जुबिन नौटियालला ‘इंडियन आयडल’मधून करण्यात आलं होतं रिजेक्ट; मेहनतीने जोरावर आज बनलाय सुपरस्टार


हिंदी चित्रपटांमध्ये सिनेमाच्या कथे इतकेच महत्व चित्रपटाच्या संगीताला आहे. भारतीय चित्रपटांना देखील संगीताचा मोठा वारसा आहे. संगीताशिवाय आपले सिनेमे नेहमीच अपुरे असतात. अगदी शास्त्रीय संगीतापासून ते आताच्या रॉक म्युझिक पर्यंत विविध प्रकारचे संगीत चित्रपटामध्ये ऐकायला मिळते. या संगीतासोबतच गायकाला देखील प्रचंड महत्व आहे. संगीत आणि गायक या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आपल्या सिनेसृष्टीत आतापर्यंत अनेक महान गायक होऊन गेले आहे. आताच्या काळाचे सांगायचे झाले तर अरिजित सिंग, विशाल ददलानी, बादशाह, गुरु रंधावा, हनी सिंग आदी टॉपच्या गायकांमध्ये मागच्या काही काळापासून एक नाव प्रकर्षाने घेतले जात आहे आणि ते म्हणजे जुबिन नौटियाल. आपल्या आवाजाने आणि अतिशय सुंदर गाण्यांनी तरुणाईला वेड लावणाऱ्या जुबिनचा आज वाढदिवस.

जुबिनचा जन्म १४ जून १९८९ मध्ये उत्तराखंडच्या डेहरादूनमध्ये झाला. जुबिनचे वडील रामशरण नौटियाल हे एक उद्योगपती आहेत. जुबिनच्या लहानपणापासूनच त्याच्या घरात संगीतमय वातावरण होते. घरात सर्वांना गाणी ऐकायला आवडत असल्याने जुबिन देखील गाणी ऐकतच मोठा झाला. त्याने आधिपासुनच ठरवले होते की त्याला गायक व्हायचे आहे. त्यादृष्टीने त्याने गाणे शिकायला सुरुवात केली. शाळेत असताना जुबिन अनेक संगीत वाद्य वाजवायला लागला होता. शाळेत असताना जुबिन खूप खोडकरही होता. नेहमी त्याच्या तक्रारी घरी यायच्या. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत जुबिन डेहरादूनमध्ये एक गायक म्हणून ओळखला जाऊन लागला. तो डेहरादूनमध्ये अनेक लाइव्ह शो मध्ये स्टेजवर परफॉर्मन्स द्यायचा.

जुबीनने त्याचे शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर थेट मुंबई गाठली. येथे त्याने मिठीबाई कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, सोबतच वाराणसीच्या पंडित छन्नू लाल मिश्रा यांच्याकडे गाण्याचे प्रशिक्षण घेत होता. मुंबईत आल्यानंतर जुबिनने ‘इंडियन आयडल’मध्ये सहभाग घेतला, मात्र दुर्दैवाने जुबिन तिथे निवडला गेला नाही. त्यानंतर काही काळ मुंबईत राहून जुबिन अनेक संगीत दिग्दर्शकांना भेटला. यातच त्याची भेट ए. आर. रहमान यांच्याशी झाली. रहमान यांना जुबिनचा आवाज तर आवडलाच, मात्र त्यांनी जुबिनला परत डेहरादूनला जाऊन अजून काही वर्ष रियाज करून आवाज परिपक्व करायला सांगितले. त्यांच्या सल्ल्यानुसार जुबिन पुन्हा घरी परतला. पुढे तो चेन्नईला गेला आणि तिथे काही काळ राहून त्याने गाण्याचे शिक्षण घेतले.

त्यानंतर जुबिन पुन्हा मुंबईला आला आणि त्याच्या चिकाटीमुळे त्याला २०१४ साली आलेल्या सोनाली केबल सिनेमात ‘एक मुलाकात’ हे गाणे गाण्याची संधी मिळाली. त्याचे हे पहिलेच गाणे सुपरहिट झाले. त्यानंतर जुबिनने ‘मेहरबानी’, ‘कुछ तो बता जिंदगी’, ‘बंदेया’, ‘हम्मा हम्मा’, ‘काबील हूं’, ‘ऑंख लड जावे’, ‘बावरा मन’, ‘गजब का दिन’ आदी अनेक हिट गाणी गायली. बजरंगी भाईजान सिनेमातील ‘कुछ तो बता’ हे गाणे तर त्याच्या करियरला सुखद वळणं देणारे गाणे ठरले. जुबिनने सिनेमांसोबतच अनेक अल्बम्समध्ये देखील त्याचा आवाज दिला आहे. त्याचे अनेक अल्बम यशस्वी झाले आहेत.

एका मुलाखतीवेळी जुबिनने सांगितले होते की, त्याने कधीच संघर्ष केला नाही. तो फक्त लढत होता. संघर्ष आणि पाहिजे ते मिळवणे यात खूप फरक आहे. त्यामुळे तो नेहमी सांगतो की मी संघर्ष केला नाही, तर माझे पॅशन जगत आहे, यश मिळवत आहे. अभिनयबद्दल जुबिन म्हणाला, “मला अभिनय करायला खूप भीती वाटते. माझ्या गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनय करताना देखील मी नर्वस असतो. मात्र चित्रपटांमध्ये अभिनय करणे माझ्यासाठी अवघड आहे.”

जुबिनचा जन्म आणि त्याचे बालपण डेहरादूनमध्ये गेले. लहानपणापासूनच निसर्गाच्या अगदी जवळ राहिलेला जुबिन शांतता मिळण्यासाठी नेहमी डोंगरांमध्ये जाऊन राहतो. तिथे त्याला शांती आणि समाधान मिळते. सोबतच त्याने या शांत आणि मस्त वातावरण अनेक गाणी लिहिली आणि कंपोज केली आहेत. खूप कमी लोकांना माहित असेल की, जुबिन एक राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज देखील आहे. या खेळात जुबिनला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.

एप्रिल २०२१ मध्ये जुबिनच्या नावाचा समावेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील टॉप टेन गायकांच्या यादीत झाला. या यादीत त्याने जस्टिन बीबर, बीटीएस, दुआ लीपा, टेलर स्विफ्ट. द वीकेंड आदी कलाकारांसोबत स्थान मिळवले होते. सोबतच जुबिनने त्याच्या पहिल्या ‘इनीशिएशन’ या हॉलिवूड पटासाठी ‘ब्रेक द रूल्स’ हे गाणे गायले आहे.

काही दिवसांपूर्वी जुबिनचे ‘कबिरा दोहे’ प्रदर्शित झाले आहे. याला यूट्यूबवर अतिशय कमी काळात लाखो व्ह्यूज मिळाले. हे गाणे ट्रेे्ंडिंगमध्ये देखील होते. २०२१ वर्ष जुबिनसाठी खूप महत्वाचे ठरले. या वर्षी जुबिनचे ‘तोह आ गए हम’, ‘मैं जिस दिन भुला दू’, ‘लुट गए’ आणि ‘तुझे भूलना तो चाहा’ हे म्युझिक अल्बम प्रदर्शित झाले. त्याचे हे सर्व व्हिडिओ तुफान गाजले. ‘लूट गए’ हे ६०० मिलियन व्ह्यूज मिळवणारे पहिले भारतीय गाणे ठरले आहे.

रोमँटिक गाणी गाणारा जुबिन ३२ वर्षाचा झाला असला तरी अजून लग्न करण्याचा त्याचा कोणताच विचार नाही. एका मुलाखतीत त्याने लग्नाबद्दल त्याचे विचार सांगितले. तो म्हणाला, “माझ्यासोबत कोणतीच मुलगी आनंदी राहू शकत नाही. मी वेड्यासारखा डोंगरांमध्ये फिरतो. जोपर्यंत माझी आत्मा माझ्या कामाने संतुष्ट होत नाही आणि मी स्वतः संगीत क्षेत्रात स्थिर होत नाही, तोपर्यंत लग्न करण्याचा माझा विचार नाही.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पॅशनसाठी इंजिनीयरिंगचे स्वप्न सोडून सुशांतने धरली होती अभिनयाची वाट; स्वप्नवत ठरला त्याचा अभिनय प्रवास

-सिनेसृष्टीतून गायब झालेली ‘हिना’ फेम अभिनेत्री अश्विनी भावे आता आहे तरी कुठे? असे जगतेय तिचे आयुष्य


Leave A Reply

Your email address will not be published.