Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोण आहे ‘मौका- मौका’मधील ‘हा’ अभिनेता? एका जाहिरातीने झाला रातोरात स्टार

सध्या देशभरातील सगळया क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलीय, ती भारत पाकिस्तानच्या सामन्याची. परंतु भारत- पाकिस्तान सामना म्हटलं की, चर्चा होते ती टीव्हीवरील ‘मौका- मौका’ जाहिरातीची. यंदासुद्धा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी ‘मौका- मौका’ जाहिरात लोकप्रिय होत आहे. या जाहिरातीत हातात फटाके घेऊन फिरणारा अभिनेता म्हणजे विशाल मल्होत्रा होय. अलीकडेच विशालने एका कार्यक्रमात बोलताना या जाहिरातीने त्याच्या संपूर्ण आयुष्याला कशी कलाटणी मिळाली याबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली होती. या जाहिरातीमूळेच तो यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे त्याने सांगितले होते.

क्रिकेट म्हटले की, सर्व भारतीयांना उत्सुकता असते, ती भारत पाकिस्तानच्या सामन्याची. कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्धचा सामना म्हणजे सर्व भारतीयांसाठी जणू पर्वणीच. याचबरोबर भारत- पाकिस्तान सामन्याची घोषणा होताच चर्चा असते, ती टीव्हीवरील ‘मौका- मौका’ जाहिरातीची. सामन्याची चाहूल लागताच टीव्हीवरही जाहिरात प्रेक्षकांचे मनोरंजन करायला तयार असते. यावेळी सुद्धा ही जाहिरात प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. यामध्ये एक कलाकार हातात फटाके घेऊन फिरताना दिसत आहे. तो फटाक्यांच्या बदल्यात टीव्ही एक्सचेंज करण्यासाठी आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी तरी हा सामना पाकिस्तान जिंकेल, अशी त्याला आशा आहे. या जाहिरातीत दिसणारा अभिनेता मात्र या जाहिरातीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या अभिनेत्याचे नाव आहे विशाल मल्होत्रा.

इंजिनीअरची नोकरी सोडून चित्रपटक्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आलेल्या विशालला या जाहिरातीने रातोरात स्टार केले आहे, असे तो म्हणतो. या जाहिरातीमुळेच त्याला इंडस्ट्रीमध्ये अनेक काम मिळत असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.

एका चॅनेलसोबत बोलताना विशालने सांगितल की, “मी व्यावसायाने इंजिनीअर असून एका आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये नोकरी करत होतो. 2012 मध्ये मी मुंबईला आलो. त्यावेळी ‘रागिणी MMS 2’ या चित्रपटात कॅमिओ केला होता. हा आयुष्यातील संघर्षाचा काळ होता. याचवेळी या जाहिरातीची ऑफर आली. त्यांना एक असा कलाकार हवा होता जो थोडासा पाकिस्तानी व्यक्तीसारखा दिसेल. आणि याच आधारावर माझी निवड झाली होती.”

“दोन दिवसाची जाहिरात होती. मी शूटिंग पूर्ण केली आणि विषय संपवून टाकला. परंतु जाहिरात ज्यावेळी प्रदर्शित झाली आणि प्रेक्षकांसमोर आली, तेव्हा त्याला इतका चांगला प्रतिसाद मिळाला, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती. त्या काळात मिम्स इतके प्रसिद्ध नव्हते, परंतु या जाहिरातीमुळे खूप मोठ्या प्रमाणावर मिम्स बनवले जाऊ लागले,” असे तो पुढे बोलताना म्हणाला.

“‘ओएलएक्सवर फटाके विक, तू पाकिस्तानला निघून जा’ असे अनेक सल्ले लोक त्यावेळी देऊ लागले. जेव्हा भारत सामना जिंकायचा, तेव्हा माझे रडके मिम्स सोशल मीडियावर प्रसिद्ध व्हायचे. यामुळे मी प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध झालो होतो,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.

‌या प्रवासाबद्दल पुढे बोलताना विशालने सांगितले की, “जाहिरात लोकप्रिय झाल्यानंतर निर्मात्यांनी मला पुन्हा एकदा बोलावले, यावेळी मला सगळ्या देशाच्या क्रिकेट संघाची जर्सी घालायला लावली. परंतु सगळ्यात जास्त प्रसिद्धी आणि लोकप्रियता पाकिस्तानी जर्सी घालूनच मिळाली. ज्याची तुलनाच होऊ शकत नाही. जाहिराती लोकप्रिय होत होत्या, त्यामुळे स्टार स्पोर्ट्सवाल्यांनी सुद्धा माझ्यासोबत करार करून घेतला होता. सर्वात मजेशीर म्हणजे, या जाहिरातीमुळे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींचे सुद्धा प्रेम मिळाले. ‘धीर धर एक दिवस फटाके नक्की फोडू’ असे गमतीशीर संदेश सुद्धा येतात. अनेक पाकिस्तानी लोक या जाहिरातीमुळे आम्हाला खूप हसू येते, अशी प्रतिक्रिया सुद्धा देतात.”

यावेळी आपल्या क्रिकेट प्रेमाबद्दल बोलताना विशाल मल्होत्रा म्हणतो की, “2015 पूर्वी मला क्रिकेटमध्ये अजिबात रस नव्हता. परंतु या जाहिरातीनंतर मला क्रिकेट आवडू लागले. आता मी प्रत्येक सामना बघतो. महत्वाचे म्हणजे भारत आणि पाकिस्तानमधील सामना तर न चुकता बघतो. यावेळी सुद्धा 24 ऑक्टोबरच्या सामन्यासाठी आधीच प्रोडक्शनकडून सुट्टी घेतली आहे.”

“या जाहिरातीमुळे माझे सगळे आयुष्य बदलून गेले,” असेही विशालने सांगितले. “या क्षेत्रात उतरणाऱ्या प्रत्येकाला असे वाटत असते की, या प्रोजेक्टनंतर आपले सगळे आयुष्य बदलून जाईल. अगदी तसेच माझ्या बाबतीत झाले. एका रात्रीत माझे सगळे आयुष्य बदलून गेले. मला स्टार प्लसमध्ये एक कार्यक्रम मिळाला. सनम रे, सांसे सारखे प्रोजेक्ट मिळाले,” असेही तो म्हणाला.

दरम्यान या जाहिरातीमुळे त्याला मुंबईमध्ये हक्काच घर घेता आल्याची, प्रांजळ कबुली सुद्धा यावेळी विशाल मल्होत्राने दिली. एका कलाकाराच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात, परंतु या जाहिरातीमुळे माझा मार्ग सुकर झाल्याचे त्याने सांगितले. “यामुळेच या कामासाठी मी जीवतोड मेहनत घेतो, यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे झोकून देतो. नियोजनापासून शेवटच्या एडिटींगपर्यंत माझा सहभाग असतो,” असही यावेळी तो म्हणाला.

आपल्या आगामी कामाबद्दल बोलताना विशाल मल्होत्राने “सध्या मी ‘छोटी सरदारणीच्या’ शूटिंगमध्ये व्यस्त आहे,” असे सांगितले. तसेच तो चित्रपटात झळकणार असून आणखी एका सीरिजमध्ये सुद्धा दिसणार असल्याचे त्याने यावेळी स्पष्ट केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘ये है मोहब्बतें’ फेम अभिषेक मलिकने गर्लफ्रेंडसोबत गुपचूप थाटला संसार; फोटो जोरदार व्हायरल

-व्वा! घटस्फोटानंतर बिनधास्त लूकमध्ये दिसली अभिनेत्री समंथा; बेस्ट फ्रेंडसोबतचा मजेशीर व्हिडिओ केला शेअर

-आर्यनच्या अटकेवर प्रसिद्ध निर्मात्यांनी व्यक्त केले दु:ख; म्हणाले, ‘बिचारा मुलगा खूप…’

हे देखील वाचा