सध्याच्या काळात आपला सिनेमा इतर अभिनेत्यांच्या तुलनेत कशाप्रकारे जास्त कमाई करतो, याकडे कलाकारांचे लक्ष असते. त्यासाठी कलाकार हल्ली वर्षाला दोनच सिनेमे करतात, पण सिनेमाच्या स्क्रिप्टही तशाच निवडतात. मात्र, साठ आणि सत्तरच्या दशकातील काही कलाकार असे आहेत, ज्यांनी ३५०हून अधिक सिनेमात काम केले आहे. त्यापैकीच एक म्हणजे, अभिनेते जगदीप. त्यांचे खरे नाव सैयद इश्तियाक अहमद जाफरी असे होते. त्यांची गणना सिनेजगतातील जॉनी वॉकर आणि महमूद यांसारख्या दिग्गज कॉमेडी अभिनेत्यांमध्ये घेतले जाते.
उर्दू डायलॉग प्रसिद्ध
जगदीप (Jagdeep) यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली असल्यामुळे घरात कशाचीही कमतरता नव्हती. मात्र, देशाची फाळणी झाली आणि वडिलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबाकडून सर्वकाही हिसकावून घेतले. त्यांची आई त्यांचा एका अनाथाश्रमात जेवण बनवून सांभाळ करू लागली. जगदीप त्यावेळी सहा किंवा सात वर्षांचे होते. त्यावेळी ते सिनेमात काम करण्यासाठी दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांचा पदार्पणातील सिनेमा ‘अफसाना’च्या सेटवर गेले. दिग्दर्शकांना असा मुलगा हवा होता, जो कठीण उर्दूमध्ये एक डायलॉग बोलू शकेल. जगदीप यांनी डायलॉग बोलून दाखवला आणि त्यांना ३ ऐवजी सहा रुपये मिळाले. यानंतर सिनेमामध्ये त्यांना लहान-मोठ्या भूमिका मिळत गेल्या. के. ए. अब्बास यांच्या ‘मुन्ना’, गुरुदत्त यांच्या ‘आर पार’ आणि बिमल रॉय यांच्या ‘दो बीघा जमीन’मध्ये त्यांनी काम केले.
अनमोल पुरस्कार
जगदीप यांना हळूहळू पुढे मोठ्या भूमिका मिळू लागल्या. त्यांना १९५७च्या ‘भाभी’ या सिनेमातून ओळख मिळाली. मात्र, त्याच वर्षी आणखी एक कमाल झाली. दाक्षिणात्य एव्हीएमच्या बॅनरखालील सिनेमा ‘हम पंछी एक डाल के’ देखील प्रदर्शित झाला. मुलांच्या या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मद्रासमध्ये सिनेमाच्या शोदरम्यान तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (Former PM Pandit Jawaharlal Nehru) हे जगदीप यांच्या अभिनयाने इतके प्रभावित झाले की, त्यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून त्यांना बक्षीस म्हणून दिले.
असे बनले कॉमेडियन
वेगवेगळ्या भूमिका वठवल्यानंतर जगदीप यांच्या कारकीर्दीला वळण देण्यासाठी टर्निंग पॉईंट आला १९६८ मध्ये. शम्मी कपूर अभिनित ‘ब्रह्मचारी’ सिनेमात त्यांना कॉमेडियन म्हणून काम मिळाले आणि शेवटपर्यंत त्यांची हीच ओळख कायम राहिली. सन १९७५ मध्ये आलेल्या शोले या सिनेमाच्या अविस्मरणीय यशानंतर सर्वांच्या तोंडात एकच नाव येऊ लागले. ते म्हणजे, सूरमा भोपाली. चाहते त्यांना याच नावाने ओळखू लागले. जगदीप आता कॉमेडी टाईप कास्ट झाले होते. त्यांनी सूरमा भोपाली नावाने सिनेमा बनवला आणि आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला भाग पाडले.
त्यांनी हिंदीच नाही, तर गुजराती, पंजाबी, मारवाडी आणि भोजपुरी सिनेमातही काम केले. रामसे ब्रदर्सचा सर्वाधिक प्रसिद्ध हॉरर सिनेमा ‘पुराना मंदिर’मध्येही जगदीप यांनी भूमिका साकारली आहे. लाखो प्रेक्षकांना आपला दीवाना बनवणाऱ्या जगदीप यांनी ८ जुलै, २०२० रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत ३९४ सिनेमात काम केले. यामध्ये ‘शोले’, ‘निगाहें’, ‘फूल और काँटे’ यांसारख्या अनेक सिनेमांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-