Friday, April 19, 2024

कमल हसनच्या ‘विक्रम’ चित्रपटाने ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि ‘मेजर’ला टाकले मागे, या यादीत आहे अव्वल स्थानावर

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासनच्या (Kamal Haasan) आगामी ‘विक्रम’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे भारतीय चित्रपटांमधील मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या श्रेणीत ‘विक्रम’ पहिल्या क्रमांकावर आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात साऊथ इंडस्ट्रीतील तीन मोठे स्टार्स एकत्र दिसणार आहेत. कमल हसन, विजय सेतुपती आणि मल्याळम सिनेमाचे फहाद फासिल असे तीन दिग्गज स्टार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यामुळेच या चित्रपटाची सध्या प्रेक्षकांना जोरदार उत्सुकता लागली आहे.

अलीकडेच सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्रामवर ही माहिती शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये ‘सुपरस्टार कमल हासनचा ‘विक्रम’ मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत अव्वल आहे. असा कॅप्शन दिला आहे. या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. कमल हसनचा हा चित्रपट ३ जूनला प्रदर्शित होणार आहे. त्याचबरोबर अक्षय कुमारचा ऐतिहासिक चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ आणि आदिवी शेषचा ‘मेजर’ चित्रपटही याच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत कमल हासन यांनी हिंदी आणि दक्षिण सिनेमांच्या वादावरही आपले मत व्यक्त केले होते.

यावेळी बोलताना त्यांनी “मी एवढेच सांगू शकतो की मी नेहमीच स्वतःला एक भारतीय आणि संपूर्ण देश म्हणून माझा प्रदेश म्हणून पाहिले आहे. मी कुठेही राहू शकतो आणि सर्वत्र आरामदायक आहे. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाचे हे सौंदर्य आहे,” असे मत व्यक्त केले होते. दरम्यान हा बहुचर्चित चित्रपट लोकेश कनागराज यांनी दिग्दर्शित केला आहे आणि हा चित्रपट कमल हसनच्या राज कमल फिल्म्स इंटरनॅशनलच्या बॅनरखाली बनला आहे. कमल हासनचा ‘विक्रम’ हा चित्रपट एक्शन सीक्वेन्सने परिपूर्ण असेल, त्याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. कमल हसनने ट्रेलरमधील एक्शनद्वारे चाहत्यांची मने जिंकली आहेत. या चित्रपटातून दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन चार वर्षांनंतर ‘विक्रम’ चित्रपटाद्वारे थिएटरमध्ये परतत आहे.

हे देखील वाचा