दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो; धर्मेंद्र यांना म्हणाल्या, ‘साहेबांनी डोळे…’


बॉलिवूड चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. एव्हरग्रीन अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी बुधवारी (७ जुलै) सकाळी मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांपासून ते दिग्गज अभिनेत्यांपर्यंत सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली. यादरम्यान सर्वाधिक कोण खचलं असेल, तर त्या म्हणजे दिलीप यांच्या पत्नी सायरो बानो. यादरम्यान त्यांनी दिलीप यांचे पार्थिव पाहून जे म्हटले, त्यामुळे तिथे उपस्थित अभिनेते धर्मेंद्र यांना खूपच दु:ख झाले. दरम्यान झालेली घटना धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर सांगितली आहे.

दिलीप यांच्या निधनानंतर त्यांचे पार्थिव रुग्णालयातून त्यांच्या पाली येथील घरी नेण्यात आले. तिथे त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी दिग्गज कलाकार उपस्थित होते. यात शबाना आझमी यांच्यानंतर धर्मेंद्र हे त्या मोजक्या व्यक्तींपैकी एक होते, जे सर्वप्रथम अंतिम दर्शन घेण्यासाठी पोहोचले होते. (Legend Actor Dilip Kumar Funeral Seeing Dilip Sahab Body Saira Banu Said Dharmendra Look Sahab Has Blinked)

धर्मेंद्र यांनी रात्री उशिरा अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला. त्यात ते दिलीप यांचे पार्थिव शरीर आपल्या हातात घेऊन फारच भावुक झाल्याचे दिसत आहेत. हा फोटो शेअर करून त्यांनी लिहिले की, “सायरा यांनी जेव्हा म्हटले की, धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले आहेत…’ मित्रांनो, जीवच गेला माझा. देवा माझ्या प्रिय भावाला स्वर्ग लाभो.

यानंतर त्यांनी आपल्या पुढच्या ट्वीटमध्ये लिहिले की, “मित्रांनो मला देखावा करता येत नाही. मात्र, मी आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. आपला समजून बोलत आहे.”

‘या’ दिग्गज मंडळींनी लावली हजेरी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे, शाहरुख खान, अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रणबीर कपूर, करण जोहर, शबाना आझमी, विद्या बालन, अनुपम खेर, अनिल कपूरसह इतर दिग्गज मंडळी दिलीप साहेबांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. त्यांनी दिलीप यांना श्रद्धांजली वाहिली. बुधवारी सायंकाळी ४.३० वाजता जुहूच्या स्मशानभूमीत अंतिम निरोप देण्यात आला.

दिलीप कुमार यांची कारकीर्द
बॉलिवूडला दिलीप कुमार यांनी एकापेक्षा एक असे चित्रपट दिले. त्यांनी सन १९४४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाला दुर्लक्षित करण्यात आले होते. त्यानंतर प्रदर्शित झालेल्या ‘प्रतिमा’ (१९४५) आणि ‘नौकाडूबी’ (१९४७) हे चित्रपट सपशेल फ्लॉप ठरले होते. यानंतर त्यांनी ‘जुगनू’ (१९४७) या चित्रपटात काम केले. हा चित्रपट हिट झाला होता. यानंतर ‘शहीद’ (१९४८) चित्रपटही यशस्वी ठरला. यासोबतच ते स्टार म्हणून नावारुपाला आले.

कारकिर्दीत त्यांनी एकूण ६२ चित्रपटात काम केले. त्यातील ५ चित्रपटात त्यांनी पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली. त्यांनी एकूण ५७ चित्रपटात हिरो म्हणून काम केले. त्यात १९४७ ते १९९६ दरम्यान २५ चित्रपट फ्लॉप झाले. त्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या २ चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी १९४७ ते १९७४ दरम्यान ३० हिट चित्रपटात काम केले. यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारलेल्या ३ चित्रपटांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्यांचे हिरो म्हणून २३ चित्रपट फ्लॉप आणि ३४ चित्रपट हिट ठरले. त्यांनी केलेल्या एकूण ६२ चित्रपटांमध्ये २५ फ्लॉप आणि ३७ हिट ठरले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर

-वाढदिवशी धोनीच्या एक्स गर्लफ्रेंडने शेअर केले बिकिनीमधील फोटो; म्हणाली, ‘तू आणि मी…’


Leave A Reply

Your email address will not be published.