Tuesday, May 14, 2024

बॉलिवूडच्या ‘खलनायका’पासून कसा बनला तो सर्वसामान्यांचा ‘देवदूत’; वाचा खरा हिरो सोनू सूदचा प्रेरणादायी प्रवास

कलाकार नेहमी आपल्या समाजाचा एक आरसा असतात. कलाकार जेव्हा मोठे होतात, तेव्हा ते समाजाचे प्रतिनिधित्व करतात. समाजासमोर त्यांच्या कामातून, त्यांच्या वागण्यातून एक आदर्श ठेवतात. त्यामुळे नक्कीच कलाकाराची जबाबदारी वाढलेली असते. त्यामुळे माध्यमांसमोर, समाजात वावरताना त्यांना कसे वागावे याचे भान नक्कीच असल्याला पाहिजे. कलाकार फक्त चित्रपट करतात, आपले मनोरंजन करतात आणि त्यांचे काम पूर्ण होते असे नाही.

इंडस्ट्रीमध्ये पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, अनेक कलाकार असे आहेत, ज्यांना चित्रपटांव्यतिरिक्त समाजात, समाजासाठी काम करताना पाहिले जाते. आपण आपल्या समाजासाठी काही देणं लागतो या आणि माणुसकीच्या भावनेतून हे कलाकार सामाजिक काम करताना दिसतात. यातलाच एक देवदूत, मसीहा, देव अशा अशा अनेक उपमांच्या परे असणारा एक अभिनेता म्हणजे सोनू सूद. (sonu sood)मागच्यावर्षी अचानक देशावर कोरोना नावाचे संकट आले आणि सोनू सूद नावाचा व्यक्ती या संकटात गरजू आणि गरिबांच्या पाठीशी ठाम उभा राहिला. जिथे चांगले चांगले व्यक्ती देखील मदतीसाठी पुढे येत नव्हते, तेव्हा हा देवदूत सगळ्यांना मदत करण्यासाठी रस्त्यावर उतरला. आज सर्वांचा हा देवदूत त्याचा ४८ वा वाढदिवस साजरा करत आहे.

 

सोनूचा जन्म ३० जुलै १९७३ साली पंजाबमधील मोगा इथे झाला. सोनूची आई प्रोफेसर होती. आईची खूप इच्छा होती की, सोनूला खूप शिकवावे आणि मोठे करावे. त्यामुळे सोनु इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर झाला. मात्र त्याला अभिनेता बनायचे होते. त्याने त्याच्या आईकडून २ वर्ष मागून घेतले आणि तो मुंबईत अभिनेता होण्यासाठी आला. मुंबईत आल्यावर त्याने एक दीड वर्ष खूप संघर्ष केला. खूप फिरला मात्र त्याला काम मिळत नव्हते. त्यातच त्याला कोणीतरी सांगितले की, साऊथ इंडस्ट्रीमध्ये प्रयत्न कर. त्यामुळे तो साऊथ सिनेमांसाठी प्रयत्न करू लागला. एका साऊथच्या कोऑर्डिनेटरला सोनूचे फोटो आवडले आणि त्याने त्याला चेन्नईला बोलावले. मग तो ट्रेनने चेन्नईला गेला आणि त्याचा पहिला सिनेमा साइन केला. (Happy Birthday Sonu Sood know his journey )

 

त्यानंतर तो तामिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम अशा विविध भाषिय साऊथ सिनेमांमध्ये दिसला. त्यानंतर तो हिंदीमध्ये आला. २००१ साली त्याचा पहिला हिंदी सिनेमा आला ‘शहीद-ए-आझम’ या सिनेमात त्याने ‘भगतसिंग’ यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘जिंदगी खूबसूरत है’, ‘कहा हो तुम’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने’ आदी अनेक सिनेमांमध्ये काम केले. मात्र त्याला प्रसिद्धी मिळाली ती २००६ साली आलेल्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘जोधा अकबर’ या सिनेमातून. यानंतर त्याने ‘सिंग इज किंग’, ‘एक विवाह ऐसा भी’, ‘धुंडते रेह जायोगे’ असे सिनेमे केले. २०१० साल त्याच्यासाठी खूप महत्वाचे ठरले. कारण याच वर्षी त्याचे संपूर्ण आयुष्य बदलणारा सिनेमा आला आणि तो म्हणजे, सलमान खानचा ‘दबंग’. या सिनेमातील त्याची नकारात्मक भूमिका तुफान गाजली. याच सिनेमाने त्याला खरी ओळख आणि प्रसिद्धी दिली असे, म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

 

एक दमदार अभिनेत्यासोबत सोनू एक उत्तम माणूस देखील आहे. हे कोरोना काळाने सर्वांना दाखवून दिले. कारण मागच्या वर्षी कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे असंख्य परप्रांतीय मुंबईत अडकून पडले होते. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी संधीच उपलब्ध नव्हती. सरकार काहीही करत नसताना, सोनू पुढे आला आणि त्याने सर्व परप्रांतीयांना विविध मार्गाने त्यांच्या त्यांच्या घरी पोहचवले. तो इथेच थांबला नाही, तर त्याने त्यानंतर कोरोना रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पोचवण्यासाठी प्रयत्न केले. ट्वीट, फोन, मेसेज, प्रत्यक्ष भेटून आदी अनेक मार्गाने लोकं त्याच्याकडे मदतीसाठी याचना करत होते. त्यावेळी सोनुने या सर्वाना मदत केली. शक्य तितक्या लोकांना त्याने बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन, औषधं मिळवून दिले. या सर्वांचा परिणाम म्हणजे आज सोनू एक देवदूत म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या या कामामुळे अनेकांचे प्राण वाचवले. लोकांनी त्याचे आभार मानण्यासाठी त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्याचे मंदिरही बांधले. आजही अनेक लोक देशाच्या कानाकोपऱ्यातून त्याला भेटायला त्याचे आभार मानायला येतात.

सोनूच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर त्याने सोनालीसोबत लग्न केले आहे. सोनाली आणि त्याची भेट इंजिनियरिंग करताना कॉलेजमध्ये झाली. इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वीच त्याने लग्न केले होते. सोनू पंजाबी तर सोनाली साऊथ इंडियन आहे. सोनालीला खूप कमी वेळा पाहिले जाते. तिला लाइमलाईटमध्ये यायला आवडत नाही. सोनालीने सोनूला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. या दोघांना दोन मुलं आहेत.

सोनू त्याच्या आईच्या खूपच जवळ होता. त्याच्या आईने त्याला खूप महत्वाची मूल्ये शिकवली. एका मुलाखतीमध्ये त्याने आईबद्दल सांगितले होते की, “मी माझ्या आईच्या खूप जवळ होतो. अगदी ममाज बॉय होतो. आईला रोज कॉलेजमध्ये स्कुटरवरून सोडायला जायचो. जेव्हा मी मुंबईत आलो तेव्हा आई मला पत्र लिहायची. आमचे फोनवर रोजच बोलणे व्हायचे मात्र तरीही ती मला पत्र लिहायची आणि मला प्रेरित करायची. माझ्या आईने लिहिलेली सर्व पत्रं मी सांभाळून ठेवले आहे. तिचे २००७ साली निधन झाले.”

जेव्हा सोनू संघर्ष करत होता, तेव्हा त्याने अनेक मासिकांच्या ऑफिसमध्ये त्याचे फोटो पाठवले होते. त्यात ‘स्टारडस्ट’ या मोठ्या मासिकाचाही समावेश होता. मात्र तेव्हा या मासिकाने त्याचे फोटो छापायला नकार दिला. त्यानंतर मागच्यावर्षी सोनूने एक ट्वीट केले होते. त्यात त्याने ‘स्टारडस्ट’ मासिकावर झळकलेले त्याचा फोटो शेअर केला होता.

सोनू सूदला त्याच्या या अभूतपूर्व कामासाठी देशासोबतच परदेशातूनही अनेक सन्मान प्राप्त झाले. प्रत्येकाने त्याच्या सोयीने सोनूबद्दल आणि त्याच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-

अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद

‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’मधील ‘ही’ अभिनेत्री कमी वयातच झाली विधवा, हृद्यविकाराने पतीचे निधन

अरे बाप रे! आलिया भट्टला लागले चोरीचे डोहाळे? पाहा अभिनेत्रीने कशाची केली चोरी

हे देखील वाचा