Monday, July 15, 2024

खुशखबर! थिएटरमध्ये नाही होणार खिसा रिकामा, 16 सप्टेंबरला फक्त ‘एवढ्या’ रुपयात लुटा सिनेमाची मजा

‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ 3 सप्टेंबर रोजी साजरा केला जाताे. यानिमित्ताने अमेरिकेमध्ये सिनेमागृहांनी घोषणा केली हाेती की, यादिवशी ते 3 डॉलरमध्ये (म्हणजेच 239 रुपये) चित्रपटाचे तिकीट देतील. यानंतर मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि देशभरातील सिनेमागृहांनी 16 सप्टेंबर रोजी भारतात ‘राष्ट्रीय सिनेमा दिन’ साजरा करण्याचा आणि 75 रुपयांत तिकीट देण्याचा निर्णय घेतला आहे.

माध्यमांच्या अहवालानुसार, सध्या संपूर्ण NCR मध्ये तिकिटांची किंमत 200-300 रुपयांच्या दरम्यान आहे. पीव्हीआर, आयनॉक्स, सिनेपॉलिस, कार्निव्हल, मिराज, सिटी प्राईड, एशियन, मुक्ता ए2, मूव्हीटाईम, वेव्ह, एम2के आणि डिलाईट यासह देशभरातील सुमारे 4000 सिनेमागृहांमध्ये 75 रुपयांची तिकीटे खरेदी करून लोक चित्रपट पाहू शकतील.

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने (MAI) एका निवेदनात म्हटले आहे की, “राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त, सर्व वयोगटातील प्रेक्षक एकत्र चित्रपट पाहण्याचा आनंद घेतील. हा दिवस चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्याचा आनंद साजरा करत आहे. हे आमंत्रण अशा प्रेक्षकांसाठी आहे, ज्यांनी अद्याप चित्रपट चित्रपटमागृहात पाहिला नाही. अशा प्रेक्षकांनी त्यांच्या जवळच्या चित्रपटगृहांना भेट द्यावी.”

असोसिएशनने असाही दावा केला आहे की, भारतामध्ये चित्रपट उद्योगाची भरभराट होत आहे आणि जगभरातील चित्रपट व्यवसायात सर्वात जलद कमाई झाली आहे. अशातच वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चित्रपटगृहांनी चांगली कमाई केली असल्याचे सांगितले जात आहे. यात ‘केजीएफ 2’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘भूल भुलैया 2’, ‘डॉक्टर स्ट्रेंज’ आणि ‘टॉप गन: मॅवेरिक’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

माध्यमांनी MAI चे अध्यक्ष कमल ग्यानचंदानी यांच्या हवाल्याने सांगितले की, “हे 75 रुपयांचे तिकीट सर्व मेनस्ट्रीम फॉरमॅट आणि चित्रपटांवर लागू होईल, जे या आठवड्यात चित्रपटगृहात प्रदर्शित हाेतील. या ऑफरमध्ये लक्झरी फॉरमॅट समाविष्ट केले जाणार नाहीत. मात्र, त्यावर सूट उपलब्ध असेल.”

कमल ग्यानचंदानी यांच्याकडून सांगण्यात आले की, “मध्य पूर्वसोबत अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय देश अशाच प्रकारच्या प्रस्तावांसह राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करत आहेत. आम्ही चित्रपट दिन साजरा करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस निवडला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की, ज्या कुटुंबांनी बरेच दिवसांपासून चित्रपट पाहिले नाहीत, ते देखील थिएटरमध्ये चित्रपट पाहायला जातील.”

अशात 16 सप्टेंबर रोजी प्रेक्षक चित्रपटगृहात सिनेमे पाहायला जातील की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

हे देखील वाचा