बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांच्यात प्रतिभा तर नक्कीच आहे, मात्र एखाद्या चुकीमुळे त्यांच्या संपूर्ण करियरवर त्याचा चुकीचा परिणाम झाला आणि त्यांचे करियर संपूर्णपणे बदलले. चूक कोणतीही असो, कोणाचीही असो पण त्याची मोठी शिक्षा कलाकरांना खूप महागात पडली. असाच एक अभिनेता म्हणजे विवेक ओबेरॉय. विवेक आज जरी बॉलिवूडमध्ये स्थिर स्थावर झाला असला, तरी तो जेव्हा अभिनेता म्हणून या क्षेत्रात आला तेव्हा त्याला जी लोकप्रियता मिळाली ती आता राहिली नाही. जेव्हा विवेक इंडस्ट्रीमध्ये आला तेव्हा त्याच्याकडे एक सुपरस्टार म्हणून पाहिले जात होते. मात्र मधेच काहीतरी झाले आणि सुपरस्टार होणार विवेक एक अभिनेता एवढीच ओळख मिळवू शकला. आज (३ सप्टेंबर) विवेक त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्याच्याबद्दल अधिक माहिती.
विवेकचा जन्म ३ सप्टेंबर १९७६ मध्ये हैदराबाद येथे झाला. त्याचे वडील सुरेश ओबेरॉय हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते. त्यांच्या आईचे नाव यशोधरा ओबेरॉय आहे. विवेकने आपले प्राथमिक शिक्षण हैदराबाद पब्लिक स्कूल, हैदराबाद येथून केले. फिल्मी कुटुंबातील असल्याने त्यांना अभिनयातही रस होता. यामुळे अभिनयाचे बारकावे जाणून घेण्यासाठी तो न्यूयॉर्कला गेला. पुढे विवेकने देखील चित्रपटांमध्ये येण्याचा निर्णय घेतला.
विवेक ओबेरॉयने राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. विवेकने बॉलिवूडमध्ये पदार्पण करुन १९ वर्षे पूर्ण केले. या १९ वर्षांच्या कारकिर्दीत विवेकने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक चाहत्यांची मने जिंकत ‘साथिया’, ‘मस्ती’, ‘युवा’, ‘शूटआउट ऍट लोखंडवाला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला.
विवेक त्याच्या चित्रपटांपेक्षा जास्त गाजला सलमान खानसोबतच्या त्याच्या वादांमुळे, आणि ऐश्वर्या रायसोबतच्या त्याच्या अफेयरमुळे. ऐश्वर्या रायचे सलमान खानसोबत अफेयर होते. मात्र त्यांच्या होणाऱ्या वादांमुळे आणि सलमान खानच्या पझेसिव्हनेसमुळे हे नाते संपुष्टात आले. या ब्रेकमुळे खचलेल्या ऐश्वर्याला विवेकने मानसिक आधार दिला. यादरम्यान हे दोघं जवळ आले आणि त्यांच्यात प्रेम फुलले. पुढे त्यांनी ‘क्यूं हो गया ना’ चित्रपटात एकत्र काम केले. विवेकने ऐश्वर्याला पाठिंबा देण्याच्या प्रयत्नात चूक केली, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीवर वाईट परिणाम झाला. ऐश्वर्या आणि विवेकची जवळीक आणि त्यांच्या बातम्या सलमानला खटकू लागल्या.
यातच विवेक च्या हातून एक चूक घडली आणि त्याने एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद बोलवत सलमान खानकडून त्याला फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे सांगितले. सलमानने त्याला अनेक वेळा फोन केल्याचेही तो यावेळी म्हणाला. या पत्रकार परिषदेत त्याने सलमानवर अनेक मोठे आणि गंभीर आरोप केले. हे आरोप किती सत्य होते याबद्दल आजही अनेकांना शंका आहे. मात्र या सर्व प्रकारानंतर निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटात विवेकला काम देण्यास टाळाटाळ करायला सुरुवात केली. अनेक सिनेमे विवेकच्या हातातून निसटून गेले. विवेकने हे सर्व ऐश्वर्यासाठी केले होते. तरीही ऐश्वर्याने विवेक यांची साथ सोडली.
त्यावेळी सलमान खान एक मोठा स्टार होता, तर विवेक हा चित्रपट क्षेत्रात नवीन होता. यानंतर, विवेकने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी’ चा बायोपिक बनवून आपली कारकीर्द पुन्हा नव्याने सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. त्याने चित्रपटांची निर्मिती करण्यास सुरू केली आहे. तो टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीला बॉलिवूडमध्ये ‘रोजी द सॅफरॉन चॅप्टर’ या चित्रपटाद्वारे लॉन्च करणार आहे. चित्रपटाची निर्मिती विवेक ओबेरॉय, मेगा एंटरटेनमेंट, मंदिरा एंटरटेनमेंट आणि प्रेरणा व्ही अरोरा हे मिळून करत आहेत.
पुढे विवेक ओबेरॉयने प्रियांका अल्वाशी लग्न केले. प्रियांका ही कर्नाटकचे मंत्री जीवराज अल्वा यांची मुलगी आहे. त्यांना दोन मुले आहेत, एक मुलगा विवान ओबेरॉय आणि मुलगी अमाया निर्वाण ओबेरॉय.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘शूट आऊट ऍट वडाला’च्या डायरेक्टरने खाल्ली होती विवेक ओबेरॉयसोबत काम न करण्याची शपथ
केवळ चित्रपटांनी नाही तर टेलिव्हिजननेही मनोज जोशी यांना दिली ओळख, विनोदी पात्राने मिळवले नाव
ब्लेड अन् दगडांच्या ड्रेसनंतर अभिनेत्रीने शरीर झाकण्यासाठी वापरली फुलं, चालता चालता गेला तोल अन्…