‘बेबो’ला चित्रपटसृष्टीत २१ वर्षे पूर्ण; पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘आणखी २१ वर्षे काम करण्यासाठी तयार…’


‘रिफ्यूजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारी ‘बेबो’ म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर खान होय. तिने बुधवारी (30 जून) चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून 21 वर्षाचा हा सुंदर प्रवास पूर्ण केला आहे. तिचा ‘रिफ्यूजी’ हा चित्रपट 30 जून, 2000मध्ये प्रदर्शित झाला होता. तिने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून तिच्या पहिल्या चित्रपटातील आठवण शेअर केल्या आहेत. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक जेपी दत्ता आणि अभिषेक बच्चनदेखील दिसत आहेत. (Kareena Kapoor Khan’s debut film refugee complete 21 year’s, kareena kapoor share a video)

हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “21 वर्ष, आभारी, आनंदी, भाग्यवान, प्रेरित, भावना, 21 वर्ष अजून येणार आहेत… मी तयार आहे. नेहमीच पाठिंबा आणि प्रेम दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.” करीनासोबतच अभिषेक बच्चनला देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण करून 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. त्याने देखील ‘रिफ्यूजी’ चित्रपटातून त्याच्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली होती. त्यांच्या या चित्रपटात जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी आणि अनुपम खेर हे महत्वाच्या भूमिकेत होते.

‘रिफ्यूजी’ या चित्रपटाची कहाणी केकी एन दारूवाला यांच्या ‘लव्ह ॲक्रोस द सॉल्ट डेझर्ट’ या कथेशी प्रेरित होती. ही कथा एका मुस्लिम मुलावर आधारित होती. जो भारत आणि पाकिस्तानच्या सैनिकांना मदत करतो. या चित्रपटातील अभिषेक बच्चनच्या पात्राचे नाव रिफ्यूजी हे होते, तर करीना कपूरचे नाव नाजनीन हे होते.

‘रिफ्यूजी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल करू शकला नाही. परंतु या चित्रपटाचे संगीत खूप लोकप्रिय झाले होते. जावेद अख्तर यांनी या चित्रपटातील गाणी लिहिली होती, तर अनु मलिक यांनी या गाण्यांना संगीत दिले होते. या चित्रपटातील गाणी सोनू निगम, सुखविंदर सिंग, अलका याग्निक, शंकर महादेवन आणि उदित नारायण यांनी मिळून गायली होती. अनु मलिक आणि जावेद अख्तर यांना या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते.

करीना कपूर खानला अनेक पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटासाठी सर्वोत्तम पदार्पणाचा पुरस्कार भेटला आहे. करीनाने तेव्हापासून एक दीर्घ प्रवास केला आहे. तिने एक अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत एक वेगळीच जागा निर्माण केली आहे. तिने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. केवळ 2017 हे वर्ष सोडून प्रत्येक वर्षी ती पडद्यावर झळकली आहे.

करीना ही लवकरच आमिर खानसोबत ‘लाल सिंग चड्डा’ या चित्रपटात दिसणार आहे. आमिर आणि करीनाचा हा तिसरा एकत्र चित्रपट आहे. याआधी त्या दोघांनी ‘तलाश’ आणि ‘3 इडियट्स’ या चित्रपटात काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.