Tuesday, June 18, 2024

जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर कंगनाने दाखल केली एफआयआर, म्हणाली ‘मी फालतू धमक्यांना घाबरत नाही’

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. तिची परखड मते, त्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद, ट्रोलिंग या आणि याशिवाय अनेक गोष्टींमुळे ती सतत लाइमलाईट्मधे असते. मागील काही दिवसांपासून कंगना तिच्या रोमँटिक पोस्टमुळे खूपच चर्चेत आली होती. कंगना लवकरच लग्न करणार. तिच्या आयुष्यात तिच्या पार्टनरची एन्ट्री झाल्याच्या चर्चा देखील ऐकायला येत होत्या, मात्र आता कंगना एका वेगळ्याच गोष्टीमुळे पुन्हा प्रकाशझोतात आली आहे.

कंगना रणौतला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर तिने लगेचच पोलीस स्थानकात धमकी देणाऱ्या व्यक्तीविरोधात कंगनाने एफआयआर दाखल केली आहे. याची माहिती कंगनाने तिच्या सोशल मीडियावरून एक मोठी पोस्ट शेअर करत दिली असून, सोबत एफआयआरची कॉपीही कंगनाने पोस्ट केली आहे.

कंगनाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांचे स्मरण करून मी लिहिले होते की, देशद्रोह्यांना कधीही माफ करू नका किंवा त्यांना विसरुही नका. अशा प्रत्येक घटनेत अंतर्गत गद्दारांचा मोठा हात होता. अन्यथा पाकिस्तानी दहशतवादी मुंबईवर हल्ला करण्याचे धाडस करू शकले असते का? शहिदांना अभिवादन करणाऱ्या माझ्या या पोस्टवर मला विघटनकारी शक्तींकडून सतत धमक्या येत आहेत. बठिंडा येथील एका इसमाने मला जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. तो म्हणतो की तो मला सोडणार नाही आणि ज्या प्रकारे उधम सिंग यांनी जनरल डायरचा बदला घेतला होता, तसेच काहीसे तो माझ्यासोबत करेल. अशा प्रकारे मला धमक्या येत आहेत – “आता तू शीख समाजाची गद्दार आहे, लक्षात ठेव आम्ही धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. तुझ्यासारख्या अनेक आल्या आणि गेल्या. उधम सिंग यांनी 20 वर्षांनी जनरल डायरचा बदला घेतला होता, तुझा नंबरही नक्कीच येईल. हे तुझ्यासाठी आव्हान आहे.”

पुढे कंगनाने सोनिया गांधींबद्दल देखील लिहिले, “मी अशा प्रकारच्या फालतू धमक्यांना घाबरत नाही. देशाविरोधात कट रचणा-या आणि दहशतवाद्यांविरोधात मी बोलते आणि नेहमीच बोलत राहीन. निष्पाप जवानांची हत्या करणारे नक्षलवादी असोत, टुकडे टुकडे गँग असो किंवा ऐंशीच्या दशकात पंजाबमधील गुरुंच्या पवित्र भूमीचे तुकडे करून खलिस्तान बनवण्याचे स्वप्न पाहणारे परदेशात बसलेले दहशतवादी असोत मी त्यांच्याविरोधात आवाज उठवत राहील. देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी मी सदैव उभी राहीन. मी कधीही कोणत्याही जात, धर्म किंवा गटाबद्दल अपमानास्पद किंवा द्वेषपूर्ण काहीही बोलले नाही. आपली भारतीय संस्कृती, परंपरा आणि श्रद्धा हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. मी काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया जी यांना आठवण करून देऊ इच्छिते की, तुम्ही देखील एक महिला आहात, तुमच्या सासू इंदिरा गांधीजी यांनी शेवटच्या क्षणापर्यंत या दहशतवादाविरुद्ध जोरदार लढा दिला. कृपया तुमच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना अशा दहशतवादी, विघटनकारी आणि देशविरोधी शक्तींकडून येणाऱ्या धमक्यांवर त्वरित कारवाई करण्याचे निर्देश द्या.”

पंजाबमधील निवडणुकांसाठी तिच्या नावाच्या होणाऱ्या वापराबद्दल ती म्हणाली, “धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. मला आशा आहे की पंजाब सरकारही लवकरच कारवाई करेल. माझ्यासाठी देश सर्वोपरि आहे, त्यासाठी बलिदान द्यावे लागले तरी मला मान्य आहे, पण मी कधीही घाबरणार नाही, देशद्रोह्यांच्या विरोधात मी उघडपणे बोलत राहीन. पंजाबमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यासाठी काही लोक संदर्भाशिवाय माझे शब्द वापरून, माझ्या नावाचा वारंवार वापर करून, माझ्याबद्दल द्वेष पसरवून आपले हित साधण्याचा प्रयत्न करत आहेत. भविष्यात मला काही झाले तर त्याला केवळ द्वेषाचे राजकारण करणारेच जबाबदार असतील. त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी निवडणूक जिंकण्याच्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी कोणाविषयीही द्वेष पसरवू नये. देश आणि समाजात सुसंवाद, सद्भावना आणि वैचारिक अभिव्यक्तीला आदर द्या.”

कंगना सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लवकरच ती ‘तेजस’ आणि धाकड सिनेमात दिसेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा