Sunday, May 19, 2024

ऐंशीच्या दशकात केली होती करियरची दमदार सुरूवात; आता ‘पिंकी बुआ’ बनुन उपासना सिंग करतात प्रेक्षकांना लोटपोट

चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या करियरमध्ये जास्त मुख्य भूमिका निभावल्या नाहीत. मात्र त्यांची लोकप्रियता, त्यांचा अनुभव, त्यांच्यातली प्रतिभा ही मुख्य कलाकारांच्या तोडीस तोडच असते. अशीच एक अभिनेत्री म्हणजे उपासना सिंग. तुमच्या सर्वांच्याच लाडक्या कपिल शर्माच्या शो मधील ‘पिंकी बुवा’. लग्नासाठी उतावळी झालेली ही बुवा कपिलच्या शो मध्ये सर्वात जास्त भाव खाऊन गेली. आज (29 जून) गुरूवारी याच बुवाचा म्हणजेच उपासना सिंग यांचा वाढदिवस.

उपासना यांचा जन्म 29 जून 1975साली पंजाबच्या होशियारपूरमध्ये  झाला. इथूनच त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे पंजाब विद्यापीठातून त्यांनी ड्रामामध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. उपासना यांनी त्यांच्या करियरची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्या सात वर्षांच्या असताना त्यांनी दूरदर्शनवर कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. 1986साली आलेल्या ‘बाबूल’ सिनेमातून त्यांनी त्यांच्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली.

उपासना यांनी हिंदीसोबतच पंजाबी, राजस्थानी, भोजपुरी, गुजराती आदी अनेक प्रादेशिक भाषांमध्ये देखील काम केले. त्यांनी जवळपास 100 पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये काम करत असतानाच त्यांनी मालिकांमध्ये देखील काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्टार प्लसच्या ‘सोन परी’ मालिकेत साकारलेली नकारात्मक भूमिका खूप गाजली आणि त्यांना घराघरात ओळख मिळवून दिली. या मालिकेसोबतच त्यांनी ‘मायका’, ‘फिर भी दिल है हिंदुस्थानी’, ‘ढाबा जंक्शन’, ‘राजा की आयेगी बारात’, ‘मै कब सास बनूंगी’ आदी अनेक मालिकेत काम केले. त्यानंतर त्यांनी ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शो मध्ये कपिलच्या बुवाची भूमिका साकारली आणि उपासना यांच्या लोकप्रियतेत अमाप वाढ झाली.

उपासना यांनी अनिल कपूर, श्रीदेवी, उर्मिला मातोंडकर यांच्या ‘जुदाई’ या सिनेमात एक छोटी मात्र मजेशीर भूमिका साकारली होती. या सिनेमात त्यांना फक्त एकच संवाद होता. त्याचा संवादाने त्या संपूर्ण चित्रपटात गाजल्या आणि तो संवाद होता. ‘अब्बा, डब्बा, चब्बा’. ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी याच संवादामुळे त्या खूप हिट झाल्या आणि हे वाक्य देखील खूप गाजले. या सिनेमासोबतच त्यांनी ‘डर’, ‘लोफर’, ‘वेडिंग पुलाव’, ‘इश्क-विश्क’, ‘हंगामा’, ‘हलचल’, ‘एतराज’,‘जुड़वा-२’, ‘मै प्रेम की दिवानी हूं’, ‘मुझसे शादी करोगे’ आदी अनेक विविध भाषांमधील चित्रपटात काम केले.

उपासना यांच्या भूमिका पाहिल्या तर खूप सध्या आणि सोज्वळ रूपातच प्रेक्षकांसमोर आल्या. मात्र त्या खऱ्या आयुष्यात बऱ्याच बोल्ड होत्या. त्यांचे अनेक बोल्ड आणि ब्युटीफुल फोटो सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले होते. त्या नेहमी त्यांचे बोल्ड आणि सिम्पल लुक अतिशय आत्मविश्वासाने सादर करायच्या. त्याच्या आवाजामध्ये असणारा भारदस्तपणा, बोलताना आवाजात जाणवणारा पंजाबी टच आदी अनेक गोष्टी त्यांची आठवण बनल्या आहेत.

उपासना यांच्याबद्दल एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. किस्सा म्हणण्यापेक्षा एक भयानक घटना खूपच प्रसिद्ध आहे. एकदा उपासना दुसऱ्या शहरात शूटिंग करत असताना, त्यांचे रात्रीचे पॅकअप उशिरा झाले. त्यांनी रात्री उशिरा हॉटेलवर जाण्यासाठी त्यांच्या गाडीतून प्रवास सुरु केला. मात्र काही काळाने त्यांच्या ड्रॉयव्हरने त्यांना एका चुकीच्या रस्त्याने शांत रस्त्यावर नेले. मात्र आधीच पुढची गंभीरता ओळखून उपासना यांनी पोलिस कंट्रोल रूमला फोन केला होता. त्यानंतर त्या या घटनेमुळे बऱ्याच घाबरलेल्या होत्या.

उपासना यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी अभिनेता नीरज भारद्वाजसोबत 2009 मध्ये लग्न केले. या दोघांची पहिले भेट ‘ए दिल ए नादान’ मालिकेच्या सेटवर झाली होती. मध्ये या दोघांमध्ये काही अलबेल नसल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र त्या दोघांनी आपसी समजुतीने त्यांच्यातल्या सर्व समस्या सोडवल्या आणि आता ते त्यांचे आनंदी जीवन जगत आहेत. या दोघांना ‘नानक’ नावाचा एक मुलगा सुद्धा आहे.

उपासना यांनी आजपर्यंत अनेक कलाकृतींमधून त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर दाखवली. त्यांची लोकप्रियता देखील खूप आहे. उपासना यांच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले, तर त्यांचे नेटवर्थ 5 मिलियन डॉलर आहे. त्या एका भागासाठी 5 लाख रुपये चार्ज करतात.

अधिक वाचा- 
 –रवी किशनची लेक बनली’अग्निवीर’, अनुपम खेर कौतुकाचा वर्षाव करत म्हणाले, ‘तिचे हे पाऊल…’
समीर चौघुलेंसाठी प्राजक्ता माळीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, “तुझ्यामुळेच मी…”

हे देखील वाचा