Friday, April 26, 2024

सहाव्या वर्षीच केला होता पहिला सिनेमा, कॅन्सर आजाराने घेतला होता ‘या’ अभिनेत्रीचा जीव

चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी आपल्या प्रतिभेने लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आणि नंतर अचानक या जगाला निरोप देत निघून गेले. अश्याच एक सुप्रसिद्ध अभिनेत्री आहेत नर्गिस दत्त. नर्गिस दत्त अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत, ज्यांनी अल्पावधीतच आपली एक वेगळी आणि मजबूत ओळख निर्माण केली. या ओळखीने त्यांनी यशाची उच्च उंची गाठली. परंतु नर्गिस अगदी कमी वयातच कॅन्सरसारख्या प्राणघातक रोगाचा बळी ठरल्या होत्या. यामुळे त्यांनी ३ मे १९८१ रोजी, अखेरचा श्वास घेतला. त्यांची पुण्यतिथी दरवर्षी या दिवशी साजरी केली जाते. परंतु नर्गिसचे खरे नाव काय होते, हे तुम्हाला माहिती आहे का?

नर्गिस यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात अगदी लहान वयापासूनच केली होती. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांचीच मन जिंकली. नर्गिसचे खरे नाव फर्गिमा राशिद असे होते. त्यांचा जन्म १ जून १९२९ रोजी, पश्चिम बंगालच्या कलकत्ता शहरात झाला होता. नर्गिसचे वडील उत्तमचंद मोहनदास एक डॉक्टर होते. त्यांची आई जद्दनबाई एक प्रसिद्ध नर्तकी आणि गायिका होत्या. नर्गिसने आपल्या आईच्या मदतीने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि आपल्या कारकिर्दीची सुरूवात ‘तलाश-ए-हक’ या चित्रपटाने केली, ज्यात त्यांनी बाल कलाकार म्हणून काम केले होते.

पहिल्या चित्रपटाच्या वेळी नर्गिस फक्त ६ वर्षांच्या होत्या. या चित्रपटानंतर त्या ‘बेबी नर्गिस’ म्हणून प्रसिद्ध झाल्या. पुढे त्यांनी अनेक चित्रपट केले. नर्गिसच्या अभिनयाची जादू अशी होती की, १९६८ मध्ये जेव्हा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पहिला फिल्मफेअर पुरस्कार देण्याची वेळ आली, तेव्हा यासाठी त्यांची निवड झाली. तसेच राज्यसभेसाठी नामांकित होणाऱ्या त्या पहिल्या अभिनेत्रीही होत्या. याशिवाय पद्मश्री पुरस्कार मिळविणाऱ्याही नर्गिस पहिल्या अभिनेत्री होत्या.

नर्गिसचे व्यावसायिक जीवन, तसेच त्यांचे वैयक्तिक जीवनही बरेच चर्चेत असायचे. नर्गिस आणि राज कपूर यांचे प्रेम प्रकरण चित्रपटसृष्टीत खूप प्रसिद्ध होते. मात्र त्यांनी सुनील दत्तशी लग्न केले. नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रेमाची सुरुवात ‘मदर इंडिया’ च्या सेटवर झाली होती. सन १९५८ मध्ये या दोघांचे लग्न झाले. नर्गिस आणि सुनील दत्त यांना संजय दत्त, प्रिया दत्त आणि नम्रता दत्त ही तीन मुले आहेत.

हे देखील वाचा