भारतरत्न लता मंगेशकर यांचे रविवारी (६ फेब्रुवारी) रोजी दुःखद निधन झाले. त्यानंतर आज (७ फेब्रुवारी) रोजी अजून एका कलाकाराने या जगाचा निरोप घेतला आहे. कोकण अनेक गोष्टींसाठी संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. कोकणाची खरी ओळख म्हणजे कोकणात होणारे दशावतार. या दशावतारातील लोकराजा शिवराम ऊर्फ सुधीर कलिंगण (sudhir kalingan) यांचे दुःखद निधन झाले आहे. गोव्यातील एका खासगी रुग्णालयात वयाच्या अवघ्या ४९ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक झालेल्या या एक्सिटमुळे दशावतार कला क्षेत्रातील कलाकारांमधून हळहळ व्यक्त होत आहे.
कोकणातील दशावताराची परंपरा पिढ्यान पिढी जिवंत ठेवण्यासाठी आणि लोकांना या कलेकडे आकर्षित करण्याचे मोठे काम त्यांनी केले. सुधीर कलिंगण हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर गोव्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कलिंगण हे सांस्कृतिक संचनालय मुंबई लोककला समितीचे सदस्य आणि दशावतार चालक-मालक संघाचे सचिव होते.

सुधीर कलिंगण हे प्रसिद्ध दशावतारी नट बाबी कलिंगण यांचे चिरंजीव होते. सुधीर कलिंगण हे श्री कलेश्वर दशावतारी नाट्य मंडळाचे मालक देखील होते. कलिंगण यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे नेत या कलेला ओळख मिळवून देण्यासाठी कार्य केले. दशावतारी राजा म्हणून त्यांनी खूप भूमिका केल्या. कोकणात तर ते लोकराजा आणि नटसम्राट म्हणून लोकप्रिय होते. मुख्य म्हणजे दशावतार ही कला महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशात नेण्यात आणि तिथे या कलेला ओळख मिळवून देण्यात सुधीर कलिंगण यांचा सिंहाचा वाटा होता. ते दिवसभर एसटी विभागात चालक म्हणून काम करायचे आणि सोबतच दशावतारी नाट्य प्रयोगही करायचे.
दशावतार ही कोकणची लोककला टिकवण्यासाठी सुधीर कलिंगण यांनी नवोदित कलाकारांसाठी मार्गदर्शन देखील केले. सुरुवातीस वनराज नाटकात बालवनराजच्या भूमिकेतून ते प्रथमच रंगमंचावर आले. त्यात चिलियाबाळ, रोहिदास आदी भूमिकाही केल्या आहेत. सुधीर कलिंगण यांची श्रीकृष्णाची भूमिका तुफान गाजली. जेव्हा कलिंगण श्रीकृष्णाच्या रूपात रंगभूमीवर यायचे तेव्हा समोर अगदी श्रीकृष्ण असल्याचाच भास प्रेक्षकांना व्हायचा. त्यांची कर्ण, राजा हरिश्चंद्र, वेडा चंदन आणि वृंदा जालंधर आदी भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या.

सुधीर कलिंगण यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रातून आणि दशावतार क्षेत्रातून अनेक दुःखद प्रतिक्रिया येत आहेत. मराठी विश्वातील लोकप्रिय कलाकार असलेले दिगंबर नाईक म्हणाले की, “आमचे अत्यंत जवळचे मित्र, दशावतार सम्राट, आमचो राजा सुधीर कलिंगण अचानक आमका सोडून गेलो. मित्रा, फसवलंस! खूपच लवकर गेलास!!! भावपूर्ण श्रद्धांजली” सुधीर कलिंगण त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून व नातवंडे तसेच भाऊ, वहिनी, पुतणे व अन्य मोठा परिवार आहे.
हेही वाचा :
‘माझे स्वप्न अपूर्ण राहिले’, लता दीदींबद्दल बोलताना ‘हा’ चित्रपट निर्माता भावूक
जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम
…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ










