Thursday, September 28, 2023

“कुटुंब नाही, मला इच्छामरण सुद्धा चालेल पण…” काम नसल्याने मराठी अभिनेत्याने कोकण हार्टेड गर्लकडे मांडली व्यथा

मनोरंजनविश्वात नेहमीच चढत्या सूर्याला नमस्कार केला जातो. एखादा कलाकार यश मिळवत असेल तर सगळीकडे फक्त तोच दिसतो, मात्र तेच त्याला अपयश मिळायला लागले की त्याची किंमत कमी होते. असे फक्त हिंदी मध्येच होते का तर नाही. मराठी मध्ये देखील अशा अनेक व्यक्ती किंबहुना कलाकार आहेत, ज्यांनी त्यांची कलांनी प्रेक्षकांचे अनेक वर्ष मनोरंजन केले आणि नावलौकिक कमवला. मात्र कालानुरूप ते मागे पडले आणि त्यांची ओळख लोकांना पटेनाशी झाली. अशा अनेक कलाकारांबद्दल आपण ऐकले आणि वाचले असेल. सध्या एका पोस्टमुळे अशेच एक दिग्गज आणि जेष्ठ कलाकार गाजताना दिसत आहे.

मराठीमधील लोकप्रिय आणि प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावालकरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने अभिनेते मनमोहन माहिमकर यांच्याबद्दल सांगितले आहे. मनमोहन माहिमकर यांनी अनेक मराठी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केले आहे. माहिमकर काका म्हणून ते इंडस्ट्रीमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत. मात्र सध्या त्यांना काम मिळत नसल्याबद्दल अंकिताने सांगितले.

अंकिताने तिच्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. “गिरगावमध्ये माझे एक शूट होते आणि ते सुरु असताना मला माहिमकर काका भेटले. ज्यांना मी लहानपणापासून स्क्रीनवर पाहत आली आहे. मी त्यांना विनंती केली की आमच्या शूटमध्ये तुम्ही याल का? ते लगेच तयार होऊन आले. यानंतर मी निघत असताना ते मला म्हणाले, मुली मला काम देशील का गं. मला कामाची खूप गरज आहे.”

पुढे अंकिताने म्हटले, “त्यांच्या डोळ्यातील पाणी बघून मला फार वाईट वाटले. आज एका कलाकाराची अशी अवस्था आहे की ते माझ्याकडे काम मागत होते. माझे लग्न झाले नाही, माझ्याकडे वेळ घालवायला माझे कुटुंब नाही. मला इच्छामरण सुद्धा चालेल पण त्याचा अर्ज मी इथे भारतात देऊ शकत नाही. मला काम द्या जेणेकरुन माझा वेळ जाईल आणि मी त्यातून काहीतरी पैसे कमवू शकेल. मला फक्त पैसे नकोत तर काम करायचे आहे.

त्यांची या वयातील ही वाक्य ऐकून त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखे आहे. मी त्यांना सांगितले की मी एवढी मोठी नाही की मी तुम्हाला काम देऊ शकेन, पण माझ्या संपर्कात असलेल्या सिनेसृष्टीतील लोकांपर्यंत मी तुमचा हा मेसेज नक्की पोहोचवेन. तुम्हाला नक्की काम मिळेल जेणेकरुन तुमचा वेळ जाईल. तुमचं शेवटचं आयुष्य खूप सुखात जाईल.”

हा व्हिडिओ शेअर करताना अंकिताने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझ्यासाठी रखुमाई बनून उभी रहा मुली. मला काम हवंय!! ही वाक्य मला झोपू देणार नाहीत, त्यामुळेच मी रिल करायचं ठरवलं.” तत्पूर्वी मनमोहन माहिमकर यांनी ‘नानामामा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘भिकारी’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘वंटास’ या चित्रपटांमध्ये तर अनेक टेलिव्हिजन मालिकांमध्ये काम केले आहे.

अधिक वाचा-
शोएब इब्राहिम पत्नी अन् चिमुरड्याला घेऊन रुग्णालयातून आला बाहेर, फोटो व्हायरल
‘बाईपण भाई देवा’ फेम अभिनेत्री वंदना गुप्ते यांना अटक? प्रसिद्ध दिग्दर्शकाची पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा