स्वरकोकीळा लता मंगेशकर यांचे आज (६ फेब्रुवारी) रोजी निधन झाले आणि संपूर्ण देश दुःखाच्या सागरात लोटला गेला. लता मंगेशकर म्हणजे भारतीय संगीत सृष्टीला पडलेले एक विलोभनीय असे स्वप्न होते. जे स्वप्न कधी तुटच नाही असेच सर्वांना वाटत होते, मात्र नियतीच्या मनात वेगळेच होते. दीदींनी संगीतात असे कर्तृत्व केले की, भारतीय संगीत म्हटले की, लता दीदी असे नाव सर्वांच्या तोंडात येते. आज ज्यांच्या गळ्यात स्वतः सरस्वती देवीने वास केला अशा लता दीदी आपल्याला सोडून गेल्या. मात्र त्यांच्या आठवणी, त्यांची गाणी, त्यांचे अनेक किस्से कायमच सर्वांच्या स्मरणात राहतील. लता दीदींनी त्यांच्या आयुष्यातील तब्ब्ल ८० वर्ष गाण्याला आणि संगीताला समर्पित केली होती. दीदींच्या आयुष्यात गाणं खूपच महत्वाचे होते हे तर सर्वश्रुत आहेतच, मात्र दीदींना गाणे आणि संगीत या व्यतिरिक्त देखील अनेक इतर गोष्टींमध्ये स्वारस्य होते. या लेखातून आपण लता दीदींच्या छंदांबद्दल जाणून घेऊया.
लता दीदींना शरद ऋतू खूपच आवडायचा तर सकाळी सूर्योदय होण्याआधी असलेली वेळ किंवा वातावरण त्यांना खूपच प्रिय होते. संगीत क्षेत्रात आपल्या आवाजाने गाण्यांना निखरून काढणाऱ्या दीदींना प्रकाशोत्सव अर्थात दिवाळी खूप आवडायची.
लता दीदींना पांढरा रंग खूपच आवडायचा. शांती, निरागसता आणि स्वच्छतेचे प्रतीक असणारा हा रंग साधेपणा आणि सात्विकता देखील दाखवतो. दीदी सुद्धा अशाच होत्या. अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असलेल्या दीदी नेहमीच पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसायच्या. त्यांना पांढरी फुलं देखील खूप आवडायची. नेहमीच त्या त्यांच्या केसांमध्ये पांढरी फुलं माळताना दिसायच्या. विशेष म्हणजे दीदींचे त्यांच्या केसांवर खूपच प्रेम होते. त्या त्यांच्या केसांची खूपच निगा घ्यायच्या. त्या नेहमीच दोन वेण्यांमध्ये दिसायच्या. याशिवाय दीदींना हिऱ्याच्या बांगड्या देखील खूपच आवडायच्या.
लता मंगेशकर यांना भारतातले मुंबई आणि परदेशातील न्यूयॉर्क शहर खूपच आवडायची. तर ग्रंथांमध्ये ज्ञानेश्वरी, गीता, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण, महर्षि अरविंद यांचे साहित्य देखील आवडायचे. दीदींना वीणा वाजवायला देखील खूपच आवडायची. यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल, टेनिस हे खेळ देखील खूपच आवडायचे. क्रिकेटबद्दल त्यांचे असलेले प्रेम वेळोवेळी सर्वांसमोर आले. सचिन तेंडुलकर त्यांना विशेष प्रिय होता. तो देखील दीदींना ‘आई’च म्हणायचा. लता दीदींचा आवडता छंद म्हणजे फोटोग्राफी. त्यांना फावल्या वेळात फोटो काढायला खूपच आवडायचे. त्या उत्तम स्वयंपाक देखील करायच्या.
हेही वाचा :