Tuesday, June 25, 2024

दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने अवघ्या जगभरात हाहाकार माजवला आहे. त्याचे सावट सिनेसृष्टीवरही पाहायला मिळाले. कोरोनाच्या विळख्यात सापडून, अनेक कलाकारांना आपला जीव गमवावा लागला. अशातच दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. शिवा शंकर यांना काही काळापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यानंतर त्यांना हैदराबादच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी, कोरिओग्राफर शिवा शंकर आणि त्यांचा मोठा मुलगा कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडला होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने शिवा शंकर यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले. आता त्यांच्या निधनामुळे दक्षिण उद्योगाला मोठा धक्का बसला आहे. (veteran choreographer shiva shankar master passes away)

एसएस राजामौली यांनी व्यक्त केला शोक
दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी कोरिओग्राफर शिवा शंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्वीट करून लिहिले की, “शिवा शंकर मास्टर गुरू यांचे निधन झाले, हे जाणून दुःख झाले. ‘मगधीरा’ या चित्रपटात त्यांच्यासोबत काम करणे, हा एक संस्मरणीय अनुभव आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.”

सोनू सूदनेही व्यक्त केले दुःख
सोनू सूदनेही मास्टर गुरू शिवा शंकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्याने लिहिले की, “शिवा शंकर मास्टर जी यांच्या निधनाची बातमी ऐकून मन हेलावले. आम्ही त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, पण देवाची वेगळीच योजना होती. मास्टरजी तुमची कायम आठवण राहील. देव त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखावर मात करण्याची शक्ती देवो. सिनेमा सदैव तुमची आठवण ठेवेल सर.”

सोनू सूद आणि चिरंजीवी यांनी केली मदत
कोरिओग्राफर शिवा शंकर यांना कोरोनाची लागण झाली होती. अशा परिस्थितीत सोनू सूद आणि साऊथ सुपरस्टार चिरंजीवी त्यांच्या मदतीसाठी पुढे आले. सोनू सूदने सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली होती की, तो सतत त्याच्या कुटुंबाच्या संपर्कात आहे आणि त्यांचा जीव वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सोनू सूदशिवाय चिरंजीवी यांनीही त्यांना मदत केली होती.

जिंकला होता राष्ट्रीय पुरस्कार
शिवा शंकर यांनी जवळपास चार दशके टॉलिवूडमधील प्रतिष्ठित गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. त्यांनी १९७० मध्ये पदार्पण केले होते. साऊथ सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत त्यांनी काम केले. २०११ मध्ये शिवा शंकर यांना राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. एसएस राजामौली यांच्या ‘मगधीरा’ या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत ८०० हून अधिक गाणी कोरिओग्राफी केली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा