बॉलिवूड ही स्वप्ननगरी म्हणून ओळखली जाते. याचे कारण म्हणजे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणाऱ्या या इंडस्ट्रीमध्ये मिळणारे यश देखील अगदी स्वप्नवतच असते. सामान्य व्यक्तीपासून खास बनवणाऱ्या या ग्लॅमर दुनियेत टॅलेंट आणि मेहनत केल्यास यश मिळणार हे नक्की. मात्र याला अनेक अपवाद देखील आहेत.
आपल्याला माहीतच आहे की भारतीय सिनेमे संगीत आणि गाण्यांशिवाय अपूर्णच आहेत. चित्रपटसृष्टीला जसे १०० पेक्षा अधिक वर्ष पूर्ण झाले, तेवढेच वर्ष भारतीय चित्रपट संगीताला झाले. प्रत्येक सिनेमात असणारी गाणी काळानुरूप बदलत गेली आहेत. आताच्या काळात प्रेक्षकांना रॅप आणि फास्ट रिदमची गाणी सर्वात जास्त आवडतात. या गाण्यांना लोकप्रियता मिळवून देण्यामागे अनेक संगीत दिग्दर्शक, गायक यांचा हात आहे. यातलेच एक महत्त्वाचे नाव म्हणजे गायक मिका सिंग. मिकाने इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री घेतली आणि संगीत क्षेत्राला नवी उभारी आली.
१० जून अर्थात मिका सिंग याचा वाढदिवस. मिकाने त्याच्या दमदार आणि भारदस्त आवाजाने रसिकांना वेड लावले. मिकाचे गाणे आणि सुपरहिटचा टॅग नाही असे कधी झालेच नाही. त्याचे प्रत्येक गाणे हिट असतेच असते. १० जून, १९७७ ला पश्चिम बंगालच्या दुर्गापुरमध्ये एका पंजाबी कुटुंबात मिकाचा जन्म झाला. सहा भावांमध्ये मिका सर्वात लहान. मिकाचे खरे नाव अमरिक सिंग होते. प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी मिकाचा मोठा भाऊ आहे. मिकाचे वडील हे प्रशिक्षित शास्त्रीय गायक होते. ते पटना साहेब गुरुद्वारा इथे लहानपणापासून कीर्तन सादर करायचे. त्यांची प्रेरणा घेऊन मिकाने वयाच्या ८ व्या वर्षी गाण्याचे शिक्षण घ्यायला सुरुवात केली. १२ व्या वर्षी तो तबला आणि हार्मोनियम वाजवायला शिकला आणि १४ व्या वर्षी त्याने गिटार शिकायला सुरु केले. खूप कमी वयात मिकाने अनेक वाद्य वाजवायला सुरुवात केली.
मिकाचा भाऊ दलेर मेहंदीने गाण्याचा एक ग्रूप केला होता. हा ग्रूप स्टेज शो करायचा. या ग्रूपमध्ये मिकाने गिटार वाजवण्यास सुरुवात केली. मिकाने बराच काळ या ग्रूपमध्ये गिटार वाजवले. मिका सुद्धा वडिलांप्रमाणे कीर्तन सादर करायचा. पुढे काही काळाने म्हणजेच १९९८ मध्ये मिकाने त्याचा पहिला अल्बम ‘ग्रेटेस्ट इंडीपॉप एल्बम एवर’ हा प्रदर्शित केला. या अल्बममधील गाणे ‘सावन मै लाग गायी आग’ तुफान लोकप्रिय झाले. या गाण्यानंतर मिका एका रात्रीत स्टार झाला आणि त्याला प्रसिद्धी मिळाली.
पहिल्याच अल्बमच्या प्रचंड यशानंतर मिकाने त्याचे ‘गबरू’, ‘दुनाली’, ‘समथिंग समथिंग’, ‘इश्क ब्रांडी’ असे अल्बम प्रदर्शित केले. हे अल्बम देखील हिट ठरले. या अल्बमच्या यशानंतर मिकाचे नाव चित्रपटसृष्टीमध्ये देखील प्रसिद्ध झाले. २००६ साली मिकाने ‘प्यार के साइड इफेक्ट्स’ सिनेमातील ‘दिल तोड़ के ना जा’ (रिमिक्स) हे गाणे गात त्याच्या पार्श्वगायनाला धमाकेदार सुरुवात केली. मिकाचे हे गाणे खूप हिट झाले. त्यानंतर त्याच्याकडे गाण्यांची लाईन लागली आणि मिका यशाची शिखरे चढत गेला.
