Thursday, April 18, 2024

वाढदिवस खास : अमृताच्या सुंदर आणि निरागस चेहऱ्यावर भाळले होते चित्रकार एम.एफ.हुसेन; बराच रंजक आहे तो किस्सा

सध्या हिंदी चित्रपट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, जवळपास सर्वच सिनेमांमध्ये बोल्ड आणि इंटिमेट सीन्सचा भरणा असतो. असे सीन म्हणजे चित्रपट यशस्वी होण्यासाठी जणू एक साधा उपायच झाला आहे. स्क्रिप्टची डिमांड या दोन शब्दांचा आधार घेऊन असे सीन चित्रपटांमध्ये सर्रास ठेवले जातात. मात्र यातही अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी यश मिळवण्यासाठी अशा सीन्सचा वापर करून घेतला नाही. तरीही त्या अभिनेत्रींनी नाव आणि यश कमावले आहेत.

अशाच अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे अमृता राव. सुंदर, निरागस, सोजवळ असे रूप असलेली अमृता जरी मागच्या काही काळापासून मोठ्या पडद्यापासून लांब असली तरी प्रेक्षकांसाठी ती अनोळखी नाही. अमृताने तिच्या सहज आणि प्रभावी अभिनयाने रसिकांना तिची दाखल घेण्यास भाग पाडले. आज अमृता तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ;तिचा जन्म ७ जून १९८१ ला मुंबईमध्ये झाला. तिचे संपूर्ण बालपण मुंबईतच गेले. अतिशय सामान्य आणि मध्यमवर्गीय अशा कोंकणी कुटुंबातून आलेल्या अमृताने स्वबळावर आणि मेहनतीवर या ग्लॅमर संक्षेत्रात तिचे स्थान आणि नाव तयार केले. आज अमृता तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबाबद्दल काही खास गोष्टी.

अमृता कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंग करत होती. यादरम्यान तिने अनेक जाहिरातींमध्ये काम केले. ती सर्वात पहिल्यांदा अलिशा चिनॉयच्या ‘वोह प्यार मेरा’ या अल्बममध्ये दिसली. तिचा पहिला सिनेमा होता राज कंवरचा २००२ मध्ये आलेला थ्रिलर ड्रम ‘अब के बरस’. याच वर्षी ती ‘द लेजेंड ऑफ भगतसिंग’ सिनेमातही दिसली. मात्र तिला खरी ओळख मिळाली ती २००३ मध्ये आलेल्या ‘इश्क विष्क’ चित्रपटाने. शाहिद कपूर आणि अमृता राव यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रोमॅंटिक सिनेमा होता. सिनेमासोबतच यातील गाणी देखील तुफान गाजली. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला आयफा, स्टारकास्ट आणि फिल्मफेयर आदी पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

पुढे तिने ‘वाह! लाइफ हो तो ऐसी’, ‘मैं हू ना’, ‘शिखर’, ‘लाइफ पार्टनर’, ‘सत्याग्रह’, ‘प्यारे मोहन’, ‘व्हिक्टरी’, ‘वेलकम टू सज्जनपूर’, ‘जॉली एल.एल. बी.’ अशा हिट आणि दमदार सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या. २००६ साली आलेल्या राजश्री प्रॉडक्शनच्या ‘विवाह’ सिनेमात अमृताने साकारलेली ‘पूनम’ प्रचंड गाजली. अतिशय साधी आणि संस्कारी पूनम अमृताने हुबेहूब पडद्यावर उभी केली. हा सिनेमा मिळवण्यासाठी तिने तब्बल चार तास मुलाखत दिली होती. सुरज बडजात्या यांनी तिच्याकडून मुन्शी प्रेमचंद यांचे एक पुस्तक वाचून घेतले होते, त्यामुळे त्यांना अमृताची हिंदी भाषेवरील पकड लक्षात आली. या सिनेमाने तिच्या लोकप्रियतेत आणि प्रसिद्धीमध्ये अधिक भर घातली.

प्रसिद्ध चित्रकार मकबूल फिदा हुसेन म्हणजेच एम.एफ.हुसेन यांना देखील अमृताच्या सौंदर्याने आणि निरागसतेने भुरळ घातली होती. अभिनेत्रींपैकी माधुरीला दीक्षितला कॅनवासवर उतरावल्यानंतर हुसेन साहेबांनी अमृताला देखील कॅनवासवर उतरवले. जेव्हा हुसेन साहेबांनी ही गोष्ट अमृताला सांगितली तेव्हा ती हे ऐकून स्तब्धच झाली होती. एका मुलाखतीमध्ये अमृता याबद्दल म्हणाली होती की, ” मला जेव्हा समजले की हुसेन सर माझे पेंटिंग काढू इच्छित तेव्हा मला विश्वासच बसला नाही. त्यांनी मला सांगितले होते की, माधुरी दीक्षित नंतर तुझा चेहरा मला सर्वात जास्त आकर्षक वाटला. ही कॉम्प्लिमेंट कधीही न विसरण्यासारखी आहे.”

अमृताबद्दल अजून एक किस्सा असा प्रसिद्ध आहे की, तिला रणबीर कपूरसोबत एका सिनेमासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र सिनेमात किसिंग सीन असल्याने तिने नकार दिला. सोबतच निर्मात्यांना विनंती केली की, जर हा सीन तुम्ही रद्द केला तर मी हा सिनेमा करेल. मात्र असे न झाल्याने तिने सिनेमा करण्यास नकार दिला होता.

अमृता शेवटची बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर तयार झालेल्या ‘ठाकरे’ या सिनेमात दिसली होती. यात तिने बाळासाहेबांच्या पत्नीची मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली होती. हा सिनेमा २०१९ साली प्रदर्शित झाला होता. यात तिच्या सोबत नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होता. अमृताने २०१६ साली ‘मेरी आवाज ही पहचान है’ या मालिकेतून कल्याणीची भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पदार्पण केले. सोबतच तिने दाक्षिणात्य सिनेसृष्टीही काम केले असून अनेक हिट सिनेमे दिले आहेत.

अमृताच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तिने २०१६ साली रेडिओ जॉकी असणाऱ्या आर. जे. अनमोलशी लग्न केले. नोव्हेंबर २०२० मध्ये ती एका मुलाची आई झाली असून सध्या ती तिचे मदरहूड एन्जॉय करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा