Monday, October 14, 2024
Home मराठी कोकणाच्या विकासाबाबत महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, ‘रस्त्यावरचे खड्डे…’

कोकणाच्या विकासाबाबत महेश मांजरेकरांनी व्यक्त केली खंत, म्हणाले, ‘रस्त्यावरचे खड्डे…’

मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी कोकणाच्या विकासावर भर दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे. कोकण हा एक नैसर्गिक सौंदर्याने नटलेला प्रदेश आहे, परंतु त्याच्या विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ‘करून गेलो गाव’ या मालवणी भाषेतील नाटकाच्या शंभराव्या प्रयोगाच्या निमित्ताने महेश मांजरेकर यांनी ‘झी 24 तास’ या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी कोकणाच्या विकासावर आपलं स्पष्ट मत मांडलं.

महेश मांजरेकर म्हणाले की,  “मी मूळचा कोकणातला आहे. त्यामुळे कोकणाबद्दल मला प्रचंड प्रेम आहे. आज लोक मालदिव, फुकेट, गोवा अशा अनेक ठिकाणी फिरायला जातात. पण, आपल्या कोकणाला सुद्धा अप्रतिम सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे,”

“आज गोवा या राज्याची आर्थिक स्थिती केवळ पर्यटनामुळे एवढी पुढे गेली आहे. आपल्याला सुद्धा कोकणाच्या रुपात ही नैसर्गिक देणगी लाभलेली आहे. मला जगात सर्वात सुंदर कोकण वाटतं. हा एकमेव प्रदेश असा आहे जिथे तुम्हाला 5-5 मिनिटांच्या अंतरावर धबधबा, नद्या, डोंगर, समुद्रकिनारे दिसतात. अशा प्रदेशाकडे दुर्लक्ष झालं याची खंत वाटते,” असं ते म्हणाले.

महेश मांजरेकर यांनी कोकणाच्या रस्त्यांबाबतही आपली नाराजी व्यक्त केली. “कोकणाच्या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. मला असं वाटतं देशात जे मोठमोठे इंजिनिअर आहेत. त्यांना ट्रेनिंग ग्राऊंड म्हणून कोकणाचा रस्ता असा ठेवलाय. जेणेकरून रस्ते कसे तयार करू नयेत हे त्या इंजिनिअरला कळेल,” असं ते म्हणाले.

“आधी आमचे रस्ते बरे होते…आताची परिस्थिती पाहून चौपदरीकरण नसतं झालं, तर बरं झालं असतं असं वाटू लागलंय. चौपदरीकरण सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी रस्ते आहेत की नाही अशी शंका येते. हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि आता तरी रस्ता चांगला व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे,” असं ते म्हणाले. महेश मांजरेकर यांच्या या वक्तव्याचे कोकणातील नागरिकांनी स्वागत केले आहे. त्यांनी कोकणाच्या विकासासाठी राज्य सरकारने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. (Mahesh Manjrekar expressed regret about the development of Konkan)

आधिक वाचा-
माधुरीसोबत हिट देऊन एका रात्रीत बनला स्टार, तर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं होतं संजय कपूरचं नाव
कंगना रणौतचा नवरात्री स्पेशल लूक; शेवटचा फोटो आहे खास

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा