Friday, March 29, 2024

‘काही गोष्टींना पर्याय नसतात’ मुलाखतीदरम्यान चिन्मयने केलेल्या ‘या’ कृतीमुळे त्याच्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि सुपरहिट देखील झाला. सिनेमा सध्या त्याच्या विषयामुळे तुफान गाजत आहे. एकीकडे सिनेमावर प्रचंड कौतुक होत असताना दुसरीकडे यावर टीका करणाऱ्यांची देखील काही कमी नाही. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील एक एक भूमिका अतिशय उत्तम साकारलेले कलाकार देखील मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आले आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाने सात दिवसांत बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा पार केला आहे. सिनेमाला मिळणारे घवघवीत यश आणि प्रसिद्धी यांमुळे चित्रपटाची कलाकार देखील खुश आहेत. ‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमात ‘बिट्टा कराटे’ या क्रूर आतंकवाद्याची भूमिका साकारणारा आपला मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर देखील तुफान प्रसिद्ध होत आहे.

‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमाला मिळणारे यश आणि चित्रपटाला घेऊन निर्माण होणारे वाद यावरच एका हिंदी वृत्तवाहिनीने सिनेमातील कलाकारांची एक मुलाखत आयोजित केली होती. या मुलाखतीमध्ये चिन्मय देखील सामील होता. या मुलाखतीमध्ये असे काही घडले जे पाहून तुम्हाला खरोखरच चिन्मयचा अभिमान वाटेल आणि तुम्हीही त्याचे नक्कीच कौतुक कराल. या मुलाखतीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरील युझर्सनी त्याचे भरभरून कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. चिन्मयने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

चिन्मयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देण्यासाठी बसलेला दिसत आहे. चिन्मयने त्याच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाबाबत मुलाखत दिली. या मुलाखतीवेळी मुलाखतकर्त्याने चिन्मयला त्याच्या ‘पावनखिंड’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमातील भूमिकेबद्दल प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारत असताना त्या हिंदी मुलाखतकर्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख ‘शिवाजी’ असा एकेरी केला. तेव्हा चिन्मयने त्या त्याला मध्येच थांबवले आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज’ असे म्हणा म्हणून सांगितले.

याचाच व्हिडिओ चिन्मयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की. “कारण काही गोष्टी ‘Optional’ नसतात. कधीच. छत्रपती शिवाजी महाराज की जय.” चिन्मयची ही कृती पाहून अनेकांनी त्याचे ‘तुझा सार्थ अभिमान आहे.’ म्हणत कौतुक केले आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘पावनखिंड’ चित्रपटात चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा