Saturday, July 6, 2024

कंडोम विकणाऱ्या पोरीचा भन्नाट चित्रपट ‘जनहित में जारी’ एकदा बघाच

 ‘कंडोम’ हा शब्द जरी उच्चारला तरी ऐकणारा कान टवकारतोच आणि बोलणारा ही जरा चाचपडतोच. कुणी कितीही आधुनिकतेच्या गप्पा मारल्या तरी आजही या विषयावर बोलायला अनकेजण कचरतात. पण जर चक्क एखादी मुलगीच कंडोम विकायला लागली तर. याच आगळ्यावेगळ्या विषयावर उघड भाष्य करणारा ‘जनहित में जारी’ चित्रपट शु्क्रवारी 10 जूनला रिलीज झालाय. 2 तास 27 मिनीटांच्या या चित्रपटात कॉमेडी, लव्हस्टोरी आणि एक सुंदर सामाजिक संदेशाची अप्रतिम पेरणी केलीये की थिएटरातून बाहेर पडताना पैसा वसूल झाल्याचं समाधान चेहर्‍यावर नक्की येतं. आता जास्त वेळ न घालवता हा चित्रपट नेमका कस्साये त्याचे प्लस पॉइंट आणि मायनस पॉइंट काय ते पाहू…

सुरुवात चित्रपटाच्या कथेपासून करूया. कारण या चित्रपटाचा आत्मा म्हणजे त्याचा विषय, चित्रपटाचे कथानक कमालींचं बांधलंय आणि ते दाखवलंय सुद्धा तितक्याच ताकदीने. चित्रपटाची कथा सुरू होते जॉबच्या शोधात असलेल्या मनोकामना म्हणजे मनूपासून. कसल्याही परिस्थितीत महिन्याच्या आत जॉब शोध नाहीतर तुझ लग्न लावून देऊ अशी तिला घरुन धमकी मिळते. सुदैवाने तिला जॉबही मिळतो, पण एका कंडोम तयार होणाऱ्या फॅक्टरीमध्ये. नाईलाजाने ती हा जॉब स्विकारते, सुरूवातीला भडकलेल्या घरच्यांचा विरोधही मावळतो. याचदरम्यान मनूच्या आयुष्यात रंजन येतो. त्यांची बहरलेली लवस्टोरी लग्नापर्यंत जाते, आपली सून काय करते हे मात्र तिच्या सासरच्यांना माहित नसतं आणि एक दिवस त्यांना हे सत्य समजतं. तिथून त्यांच्या कुटूंबात झालेले वाद, समाजात झालेली बदनामी, शेवटी तिच लग्न टिकतं की मोडत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना चित्रपट संपल्यानंतर मिळतात.

चित्रपटाची कथा आणि डायलॉग राज शांडिल्य यांच्या लेखनीतून आलेली आहे. ज्यामध्ये कॉमेडी, लवस्टोरीचा पहिल्यापासून दिलेला तडका प्रेक्षकांना शेवटपर्यंत हसवून सोडतो. दर दोन सीननंतर कॉमेडी पाहायला मिळते त्यामुळे प्रेक्षक अजिबात कंटाळत नाही, हे या चित्रपटाचे मोठे यश आहे. मनू आणि रंजनच्या लवस्टोरीने चित्रपट मध्यांतरापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन करत सुसाट सुटतो. इंटरवलपर्यंत चित्रपट काहीतरी सामाजिक संदेश देईल हेच प्रेक्षक क्षणभर विसरुन जातो, पण मध्यांतरानंतर चित्रपट अनपेक्षित म्हणता येणार नाही, पण खूपच वेगळे वळण घेतो. ज्यामध्ये प्रेक्षकांना सामावायला थोडासा वेळ जातो. कॉमेडी की एक गंभीर मुद्दा अशा गोंधळात चित्रपट मध्यांतरानंतर सापडलेला पाहायला मिळतो, त्यामुळेच गंभीर चर्चेतही कॉमेडी पेरलेली पाहायला मिळते. चित्रपटाच्या शेवटी गर्भपात, डेथ डुरिंग डिलिवरी असे  संवेदनशील मुद्दे उठवले आहेत जे प्रेक्षकांना फारसे रुचत नाहीत, त्यामुळेच चित्रपट शेवटी शेवटी थोडाफार बोअर करायला लागतो..,.

चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायच्या आधी कास्टिंग डिरेक्टर पराग मेहतांना सॅल्यूट कराव लागेल. कारण प्रत्येक भूमिकेसाठी निवडलेला कलाकार त्याच्या भूमिकेत कमालीचा फिट बसलाय. मुख्य अभिनेत्री नुसरत भारुचाने साकारलेली मनू शेवटपर्यंत तिचा धाक टिकवून ठेवते. प्रत्येक सीन तिने उत्तमरित्या निभावलेला आहे त्यामुळे तीच कौतुक करावच लागेल. मनूचा पती रंजनच्या भूमिकेत अनुदसिंग ढाकानेही उत्तम साथ दिली आहे. परितोश त्रिपाठीने साकारलेली देवीची भूमिका अफलातून आहे, त्याच्या कॉमेडी टायमिंगला दाद द्यावीच लागेल.

सपना सांड आणि इश्तियाक खान यांनी मनूच्या आईवडीलांच्या भूमिका सुंदररित्या साकारली आहे. फॅक्टरी मालकाच्या भूमिकेतील विजेंद्र काला यांचा साधासरळ अभिनयही अप्रतिम आहे. चित्रपटाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विजय राजने साकारलेली सासऱ्याची भूमिका. विजय राजचा प्रत्येक डायलॉग, हावभाव आपसूक दाद द्यावी असाच आहे… रंजनच्या दोन भावांच्या भूमिकेत सुमित गुलाटी आणि विक्रम कोचर यांनीही कौतुक करावा असाच अभिनय केला आहे. थोडक्यात प्रत्येक कलाकाराने त्याच्या भूमिकेला १०० टक्के न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे..

चित्रपटाला साधु एस तिवारी, प्रिनी सिद्धांत माधव, अमोल आणि अभिषेक यांच संगीत लाभलेलं आहे. चित्रपटातील गाणी कथेला अनुसरुन अशीच आहेत. जी फक्त तेवढ्यापुर्तीच लक्षात राहतात. म्हणजेच सुपरहीट गाण्यांचा अभाव प्रकर्षाने जाणवतो. एखाद सुपरहीट गाण असत तर चित्रपट आणखी आकर्षक झाला असता, असे अनेकदा वाटते. या चित्रपटाला अमन पंत यांच पार्श्वसंगीत लाभलेल आहे जे कुठेही त्रासदायक वाटत नाही.

चित्रपटाची सर्वात मोठी कौतुकमुर्ती म्हणजे दिग्दर्शक जय बसंतु सिंग. कारण त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात अशा संवेदनशील, सामाजिक संदेश देणाऱ्या विषयांवरील अप्रतिम कलाकृती तयार केली आहे. बिग बजेट चित्रपटांच्या गर्दीत हा चित्रपट किती टिकाव धरेल हे सांगता येत नाही, पण त्यांच्या या प्रामाणिक प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल..

इथे पाहा व्हिडिओ: कंडोम विकणाऱ्या पोरीचा भन्नाट चित्रपट ‘जनहित में जारी’ एकदा बघाच

हे देखील वाचा