावनिक नाते असते. हेच नाते आता पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. लवकरच सिनेमागृहांमध्ये पांडुरंग कृष्णा जाधव यांचा ‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर अभिनेता मनोज वाजपेयींच्या (Manoj Bajpayee) हस्ते रिलीझ करण्यात आला. यावेळी मनोज वाजपेयीने चित्रपटाच्या कथेचे कौतुक केले आहे.

‘भारत माझा देश आहे’ हा चित्रपट संपूर्णपणे सीमेवर लढणारे जवान आणि त्यांचे कुटूंबिय यांच्यामधील हळवे नाते दाखवणारा आहे. सीमेवर लढणारा जवान, त्याचे घराकडे लागून राहिलेले डोळे आणि तशीच त्याच्या घरच्यांचीही त्याच्या काळजीने मनाची झालेली घालमेल, अशी हळवी आणि अंगावर काटा आणणारी कथा या चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते रिलीज करण्यात आला. ट्रेलरमध्ये आपल्या सीमेवर लढणाऱ्या मुलाला सुरक्षित परत आणण्यासाठी, त्याची आजी त्याच्या मित्राचा बळी देण्याचा देवाला नवस करते. त्यामुळे चित्रपटाची कथा खूपच थरारक असल्याचे पाहायला मिळते.

यावेळी चित्रपटाच्या कथेचे कौतुक करताना मनोज वाजपेयीने, “अशा प्रकारचे विषय हाताळण्यासाठी खूप धाडस लागते. मनाचीही भावनिकता लागते. चित्रपटाचा विषय खूपच नाजूक असून त्याच्याशी अनेकांच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.  त्यामुळेच ट्रेलर वरुनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचबरोबर चित्रपटाचे दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांनी याबद्दल बोलताना, “हा चित्रपट देशभक्तीपर असला तरी यामधून एक सामाजिक संदेशही देण्यात आला आहे. सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट पाहण्यासारखा असून चित्रपटाचे शूटिंग कोल्हापूरमधील गावामध्ये चित्रित करण्यात आले आहे” अशी माहिती सांगितली आहे. चित्रपट ६ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post