आज मिका इंडस्ट्रीमधला सर्वात यशस्वी गायक म्हणून ओळखला जातो. जे गाणे तो गातो ते गाणे सुपर हिट हणारच अशी खात्री गाणे प्रदर्शित व्हायच्या आतच दिली जाते. मिकाने आतापर्यंत ‘दिल में बजी गिटार’, ‘मौजा मौजा’, ‘गणपत’, ‘ओय लकी लकी ओय’, ‘सिंग इज किंग’, ‘धन्नो’, ‘ढिंकचिका’, ‘गंदी बात’, ‘जुम्मे की रात’, ‘आज की पार्टी’ आदी अनेक गाणी गायली आहेत.
मिका सिंग आणि वाद हे अगदी सामान्य आहे. मिकाचे अनेक वाद मीडियामध्ये गाजले. त्यातला सर्वात गाजलेला वाद म्हणजे राखी सावंतला बळजबरी केलेले किस. २००६ साली मिकाच्या वाढदिवसाच्या पार्टीला आलेल्या राखीला मिकाने सर्व पाहुणे आणि मीडियासमोर किस केले होते. हा मुद्दा त्यावेळी तुफान गाजला. त्यानंतर राखीने मिकाविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, आता हे दोघे चांगले मित्र आहेत.
हेही वाचा – मिका सिंगने राखीला जबरदस्तीनं किस केलं अन् राडा झाला, मॅटर थेट पोलिसांपर्यंत गेलेला । मिका सिंगचा वाढदिवस
‘द कपिल शर्मा शो’ नंतर मिकाने एक फोटो शेअर केला होता, ज्यात त्याने सांगितले होते की, त्याला बिपाशाने किस केले होते. यामुळे बिपाशा खूप नाराज झाली होती. तिने सांगितले होते, मिकाला मी नाही शो मधील दादी म्हणजेच अली असगरने किस केले होते.
काही वर्षांपूर्वी एका ब्राझिलियन मुलीसोबत गैरवर्तनाचा आरोप मिकावर लागला. त्यानंतर एक लहान मुलीचे यौनशोषणाचा आणि तिला अश्लील फोटो पाठवण्याचा आरोप त्याच्यावर लागला. यामुळे त्याला अटक देखील झाली होती.
सन २०१४ साली मिकावर हिट एँड रन ची केस दाखल झाली. यात त्याने एका रिक्षाला धडक मारली होती. शिवाय एका शो दरम्यान मिकाने डॉक्टरला चापट मारली होते. नुकताच मिका आणि कमाल आर खान यांचा वाद देखील गाजत आहे. मिकाने अनेक टीव्हीवरील सिंगिंग शोमध्ये परीक्षक म्हणून, तर काही शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. मिका त्याच्या बिनधास्त आणि बेधडक वागण्यासाठी नेहमीच ओळखला जातो.
इतके वाद असूनही मिका यशस्वी आणि लोकप्रिय आहे. मिकाच्या संपत्तीबद्दल सांगायचे झाले, तर माध्यमातील वृत्तानुसार, त्याच्याकडे १३ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचे झाले तर ९५,९८,९४,००० रुपए (९५.९८ कोटी रुपये) इतकी संपत्ती आहे. मिकाला लक्झरी गाड्यांची देखील खूप आवड आहे. त्याच्या कडे Porsche Panamera, Hummer, Lamborgini, Ford, Mercedes अशा अनेक पॉश आणि महागड्या गाड्या आहेत.
अधिक वाचा –
– रितेश देशमुखचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले, “एका वाघाची शिकार..”
– लग्नाच्या 7 वर्षांनंतर गरोदर झालेल्या विदिशाने शेअर केले फोटो, पोज देत दाखवले बेबी बंप