Thursday, September 28, 2023

एकेकाळी संजय दत्तवर प्रेम करायची माधुरी दीक्षित; मात्र अभिनेता जेल गेल्यानंतर बदललं सर्वकाही; असा होता ‘संजुबाबा’चा प्रवास

सामान्य माणूस असला काय आणि सेलिब्रिटी असले काय चुका सर्वांकडूनच होतात. मात्र आपल्या चुका मान्य करणे आणि त्यासाठी योग्य ती शिक्षा भोगणे नेहमीच महत्वाचे असते. कलाकार आहेत म्हणजे त्यांच्याकडून चुका होणारच नाही असे बिलकुल नाही. किंबहुना कलाकार असल्यामुळेच त्यांच्या छोट्यातल्या छोट्या चुका देखील लवकरच सर्वांसमोर येतात. मनोरंजन क्षेत्रात पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, असे अनेक कलाकार आहेत ज्यांचे व्यायसायिक आणि वैयक्तिक असे दोन्ही आयुष्य तुफान गाजले. वैयक्तिक आयुष्यातील चुकांचा परिणाम नक्कीच कलाकारांच्या व्यासायिक आयुष्यावर झाला, मात्र काही मर्यादित काळासाठीच.

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार असे आहेत, जे यशाच्या शिखरावर नक्कीच आहे, ज्यांना तुफान लोकप्रियता आहे, मात्र तरीही त्यांच्या जीवनावर त्याच्या आयुष्यावर एक डाग आहे. या इंडस्ट्रीमध्ये एक असा अभिनेता आहे, जो फॅन्सच्या मनावर नक्कीच राज्य करतो पण त्याचे आयुष्य एक खूप मोठी ट्रॅजिडी होती. तो अभिनेता आहे संजय दत्त. (sanjay dutt) संजय दत्तचे नाव घेतले की लोकांच्या डोळ्यासमोरून संजयच्या आकृतीसोबत त्याचे हिट सिनेमे आणि त्याच्यासोबत घडलेल्या सर्व वाईट घटना सर्रकन डोळ्यासमोरून जातात. बॉलिवूडचा हा संजू बाबा 29 जुलैला त्याच्या 64 वा वाढदिवस साजरा करत आहे.

संजयचा जन्म 29 जुलै 1959 रोजी मुंबईत झाला. त्याला शिकण्यासाठी बोर्डिंग स्कुलमध्ये पाठवण्यात आले. संजयचे वडील हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज आणि लोकप्रिय अभिनेते सुनील दत्त तर सिनेसृष्टीतील दिवा असणाऱ्या अभिनेत्री नर्गिस या त्याच्या आई होत्या. आई वडील दोघेही मोठे कलाकार असल्याने घरात संपूर्ण चित्रपटमय वातावरण होते. संजयला प्रिया दत्त आणि नम्रता दत्त या दोन बहिणी आहेत. संजयने बालकलाकार म्हणून 1952 साली आलेल्या ‘रेशमा और शेरा’ सिनेमात काम केले.

त्यानंतर 1981साली त्याने ‘रॉकी’ चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून अभिनयात एन्ट्री केली. हा सिनेमा सुनील दत्त यांनीच दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा तुफान गाजला. सोबतच सिनेमातील गाणी देखील खूप हिट झाली. मात्र दुरदैवाने हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या काहीच दिवस आधीच नर्गिस दत्त यांचे कॅन्सरमुळे निधन झाले. मात्र ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणत संजयच्या पहिल्या सिनेमाचा प्रीमियर थाटात पार पडला. त्यानंतर संजयने अभिनयात हळूहळू त्याचा जम बसवायला सुरुवात केली. नशिबाने संजयला खूप चांगले यश मिळत गेले. एकीकडे संजयचे व्यावसायिक आयुष्य खूपच छान सुरु असताना, वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच काय काय घडायला सुरुवात झाली.

बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यापासूनच संजय अंमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडला. मात्र ही गोष्ट नर्गिस दत्त यांच्या निधनानंतर सुनील दत्त यांच्यासमोर आली. नर्गिस यांना संजयच्या या सवयींबद्दल माहिती होती. पण मुलाबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी सुनील यांच्यापासून ही गोष्टी लपवली. नर्गिस यांच्या मृत्यूनंतर संजयला मोठा धक्का बसला. याचवेळी सुनील दत्त यांना संजयच्या ड्रग्सच्या सवयींबद्दल समजले. त्यानंतर सुनील दत्त यांनी त्याला या व्यसनापासून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील एका पुनर्वसन केंद्रात पाठवले. तिथे अनेक महिने उपचार घेतल्यानंतर संजय पूर्णपणे बरा होऊन भारतात आला.

त्यानंतर त्याचे फिल्मी करिअर पुन्हा व्यवस्थित सुरु झाले. सर्व सुरळीत असताना 12 मार्च 1993रोजी मुंबईत बॉम्बब्लास्ट झाले. यात 257लोकांचा मृत्य झाला आणि असंख्य लोकं जखमी झाले. या बॉम्बब्लास्टमध्ये काही हत्यारांपैकीच एक 47 ही रायफल संजय दत्तकडे सापडली आणि 19 एप्रिल 1993ला त्याला बॉम्बब्लास्टमधील संशयित म्हणून अटक करण्यात आली. त्यानंतर 5 मे रोजी तो जामिनावर बाहेर आला. यादरम्यान झालेल्या पोलीस चौकशीमध्ये त्याने त्याचा गुन्हा मान्य केला. जुलै 1994 मध्ये त्याच जामीन रद्द झाला आणि त्याला पुन्हा जेलमध्ये जावे लागले. या केससाठी त्याला अनेकदा जेलची हवा खावी लागली. मात्र 2007साली त्याला आर्म्स ऍक्टच्या अंतर्गत शस्त्र बाळगल्याप्रकरणी 6 वर्षांची शिक्षा झाली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने 2013साली त्याची शिक्षा 5 वर्ष केली आणि त्याची रवानगी जेलमध्ये अली. त्याच्या चांगल्या वर्तवणुकीमुळे त्याला 8 महिन्यांची शिक्षा कमी करून 2016 फेब्रुवारीमध्ये मुक्त करण्यात आले.

संजयने 1987 साली अभिनेत्री रिचा शर्माशी लग्न केले. रिचा शर्मादेखील बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. 1987 ‘आग आग’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना संजयने तिला लग्नासाठी विचारले. रिचाने होकार दिल्यानंतर 1987 मध्येच या दोघांनी लग्न केले. त्यानंतर त्यांना त्रिशाला ही मुलगी झाली. मात्र काही वर्षांनी रिचाला ब्रेन ट्यूमर हा आजार असल्याचे निदान झाले. रिचा ब्रेन ट्युमरशी सामना करत असताना संजय आणि माधुरी दीक्षितच्या अफेअर्सच्या चर्चांनी जोर धरला. त्यामुळे रिचा आणि संजयच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. 10 डिसेंबर 1996ला रिचाचे निधन झाले.

‘साजन’ चित्रपटाच्या सेटवर हे दोघं एकमेकांच्या जास्त जवळ आले. चित्रपटाचे चित्रीकरण एका मोकळ्या जागी सुरु होते. तिथे संजय आणि माधुरीला एकमेकांसोबत घालवायला खूप वेळ मिळाला होता. या फावला वेळात दोघे एकमेकांसोबतच राहत होते. या चित्रपटात त्यांची केमिस्ट्री देखील उत्तम दिसली. त्यानंतरच दोघांमध्ये काही तरी सुरु असल्याची चर्चा व्हायला लागल्या. मात्र संजय तेव्हा विवाहित असल्यामुळे संजय आणि माधुरीच्या घरून या नात्याला जोरदार विरोध झाला. पण जेव्हा संजय मुंबई बॉम्बब्लास्ट केसमध्ये अडकला, तेव्हा माधुरीने त्याच्यापासून दूर राहणेच पसंत केले आणि त्यांचे नाते संपले.

त्यानंतर संजयचे नाव बऱ्याच मुलींसोबत जोडले गेले. अगदी संजयच्या ‘संजू’ चित्रपटाच्या संवादावरून सांगायचे झाले तर, 300 पेक्षा अधिक मुलींसोबत त्याचे अफेअर्स होते. ज्यात रेखा, तीन मुनीम, माधुरी, किमी काटकर, सुश्मिता सेन आदी अनेक बॉलिवूड अभिनेत्रींचा समावेश होता.

संजयने 1998मध्ये रिया पिल्लईशी लग्न केले. पण लग्नानंतर काही दिवसांतच सुश्मिता आणि संजयच्या अफेअर्सच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या होत्या. काही रिपोर्ट्सनुसार एका स्टेज शोनंतर संजय दत्त कुठेतरी बाहेर निघून गेला. त्याचवेळी पत्नी रिया त्याचा पाठलाग करत हॉटेलवर पोहोचली होती आणि तिने संजयला सुश्मितासोबत रंगेहात पकडले. त्यानंतर संजय आणि रिया या दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाला आणि त्यांनी 2008 साली घटस्फोट घेतला. या घटस्फोटानंतर संजयने मान्यता दत्तसोबत लग्न केले. 2010 साली मान्यताने शहरान आणि इकरा या जुळ्या मुलांना जन्म दिला.

संजय दत्तचा अतिशय गाजलेला सिनेमा म्हणजे ‘खलनायक’. मात्र या सिनेमात सुभाष घई यांना संजय ऐवजी दुसरा अभिनेता पाहिजे होता. या सिनेमात जॅकी श्रॉफ आणि माधुरीची भूमिका आधीच ठरल्या होत्या. सुभाष घई यांना संजय दत्तने साकारलेल्या बल्लू या भूमिकेसाठी संजय नाही, तर नाना पाटेकर पाहिजे होते. त्यांना जॅकी आणि नाना पाटेकर अशी जोडी खलनायकमध्ये घ्यायची होती. पण काही कारणास्तव ते शक्य झाले नाही आणि नंतर संजय दत्तने ही भूमिका साकारली.

सन 2020 मध्ये संजय दत्तला स्टेज 2चा फुफ्फुसाचा कर्करोग असल्याचे निदान झाले. संजयला एडेनोकार्सिनोमा नावाच्या कर्करोगाने ग्रस्त होता. मात्र उपचारानंतर आता तो पुर्णपणे बरा झाला आहे.

संजयच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले तर तो दरमहिन्याला 1 कोटीपेक्षा अधिक रुपये कमवतो. त्याच्याकडे 150कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडे एकापेक्षा एक आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यात Red Ferrari 599 GTB, Rolls-Royce Ghost, Audi A8 L W12, Audi R8, Audi Q7, Bentley Continental GT, Toyota Land Cruiser, a Mercedes M-class, Lexus LX470, Porsche SUV, Harley – Davidson Ducati अशा मोठ्या गाड्या आहेत. शिवाय संजय दत्तकडे त्याचे राहते घर असून, त्याची किंमत 7/8कोटी असल्याचे सांगितले जाते. शिवाय तो एका सिनेमासाठी 6/7कोटी रुपये घेतो.

आगामी काळात संजय ‘केजीएफ’, ‘शमशेरा’,’पृथ्वीराज’, ‘भुज’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

अधिक वाचा-
संजय दत्तला स्वत:ची मुलगीच म्हणू लागली होती ‘काका’, ‘या’ गोष्टीमुळे चिंतेत पडला होता अभिनेता
कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव

हे देखील वाचा