Friday, July 5, 2024

क्या बात है! सुनील शेट्टीचे ‘या’ अभिनेत्रीवर होते क्रश; सोबत केले होते बऱ्याच चित्रपटात काम

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, जे आजही तग धरून आहेत. ज्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टी दणाणून सोडली होती, आणि अजूनही वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत होण्याचा बहुमान पटकावत आहेत. याच अभिनेत्यांपैकी एक म्हणजे बॉलिवूडचा ‘अण्णा’ अर्थातच सुनील शेट्टी होय. सुनील बुधवारी (११ ऑगस्ट) आपला ६० वा वाढदिवस करत आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या आयुष्यातील रंजक गोष्टी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…

जन्म
सुनीलचा जन्म ११ ऑगस्ट, १९६१ रोजी कर्नाटकच्या मंगळुरू येथील मुल्कीमध्ये झाला होता. प्रत्येक लहान मुलाप्रमाणे त्याचेही मोठे स्वप्न होते. तुम्हाला वाटेल की, आता इतक्या मोठ्या हिरोला लहानपणी हिरोच व्हावे वाटले असावे. मात्र, तसं काहीच नव्हतं. त्याला लहानपणापासूनच क्रिकेटपटू बनायचे होते. मात्र, त्यालाही माहिती नव्हते की, त्याच्या नशिबात बॉलिवूडचा ‘अण्णा’ होण्याचे लिहिले आहे. (Happy Birthday Suniel Shetty Some Unknown Facts About Actor)

अभिनय कारकिर्दीची सुरुवात
बॉलिवूडला आतापर्यंत एका पेक्षा एक हिट चित्रपट देणाऱ्या सुनीलने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात सन १९९२ मध्ये आलेल्या ‘बलवान’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दिव्या भारती आणि डॅनी डॅन्झोपा या कलाकारांचा समावेश होता. यानंतर त्याने ‘वक्त हमारा है’ आणि ‘पहचान’ या चित्रपटात काम केले. सन १९९३ मध्ये आलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटासाठी त्याला सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. मात्र, त्याला या चित्रपटातून नाही, तर सन १९९४ मध्ये आलेल्या ‘मोहरा’ चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याच्यासोबत अक्षय कुमार आणि रवीना टंडन या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

यानंतर तो ‘गोपी किशन’ या चित्रपटातही झळकला. यामध्ये त्याने डबल रोल साकारला होता. या चित्रपटाने भरघोस यश मिळवले होते. पुढे त्याने ‘टक्कर’, ‘कृष्णा’, ‘सपूत’, ‘बॉर्डर’, ‘भाई’, ‘आक्रोश’ यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केले.

एक ऍक्शन अभिनेता म्हणून नाव कमावलेला सुनील पुढे विनोदी आणि खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखला जाऊ लागला. ‘हेराफेरी’ या चित्रपटात त्याने साकारलेल्या ‘शाम’ची भूमिका कधीही विसरली जाऊ शकत नाही. दुसरीकडे ‘धडकन’ चित्रपटात सुनीलने ग्रे शेडची भूमिकाही चांगलीच गाजली होती.

यानंतर तो संजय दत्तच्या ‘रूद्राक्ष’ आणि शाहरुख खानच्या ‘मैं हूं ना’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकला आहे. हिंदीसोबतच सुनीलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही आपले नशीब आजमावले आहे.

विशेष म्हणजे आपल्या कारकिर्दीत त्याने तब्बल १०० पेक्षाही अधिक चित्रपटात काम केले आहे. सुनीलच्या क्रिकेट होण्याच्या स्वप्नाबद्दल आपण बोललोच आहोत. विशेष म्हणजे त्याने या गोष्टीचा खुलासा आपल्या मुलाखतीतही केला आहे. तो म्हणाला होता की, “मला अभिनयाची बिल्कुल आवड नव्हती. मला तर देशासाठी खेळणे आणि क्रिकेटपटू बनायचे होते. एका खेळाडूचे शरीर लवचीक असते. मीदेखील आपल्या शरीराला लवचीक बनवण्यासाठी मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले. मात्र, मार्शल आर्ट्सचा उपयोग मला ऍक्शन हिरो बनण्यात झाला. मला साजिद नाडियाडवाला आणि राजू मवानी यांच्या चित्रपटात ऍक्शन हिरो म्हणून पहिला ब्रेक मिळाला.”

अभिनेत्याव्यतिरिक्त आहे व्यावसायिक
सुनील शेट्टीने अभिनयासोबतच एक निर्माता म्हणूनही आपले नशीब आजमावले. त्याने ‘खेल’, ‘रक्त’ आणि ‘भागमभाग’ या चित्रपटाची निर्मिती केली. मात्र, निर्माता म्हणून त्याचा टिकाव लागला नाही. अभिनेत्याव्यतिरिक्त सुनील आपल्या व्यावसायासाठीही ओळखला जातो. बऱ्याच चाहत्यांना माहिती नसेल, पण सुनीलने हॉटेल मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे. त्याचे अनेक रेस्टॉरंट, क्लब आहेत. असे म्हटले जाते की, तो ऍडव्हेंचर पार्कचाही सहमालक आहे. रेस्टॉरंटसह त्याने लग्झरी फर्निचर, होम डेकोर यांसारख्या क्षेत्रात त्याने आपला व्यवसाय पसरवला आहे. यासोबतच तो रियल इस्टेटमध्येही काम करतो. असे म्हटले जाते की, तो आपल्या चित्रपटांव्यतिरिक्त व्यवसायातूनही कोट्यवधी रुपये कमावतो.

या अभिनेत्रीवर होते क्रश
माध्यमांतील वृत्तानुसार, सुनीलचे अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर क्रश होते. विशेष म्हणजे सुनील आणि सोनाली पडद्यावर एकत्रही झळकले आहेत. त्यांनी ‘रक्षक’, ‘सपूत’, ‘कहर’, ‘टक्कर’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केल आहे.

मुलगीही आहे अभिनेत्री
वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सुनील शेट्टीची मुलगीही अभिनयक्षेत्रात आहे. त्याच्या मुलीचे नाव अथिया शेट्टी आहे. तिने सन २०१५ मध्ये ‘हिरो’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली होती.

बॉलिवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये होते गणना
विशेष म्हणजे सुनील शेट्टीची गणना बॉलिवूडच्या फिट अभिनेत्यांमध्ये होते. तो नेहमीच त्याच्या वर्कआऊट दरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

सुरुवातीला कोणतीही अभिनेत्री नव्हती झाली काम करण्यास तयार
सुनील शेट्टीच्या पदार्पणाच्या चित्रपटात म्हणजेच ‘बलवान’दरम्यान त्याच्यासोबत कोणत्याही अभिनेत्रीला काम करायचे नव्हते. कारण तो नवीन होता. मात्र, त्यावेळी दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती त्याच्यासोबत काम करण्यास तयार झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-प्रियांका, कॅटरिना आणि आलिया हे त्रिकुट निघणार रोड ट्रीपवर, फरहान अख्तरने केली पुढच्या सिनेमाची घोषणा

-सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचे कौतुक करताना केलेल्या ट्विटमुळे महानायक अमिताभ बच्चन ट्रोल

-करीना कपूर खानने प्रेग्नेंसी दरम्यानच्या ‘सेक्स लाईफ’बद्दल केला खुलासा; म्हणाली, ‘त्यावेळी सैफ खूप…’

हे देखील वाचा