करण जोहर (karan johar) बॉलिवूडच्या मोठ्या आणि नावाजलेल्या निर्माता आणि दिग्दर्शकांपैकी एक. त्याने त्याच्या करिअरची सुरूवात ‘कुछ कुछ होता है’ (kuch kuch hota hai) या ब्लॉकबस्टर चित्रपटापासून केली होती. करणला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. करणने काही चित्रपटांमध्ये अनेक भूमिका देखील केल्या आहेत. सध्या करण चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रातही यश मिळवत आहे. आज करण जोहर त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याशी संबंधीत काही गोष्टी.
करण जोहरचा जन्म चित्रपट निर्माता यश जोहर आणि हिरू जोहर यांच्या घरी 25 मे 1972 रोजी मुंबईत झाला. करणने मुंबईतील ग्रीमलायन्स हायस्कूलमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्याने एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकोनोमिक्समध्ये शिक्षण घेतलं. करणकडे फ्रेंच भाषेतील पदवी देखील आहे.
करणने मोठे होऊन अभिनयाच्या क्षेत्रात करियर करावे अशी त्याच्या वडिलांची यश जोहर यांची खूप इच्छा होती. मात्र सुरुवातीपासूनच करणला दिग्दर्शनात खूप रस होता. वडिलांच्या इच्छेखातर करणने त्याचे शिक्षण पूर्णकरून 1989 साली टेलिव्हिजन मालिका ‘श्रीकांत’ मधून अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. करणने मालिकेसोबतच अनेक मोठ्या आणि हिट चित्रपटांमध्ये काम केले आहेत.
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, बॉम्बे वेलवेट अशा काही चित्रपटांमध्ये करणने काम केले आहे. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे सिनेमात करणने अभिनयासोबतच सहायक दिग्दर्शकाची जबाबदारी देखील सांभाळली होती. या सिनेमाच्या सेटवर शाहरुख खानने करणला स्वतःचा सिनेमा काढण्याचा सल्ला दिल्याचे देखील सांगितले जाते.
करणने 1998 साली प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान,(shahrukh khan) काजोल, (kajol) राणी मुखर्जी (rani mukharjee) यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘कुछ कुछ होता है’ सिनेमातून दिग्दर्शनात यशस्वी पदार्पण केले. या सिनेमाला त्यावर्षीचे सात फिल्मफेयर पुरस्कार मिळाले. या सिनेमानंतर करणने ‘कभी खुशी कभी गम,’ ‘कभी अलविदा न कहना,’ ‘माइ नेम इज खान,’ स्टूडेंट ऑफ द इयर,’ ‘बॉम्बे टॉकीज,’ ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘लस्ट स्टोरीज’ आदी सिनेमांचे दिग्दर्शन केले तर ‘बाहुबली’, ‘बाहुबली 2’, ‘सिम्बा’ आदी सिनेमांची निर्मिती केली आहे.
खूप कमी लोकांना माहित असेल की, करण जोहरने त्याच्या सुरुवातीच्या काळात शाहरुख खानसाठी कॉस्चुम डिझायनर म्हणून देखील काम केले आहे. यात ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल तोच पागल हैं’, ‘वीर जारा’, ‘ओम शांती ओम’, मोहब्बते’, ‘मैं हू ना’ आदी चित्रपटांचा समावेश आहे.
करण जोहरच्या चित्रपटांकडे पाहिले तर लक्षात येईल की करणच्या आधीच्या सर्व सिनेमांची नावे k (क) अक्षरापासून होत. त्याचा अंक ज्योतिषावर विश्वास आहे. मात्र जेव्हा करणने लगे राहो मुन्नाभाई सिनेमा पाहिल्यावर स्वतःची ही सवय मोडली.
करण जोहर चित्रपटांइतकाच टेलिव्हिजन क्षेत्रात देखील कार्यरत आहे. तो सुपरहिट शो ‘कॉफी विथ करण’ मध्ये सूत्रसंचालकच्या भूमिकेत दिसतो. या शो चे अनेक सिझन आले असून सर्वच सिझन सुपरहिट ठरले आहेत. सोबतच करणने आतापर्यंत ‘झलक दिखला जा’, ‘इंडियाज गॉट टॅलेंट’, ‘इंडियाज नेक्स्ट सुपरस्टार’ या रियालिटी शो मध्ये जजची भूमिका निभावली असून, त्याने अनेक पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन देखील केले आहेत.
करणची एकुण संपत्ती 200 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 1400 करोड इतकी असल्याचे एका रिपोर्टमध्ये सांगितले गेले आहे. करण एक सिनेमा दिग्दर्शित करण्यासाठी तीन करोड रुपये घेतो. करण या इंडस्ट्रीमधला सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्या सेलिब्रेटींपैकी एक आहे.
करणला गाड्यांचे खूप वेड आहे. त्याच्याकडे जॅग्वार, मर्सडीज, एस 560, बीएमडब्ल्यू अश्या अनेक गाड्या आहेत. करणला शूजची देखील खूप आवड आहे. त्याच्याकडे लुई विटॉन, स्टेला, मॅककार्टनी , डोनाटेला वर्साचे, क्रिसचीयन लुबिटॉन आदी ब्रँडचे अनेक शूज आहेत. करण जोहर हा इंडस्ट्रीमधला पहिला दिग्दर्शक आहे ज्याचा मादाम तुसाद मध्ये पुतळा आहे.
करणला त्याच्या सेक्शुअल लाईफवरुन ट्रोल करण्यात आले आहे. त्यामुळेच त्याने ‘एन अनसुटेबल बॉय’ या नावाने बायोग्राफी लिहीली असून या बायोग्राफीमध्ये त्याने त्याच्या सेक्शुअल लाइफवर मोकळेपणाने लिहिले आहे. करण जोहरने आपल्या बायोग्राफीमध्ये शाहरुख खानसोबतच्या मैत्रीवर एक चॅप्टर सुद्धा आहे. यामध्ये तो शाहरुख आणि त्याच्या नात्याविषयी तो भरभरून बोलला आहे.
करणने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने त्याच्या वयाच्या 26व्या वर्षी त्याची व्हर्जिनिटी गमावली होती. ‘कुछ कुछ होता है’ सिनेमानंतरची ही घटना असल्याचे त्याने सांगितले होते. त्या मुलाखतीमध्ये करण म्हणाला होता की, तो त्याच्या शरीराबद्दल आनंदी नव्हता आणि जेव्हा त्याचा शरीराबद्दलचा आत्मविश्वास वाढला तोपर्यंत खूप काळ निघून गेला होता. त्याचे शरीर जाड असल्याने त्याला ते आवडत नव्हते. तो कोणालाच आकर्षक वाटत नव्हता असे त्याला वाटायचे. म्हणूनच त्याने जेव्हा पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तो समोरच्या व्यक्तीला ‘थँक्यू’ सुद्धा म्हणाला होता.
करण सरोगसीचा माध्यमातून यश जोहर आणि ऋषी जोहर या दोन मुलांचा बाबा झाला आहे.
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर करणवर नेपोटीझमचे खूप आरोप झाले. इंडस्ट्रीमधल्या अनेक लोकांनी आणि प्रेक्षकांनी देखील त्याच्यावर हे आरोप केले होते.(birthday special karan johar unknown facts)