Sunday, June 23, 2024

‘आनंद देण्यासाठी श्रीमंत असण्याची नाही, तर…’ अभिनेता सुयश टिळकची हृदयस्पर्शी पोस्ट इंटरनेटवर होतेय तूफान व्हायरल

‘का रे दुरावा’ मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता सुयश टिळक आपणा सर्वांनाच माहिती आहे. यात त्याने जय ही व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रचंड गाजली. केवळ मालिकेतच नव्हे, तर सुयशने बऱ्याच नाटकात आणि चित्रपटात अभिनय करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. याशिवाय तो चाहत्यांमध्ये सतत त्याच्या पोस्टमुळे चर्चेत असतो. आता अभिनेता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

नुकतेच सुयशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो काही लहान मुलांसमवेत दिसला आहे. एवढेच नव्हे, तर तो त्यांना खायला बिस्कीटही देताना दिसला. वास्तविक अलीकडेच सुयश काही लहान मुलांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याने त्यांच्यामध्ये खाऊवाटप देखील केले, ज्याचे फोटो सुयशने त्याच्या अकाऊंटवर शेअर केले आहेत.

हे फोटो शेअर करत, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “असे निरागस लोक, जे माझ्या हृदयाला स्पर्श करतात. त्यांच्याकडे फक्त प्यूअर वाईब आणि सकारात्मक भावना असतात. रिअल लव्ह. माझ्या चेहऱ्यावर सहजतेने हास्य आणण्यासाठी मी या लहान मुलांचे आभार मानणे पुरेसे असु शकत नाही. आपल्या सभोवतालच्या प्रत्येकाशी दयाळू राहा आणि खरोखरंच तुम्हाला छान वाटेल. मी लवकरच या लहान मुलांचे फोटो शेअर करेन. प्रेमाचा प्रसार करा. एखाद्याला आनंदी करण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही. फक्त आपला आनंद इतरांसोबत शेअर करा आणि तुम्हाला जग हे एक चांगले स्थान वाटेल.” चाहत्यांकडून त्याच्या या कार्याचे कौतुक होत आहे. तसेच चाहत्यांव्यतिरिक्त अनेक कलाकारांनी देखील यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या पोस्टनंतर त्याने लहान मुलांचे स्वतः काढलेले फोटो देखील शेअर केले आहेत. जे आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. चाहत्यांसोबत कलाकारांनाही हे फोटो आवडले आहेत.

सुयशच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तो ‘का रे दुरावा’, ‘बाप माणूस’, ‘सख्या रे’, ‘शुभमंगल ऑनलाइन’ या मालिकेतील त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. त्याने झी मराठीवरील ‘अमर प्रेम’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. २०२० मध्ये ‘खाली पीली’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्येही प्रवेश केला आहे. यात चित्रपटात ईशान खट्टर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत झळकले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा