Saturday, July 27, 2024

रेडिओचा आवाज हरपला; निवेदक अमीन सयानी काळाच्या पडद्याआड

रेडिओच्या जगतातील आवाजाचे जादुगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्गज रेडिओ प्रेजेंटर आणि टॉक शो होस्ट अमीन सयानी यांचे निधन झाले आहे. मुंबई येथे त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा रजिल सयानी यांनी दिली.

सयानी यांना मंगळवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने एच. एन. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गुरुवारी अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
अमीन सयानी यांच्या मुलाने सांगितले की, अमीन सयानी यांना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता दक्षिण मुंबईतील घरी हृदयविकाराचा झटका आला.

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तात्काळ रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. अमीन सयानी यांना उच्च रक्तदाब आणि वयोमानानुसार इतर आजार झाले होते. त्यांना मागील १२ वर्षांपासून पाठदुखीचा त्रास देखील होत होता. त्यामुळे त्यांना चालण्यासाठी वॉकरचा वापर करावा लागत होता.

अमीन यांनी ‘बहनों और भाईयो, अगली पायदानपें है ये गाना…’ असे म्हणत अनेक वर्षे रेडिओवर बिनाका गीतमाला सादर केली. शैलीदार आणि रसाळ निवेदनाने त्यांनी श्रोत्यांवर अधिराज्य गाजवले. सयानी यांच्या नावावर रेडिओवरील ५४ हजारांपेक्षा जास्त कार्यक्रम होते. हे कार्यक्रम प्रोड्युस करणे, त्यांना व्हॉईसओव्हर देण्याचे काम देखील त्यांनीच केले होते. जवळपास १९ हजार जिंगल्सना आवाज देण्यासाठी अमीन सयानी यांचे नाव लिम्का बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवले गेले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

विक्रांत मेस्सी वादाच्या भोवऱ्यात, श्री राम सीता यांच्यासंदर्भात केलेलं वादग्रस्त ट्वीट व्हायरल
सर्वोत्कृष्ट अभिनेता झाल्यावर भावुक झाला किंग खान; म्हणाला, ‘मला वाटले हा पुरस्कार कधीच मिळणार नाही’

हे देखील वाचा