Monday, April 15, 2024

‘आशिकी 2’ चित्रपटातील गाण्यांनी रातोरात प्रसिद्ध झालेल्या अरिजित सिंगचा वर्षभरात मोडला होता सुखी संसार, वाचा त्याची कहाणी

एक काळ असा येऊन गेला की, गानकोकिळा लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी यांनी आपल्या आवाजाने बॉलिवूडमध्ये सुवर्ण काळ दिला. त्यांच्या आवाजाची जादू आजही तशीच आहे. त्यानंतर 21व्या शतकात श्रेया घोषाल, अरिजित सिंग यांनी अशी काही जादू करून दाखवली की, आजची तरुण पिढी त्यांचे गाणे ऐकायला तोबा गर्दी करत असते. अरिजित सिंग एक बॉलिवूडचा असा आवाज आहे की, करोडो मुली त्याच्या आवाजावर फिदा आहेत. हा बॉलिवूडला एक असा आवाज आहे, ज्याच्या गाण्यांमुळे चित्रपटाला एक वेगळीच चमक मिळाली आहे.

अरिजितने अगदी कमी वेळातच लोकांची मने जिंकून घेतली आहे. त्याची गाणी तरुण वेड्यासारखी ऐकत असतात. त्याचे नाव गाण्यामुळे तर प्रसिद्ध झालेच. परंतु त्याचे खासगी आयुष्यही खूप गाजले आहे. चला तर मंडळी आज आपण या रोमँटिक गाण्याचा बादशाह अरिजित सिंगच्या वाढदिवशी त्याच्या प्रेमकहाणीबद्दल जाणून घेऊया…

आपल्या आवाजाने सर्वांच्या हृदयावर राज्य करणारा प्रसिद्ध गायक अरिजित सिंग आज आपला 35 वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक कलाकार असे असतात जे, अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड मेहनत घेत असतात, आणि त्यांना यश प्राप्त होत असते. मात्र, काही कलाकार त्यासाठी प्रचंड मेहनत करूनही ते बऱ्याचदा नशिबामुळे अपयशी होतात. अरिजितलाही त्यातलाच एक कलाकार म्हणावे लागेल. आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीला त्याने भरपूर परिश्रम घेतले, परंतु बरीच गाणी रेकॉर्ड करूनही ती प्रदर्शित होऊ शकली नाहीत. पण त्याने हार मानली नाही. मग एक दिवस असा आला की, ‘सावरिया’च्या गाण्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारा अरिजित सिंग ‘आशिकी 2’ चित्रपटाच्या गाण्यांनी रातोरात स्टार बनला. यातील ‘तुम ही हो’, ‘मेरी आशिकी’, ‘चाहू में या ना’, ‘भुला देना’, ‘आसान नही यहां’ यांसारखी गाणी चांगलीच गाजली.

त्याचा गायकीचा प्रवास तर सगळेच बघत आले आहेत. हे झालं त्याच्या गायकीबद्दल. पण आपण बोलत होतो त्याच्या प्रेमकहाणीबद्दल…

अरिजित सिंगच्या वैयक्तिक जीवनाबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. रोमँटिक गाण्यांचा राजा म्हणून ओळखला जाणाऱ्या अरिजितची लव्ह लाईफ रोमँटिक होते. पहिल्यांदा तो रूपरेखा बॅनर्जीच्या प्रेमात पडला, त्यानंतर दोघांचेही लग्न झाले, पण हे लग्न एक वर्षही टिकू शकले नाही.

रूपरेखा बॅनर्जी- अरिजित सिंग यांची पहिली भेट
अरिजित सिंग पार्श्वगायक होण्यापूर्वी रियॅलिटी शोमध्ये भाग घेत असत. त्याचवेळी, 2005मध्ये त्याने ‘फेम गुरुकुल’ या रियॅलिटी शोमध्ये भाग घेतला. स्पर्धक म्हणून तेथे रूपरेखा बॅनर्जीदेखील याच कार्यक्रमात होती. मग काय हे दोघेपण बंगालचे असल्याने कमी वेळातच त्यांच्यात चांगली मैत्री निर्माण झाली. त्यानंतर जे बऱ्याच जणांच्या बाबतीत मैत्रीनंतर होते, तेच या दोघांच्याही बाबतीत घडले. यांच्या गोड मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले होते. 2013मध्ये या जोडप्याने लग्नही केले. पण दुर्दैवाने त्यांचे लग्न एक वर्षही टिकले नाही आणि त्याच वर्षी अरिजित सिंग आणि रूपरेखा बॅनर्जी दोघेही वेगळे झाले होते. घटस्फोटानंतर, त्याने त्याच्या बालपणीच्या मैत्रिणीशी लग्न केले, जी एका मुलाची आई होती.

एका बालपणीच्या मैत्रिणीशीच केले दुसरे लग्न
अरिजित सिंगने आपले दुसरे लग्न एका मुलाची आई असलेल्या आपल्या बालपणीच्या मैत्रिणीशी केले होते. रूपरेखा बॅनर्जीपासून विभक्त झाल्यानंतर अरिजितने सन 2014मध्ये बालपणीची मैत्रिण कोयल रॉयशी लग्न केले. कोयल रॉयच्या पहिल्या विवाहातही सर्व काही ठीक नव्हते. या कारणास्तव, तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला होता. पहिल्या लग्नापासून कोयल हिला एक मूलही झाले होते.

दुसरे लग्न बराच काळ लपून राहिले
अरिजित सिंगने कोयल रॉय हिच्याशी केलेले लग्न बरेच काळ लपवून ठेवले होते. त्याने गुपचूप लग्न केले होते. काही काळानंतर त्याने याबाबत सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता.

बालपणीचे मित्र अरिजित- कोयल
अरिजित सिंगने एका मुलाखतीदरम्यान कोयल रॉय हिच्याशी असलेल्या संबंधाबद्दल वक्तव्य केले होते की, “आम्हा दोघांनाही चित्रपट खूप आवडायचे, दोघांनाही एकत्र पुस्तक लिहायचे होते. आम्ही आमच्या लहानपणी एकत्र अभ्यास केला आहे आणि मग एक दिवस असा आला की, कोयल हिला मी लग्नासाठी प्रपोज केले होते.” (birthday special know about arijit singh personal life and his two marriages ss)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘या’ लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शकाचे किडनी निकामी झाल्यामुळे दुःखद निधन

ब्लू टिक फ्री मिळाल्यावर फसवणूक केल्याचे जाणवत आहे बिग बींना; म्हणाले, ‘पैसे भरवा लिओ हमारा’

हे देखील वाचा