मोठ्या पडद्यावर येणार सुवर्णपदक विजेत्या धावपटू पिंकी प्रामाणिकची गोष्ट; जिच्यावर एकेकाळी पुरुष होण्याचा अन् बलात्काराचा होता आरोप


मागील बऱ्याच काळापासून हिंदी सिनेसृष्टीमध्ये बायोपिक हा विषय प्रचंड गाजत आहे आणि लोकप्रियही होत आहे. अनेक महान आणि बड्या हस्तींच्या कर्तृत्वाला सलाम करण्याच्या उद्देशाने आणि त्या विशिष्ट व्यक्तीबद्दल लोकांना माहित होण्याच्या उद्देशाने बायोपिक तयार केल्या जातात. आजपर्यंत अनेक बायोपिक आपण पाहिल्या. आगामी काळातही अनेक चांगल्या बायोपिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या बायोपिकच्या यादीत आता अजून एक नाव जोडले गेले आहे.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी नुकतीच त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. त्यांचा हा सिनेमा भारतीय खेळाडू पिंकी प्रमाणिक यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. अशोक पंडित लवकरच या बायोपिकवर काम करायला सुरुवात करणार आहे. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. सुवर्णपदक विजेत्या पिंकी यांच्यावर एका महिलेने पुरुष होण्याचा आणि बलात्काराचा आरोप लावला होता. या आरोपाविरोधात पिंकी यांनी मोठी कायदेशी लढाई लढली आहे.

अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून या चित्रपटाची घोषणा करताना लिहिले,” मी माझ्या नवीन सिनेमाची घोषणा करताना खूपच उत्साहात आहे. सुवर्णपदक विजेत्या पिंकी प्रामाणिकची हादरवून टाकणारी गोष्ट मी माझ्या सिनेमातून प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ही कथा प्रियांका घटक यांनी लिहिली असून, चित्रपटातील कलाकारांबद्दल लवकरच निर्णय होणार आहे. अशोक पंडित प्रॉडक्शनने पिंकीच्या बायोपिकचे हक्क खरेदी केले आहेत.”

पुढे अशोक पंडित यांनी सांगितले की, “पिंकीने तिच्या करियरमध्ये अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर विविध स्पर्धकांना आव्हान देत सुवर्ण, रौप्य पदकाची कमाई केली. सर्व सुरळीत असताना एक दिवस अचानक तिच्यावर पुरुष होण्याचा आणि बलात्काराचा आरोप लावला गेला. त्यांनतर तिचे जीवन श्राप बनले. त्यावेळी ती फक्त २२ वर्षांची होती. तेव्हा तिला १००० पुरुषांच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. ज्या पिंकीवर देश गर्व करत होता, त्याच देशात पिंकी चुकीची ठरत होती. मात्र तरीही तिने हार न मानता स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी लढली. सरतेशेवटी तिने स्वतःला निर्दोष सिद्ध देखील केले. पिंकी ४०० आणि ८०० किलोमीटरच्या धावण्यामध्ये सराईत आहे. तिने २००६ साली कॉमनवेल्थ गेम्स मध्ये रौप्य आणि एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले होते. २०२० मध्ये तिने बंगालमध्ये भाजप मध्ये प्रवेश केला आहे. अशोक पंडित यांनी ही घोषणा केल्यानंतर त्यांना सर्वजण शुभेच्छा देत आहेत.

एका मुलाखतीमध्ये पिंकीने सांगितले की, “मी चित्रपटाच्या टीमची आभारी आहे, ज्यांनी माझा विचार केला. काही काळापासून मी सर्व गोष्टींपासून लांब आहे. पुन्हा सर्वांमध्ये येण्यासाठी मला ही एक उत्तम संधी लाभली आहे. मला बऱ्याचदा वाटले की, लोकांना माझा संघर्ष समजावा. आज हे स्वप्न पूर्ण होत आहे. या सिनेमातून लोकांना समस्या आणि कठीण परिस्थितीशी लढायला नक्कीच हिम्मत मिळेल.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.