Friday, September 20, 2024
Home मराठी “त्या टाळ्या कधी संपुच नयेत” खास पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने पत्नी क्षितीवर ‘त्या’ भूमिकेसाठी उधळली स्तुतीसुमने

“त्या टाळ्या कधी संपुच नयेत” खास पोस्ट शेअर करत हेमंत ढोमेने पत्नी क्षितीवर ‘त्या’ भूमिकेसाठी उधळली स्तुतीसुमने

करण जोहरचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित असा रॉकी और राणी की प्रेमकहाणी हा सिनेमा अखेर प्रदर्शित झाला. सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच सिनेमा सतत चर्चांमध्ये होता. एकतर सिनेमाची तगडी स्टारकास्ट, बऱ्याच काळानंतर करण जोहरचे दिग्दर्शनात पुनरागमन आदी अनेक कारणांमुळे सिनेमा सतत लाइमलाईट्मधे होता. अशातच सिनेमाचा ट्रेलर आला आणि प्रेक्षकांना खासकरून मराठी प्रेक्षकांना एक सुखद धक्का बसला. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये चक्क एका मराठी चेहऱ्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते, आणि तो चेहरा म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग.

हो रॉकी और राणी की प्रेम कहाणी सिनेमात क्षिती जोग एका महत्वाच्या भूमिकेत झळकली आहे. क्षितीने या सिनेमात चक्क रणवीर सिंगच्या आईची पूनम रंधावाची भूमिका साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकताच या सिनेमाचा ग्रँड प्रीमियर पार पडला. त्या प्रीमियरला क्षितीने तिचा नवरा असलेल्या अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेसोबत हजेरी लावली. यावेळी हेमंतच्या असलेल्या भावना त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत. सोबतच बायकोवर भरभरून कौतुकाची उधळण केली आहे.

हेमंतने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले, “पाटलीणबाई,

आज तुझ्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा दिवस!

करण सरांच्या ॲाफिस मधून फोन आल्याचं तू मला सांगितलंस आणि घाई घाईत लुक टेस्ट आणि त्यांच्याबरोबरची तुझी मिटींग आणि तारखा आणि बाकी सगळं ठरलं बघता बघता सिनेमाचं शूट झालं… हा सगळा प्रवास मी जवळून पाहिला… प्रिमियर शो ला तुझ्या सोबत आलो… “He is my husband!” अशी तू सगळ्यांना ओळख करून देत होतीस… काय भारी फिलींग होतं ते! त्या शो नंतर कोण कोण येऊन तुझं कौतुक करत होते… काय कमाल वाटत होतं!

आज आपण आपल्या मित्रांसोबत सिनेमा पाहिला…
तुझं काम आज पुन्हा एकदा बारकाईने बघत होतो!
तुझी आजवरची मेहनत, स्वतःच्या जिवावर सारंकाही करण्याची जिद्द हळू हळू फळाला येतेय…
सिनेमा संपल्यावर गर्दीतून लोक तुला भेटायला आले आणि त्या साऱ्यांनी तुझ्या साठी टाळ्या वाजवल्या…
त्या टाळ्या कधी संपुच नयेत असं वाटत राहिलं… तुझं कौतुक कधीच थांबु नये असं वाटत राहिलं…
हे सारं मी साठवून ठेवलंय कायमचं आणि आज तुला आवडत नसताना ही पोस्ट लिहीतोय…
इतक्या भव्य दिव्य सिनेमात, एवढ्या मोठ्या नटांमधे, त्या सगळ्या झगमाटात तू लख्खं चमकत होतीस… तुझ्या कामाने! कमाल!

क्षिती मला तू कायमंच आनंद दिलायस पण #rockyaurranikipremkahani या चित्रपटाबद्दल Thank you! आपणंच हे सारं केलंय, हे सग्गळं आपलंच यश आहे असं खुळ्यागत वाटणारा तुझा या जगातला सगळ्यात मोठा चाहता…

हेमंत.

खूप खूप मोठी हो, love you!

(टिपः सिनेमा लवकरात लवकर बघा आपल्या क्षितीचं काम तुम्हाला नक्की आवडेल!)”

हेमंतच्या या पोस्टवर मराठी कलाकारांनी भरभरून कमेंट्स केल्या असून, क्षितीचे जोरदार कौतुक केले आहे. यासोबतच त्याच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी देखील कमेंट्स करत क्षितीच्या कामाचे कौतुक केले आहे.

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा