Tuesday, April 23, 2024

‘काय धाड नाय भरली तुला, लै जगनार हायस तू’, पाहा किरण माने असं कुणाबद्दल बोलले

मुलगी झाली हो‘ या मालिकेतील कलाकारांसोबत वाद झाला आणि अचानक मराठी मनोरंजनविश्वात किरण माने हे नाव प्रसिद्ध झाले. किरण माने यांना त्यांच्या त्या विशिष्ट वादामुळे मोठ्या प्रमणावर लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ते मराठी ‘बिग बॉस‘मध्ये देखील झळकले होते. या शोमध्ये त्यांच्या लोकप्रियतेत खूपच वाढ झाली. त्यानंतर त्यांना त्यांना तुफान प्रसिद्धी देखील मिळाली. सोशल मीडियावरही किरण माने नेहमीच सक्रिय असतात. ते सतत सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत लाइमलाइट मिळवत असतात. आता पुन्हा एकदा किरण माने त्यांच्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

पोस्ट करताना किरण माने (Kiran Mane) यांनी लिहिले की, “…माझी फलटनची सुलामावशी ! लहानपणी मी लै लाडका तिचा…अजूनबी कुठल्या लग्नसमारंभात आली की, माझा किरन्या कुठंय..माझा किरन्या कुठंय. करत शोधत येती… लहानपणी सुट्टीत मी फलटनला गेलो की म्हैना-म्हैनाभर तिच्याकडंच असायचो… आबा आणि मावशीचं मला कुठं ठिवू आणि कुठं नको असं व्हायचं… मुलखाचं लाड करून घेतलं मी मावशीच्या राज्यात.

…माझ्या मावशीनं आयुष्यातले लै भयान चढउतार पचवलेत भावांनो. तरूणपणी टोकाचं वैभव आनि ऐश्वर्य अनुभवलं आणि पोरं मोठी होता-होता जीवघेनी गरीबी, अपार दु:ख, भयान संकटांचाबी सामना केला. पन कुठल्याही क्षनी मावशी मला हतबल – निराश दिसली नाय.. येईल त्या परीस्थितीला हिमतीनं आणि हसतमुखानं तोंड दिलं… लै खमकी आणि जबराट हाय माझी मावशी ! माझ्यावर तिचीच सावली हाय… आज मावशीला पुन्हा सगळं ऐश्वर्य लाभलंय.. परिस्थिती बदलत र्‍हायली पण माझी मावशी नाय बदलली.. जशी पूर्वी होती तशीच अजूनबी हाय..

…या दोन वर्षांत दोन वेळा नातींच्या लग्नात भेटली. दोन्ही वेळा आधीच फोन आला होता… किरन्या..येनार हायेस ना लग्नाला? शुटिंग फिटींगची कारनं सांगीतलीस तर बघच. किती दिस झालं भेटला न्हाईस. मी म्हणल, येनारय गं. तुला भेटायसाठीच तर सुट्टी काढली..भेटल्यावर मिठी मारुन, तोंडावरनं मायेनं हात फिरवत, कानशीलावर बोटं मोडत म्हणाली, रोज टी.व्ही.त बघती तुला.. नातींना सांगती ए पोरींनो मला किरन्याचा पोग्राम लावून द्या.. त्या लावत्यात मग. फलटनमधल्या सगळ्या बायका म्हणत्यात त्यो बिगबाॅसमधला किरन माने तुमचा पावना हाय व्हय? आधी एका मालिकेत इलास पाटील झाल्याला?’ मी म्हणती, आवो पोरगा हाय माझा. त्यांना खर वाटत नाय. आज फोटू काढ आपला म्हंजी दाखवीन सगळ्यांना..”

फोटो काढताना हळूच मला म्हन्ली, “मला वाटायचं पोरगं वाया गेलं नाटकाच्या नादानं.. आता काय हाताला लागत नाय.. लै काळजी वाटायची तुझी.. पण आज तुझं नांव झालेलं बघून जीवाला बरं वाटतं. अजून लै मोठ्ठा हो. कष्टाला कमी पडू नकोस. कुणी तुझ्या पोटावर पाय आनला तरी त्याचं वाईट चिंतू नकोस. तुझ्या बापासारखा निर्मळ मनाचा र्‍हा. हरीबुवा तुला काय बी कमी पडू देनार नाय. आ हितनं फुडचं तुझं यश बघायला मी राहती का नाय कुनाला ठावं..”… मला कसंतरीच झालं. डोळ्यातलं पानी लपवत हसत म्हणालो, मावशे, काय धाड नाय भरली तुला. लै जगनार हायस तू.. मावशी कसंनुसं हसली.. माझ्या काळजात उगीचंच कालवाकालव झाली..’मावशी’ ही गोष्टच नादखुळा निर्मान केलीय निसर्गानं गड्याहो ! मावशे लै लै लै जग. आनंदात रहा. तुला अभिमान वाटंल असंच काम करंल तुझा किरन्या.”

किरण माने यांच्या या पोस्टचे नेटकाऱ्यानी देखील कमेंट्स करत त्यांचे कौतुक केले आहे. तसेच काही नेटकरी किरण माने यांच्या मावशीला उदंड आयुष्य लाभो, अशी प्रार्थना करत आहेत. (Marathi actor Kiran Mane shared the post on Instagram)

अधिक वाचा- 
अभिनेता शशांक केतकरच्या ‘त्या’ फोटोवर पत्नीची भन्नाट कमेंट, म्हणाली “तुझी नजर..”
‘पाऊस अन् उन्हाळा…’ अक्षय कुलकर्णीची ‘ती’ पाेस्ट चर्चेत

हे देखील वाचा