Saturday, July 27, 2024

कोरोना रुग्णांना मदत करण्यासाठी भरत जाधवने लढवली अनोखी शक्कल, वाचून तुम्हीही म्हणाल ‘एकच नंबर’

संपूर्ण देशात कोरोनाचा कहर वाढताना दिसत आहे. अशामध्ये प्रशासनासोबतच समाजातील अनेक व्यक्ती स्वतःची आणि कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन करत आहेत. तरीही नागरिक ऐकत नसल्याने, सध्या महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊनचा पर्याय निवडला आहे. सध्या परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड देखील उपलब्ध होत नाहीयेत. या बिकट परिस्थितीचा विचार करून प्रत्येकानेच‌ देशाप्रती असलेले आपले कर्तव्य बजावले पाहिजे. अशातच मराठमोळा अभिनेता भरत जाधवने समाजाप्रती असलेला त्याचा खारीचा वाटा उचलत कोरोना रुग्णांसाठी अनोखी शक्कल लढवली आहे.

अभिनेता भरत जाधवने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने आपण कोरोना रुग्णांना कशाप्रकारे मदत करू शकतो हे सांगितले आहे. सोशल मीडियावरील अशीच एक पोस्ट वाचून त्याने त्याच्या सोसायटीमध्ये एक नवीन आणि वेगळीच योजना राबवली आहे. आपण देखील यांचे अनुकरण करून समाजाला मदत करू शकतो, असे सांगितले आहे.

https://www.instagram.com/p/COAPDnOBa3f/?utm_source=ig_web_copy_link

भरत जाधवने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, “माझ्या सोसायटीमध्ये 4 जण कोरोना पॉझिटिव्ह होते. त्यांना रुग्णालयात बेड मिळत नव्हते. त्यात प्रत्येकाचे फ्लॅट 1BHK, त्यांच्या घरात देखील वृद्ध पालक, त्यामुळे मी माझ्या सोसायटीमधील दोन रिकामे फ्लॅट ताब्यात घेतले आणि तिथे पॉझिटिव्ह रुग्ण शिफ्ट केले. दार उघडून जो तो जेवण, नाष्टा आणि औषध देत होता.”

पुढे त्याने लिहिले की, “रिकाम्या फ्लॅट धारकांचा सहा महिन्यांचा मेन्टेनेंस माफ केला, यामुळे त्यांनी सहकार्य केले. 15 दिवसांनी सगळेजण बरे झाले. आता तेच फ्लॅट इमर्जन्सीसाठी राखून ठेवले आहेत. हा होता माझा छोटासा प्रयत्न. आपल्या सगळ्यांचीच ही वेळ संकटातील आहे. रिकामी घरे, बंगले, फ्लॅट, हॉल, गाळे या समाजासाठी उपयोग व्हावा. हीच वेळ आहे पुढे येऊन आपले कर्तव्य करण्याची.”

भरत जाधवने केलेल्या या पोस्टवर त्याला खूप प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण त्याच्या या कामाचे कौतुक करत आहेत, तर अनेकांनी इतरांना असेच काहीतरी आपण देखील केले पाहिजे असे सांगितले आहे.

कोरोना काळात बॉलिवूडमधील अनेक कलाकार बाहेर गावी जाऊन सुट्ट्या साजऱ्या करत आहेत. तिथे मराठी कलाकार आज समाजाच्या हिताचा विचार करून मदत करायला पुढे येत आहेत, असे म्हणून त्याच्या एका चाहत्याने त्याच्या या संकल्पनेचा आदर करून त्याचे कौतुक केले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘आपल्यामुळे आई- वडिलांच्या डोळ्यात आनंद…’, म्हणत भरत जाधवने दिल्या विमान प्रवासाच्या जुन्या आठवणींना उजाळा
अभिनेता भरत जाधवच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या बाबतीत घडली ‘ही’ सही गोष्ट

हे देखील वाचा