Wednesday, July 3, 2024

नवरीसाठी आवडता बर्गर ते वऱ्हाड्यांची चिकन-मटनपासून सगळीच सोय; पाहा रनबीर-आलियाच्या लग्नातील मेन्यू

बॉलिवूडचा चॉकलेट बॉय रणबीर कपूर ( Ranbir Kapoor)आणि आलिया भट्टच्या  (Alia Bhatt)  लग्नाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. या शाही विवाह सोहळ्याच्या बातम्या आणि त्यासंबंधीचे अनेक अपडेट समोर येत असून अत्यंत भव्यदिव्य असा हा विवाह सोहळा असणार आहे. मुंबईच्या आरके स्टुडिओमध्ये या लग्नाचा बार उडणार असून चित्रपट जगत तसेच अनेक क्षेत्रातील दिग्गज कलाकार या लग्नाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या खास लग्नासाठी येणाऱ्या खास पाहुण्यांसाठी जेवणाचीही खास सोय करण्यात आली आहे. काय आहेत हे खास मेनू चला जाणून घेऊ. 

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. आता लग्नाचा मेनू समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नासाठी स्वयंपाक करण्यासाठी दिल्लीहून शेफ ना बोलावण्यात आले आहे. या लग्नात तंदुरी पदार्थांपासून ते व्हेज आणि नॉनव्हेजपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध होणार आहेत. लग्नात दाल मखनी, पनीर टिक्का, भात आणि रोटी असे व्हेज पदार्थ बनवले जात आहेत. तर दुसरीकडे मांसाहारी पदार्थांमध्ये चिकन, मटण आणि तंदुरी पदार्थ असतील. एवढेच नाही तर आलिया भट्टसाठी व्हेगन बर्गरचा वेगळा स्टॉल उभारण्यात येणार आहे. आलिया आणि तिची मैत्रिण अनुष्का रंजन या शाकाहारी बर्गरच्या चाहत्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी खास स्टॉल उभारण्यात येणार आहे.

आलिया प्रमाणेच रणबीरसाठीही जेवणाची खास सोय करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे रणबीरने एक खास विनंतीही केली आहे. रणबीरला त्याच्या चित्रपटातील गाणी लग्नात लावायची नाहीत असे सांगितले जात आहे. त्याला त्याचे लग्न खाजगी आणि साधे ठेवायचे आहे. तसेच या लग्नाची जास्त चर्चा न होता त्याला हा विवाह सोहळा पार पाडायचे आहे असे बोलले जात आहे. त्यामुळे रणबीरच्या इच्छेप्रमाणे सगळी सोय करण्यात आली आहे. आता या लग्नाला थोडाच अवधी शिल्लक असल्याने त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा