Wednesday, June 26, 2024

‘अभिनेता होऊन फक्त पैसा, प्रसिद्धी…’, किरण मानेंची पोस्ट प्रचंड व्हायरल, लोक म्हणाले, ‘किरणदा…’

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले अभिनेते किरण माने यांनी काही दिवसांपूर्वी एक अलिशान गाडी खरेदी केली होती. यावरून त्यांना ट्रोल करण्यात आले होते. या ट्रोलिंगला किरण माने यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. किरण माने यांनी ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक डॉ. आ.ह. साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. तसेच, त्यांनी ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

किरण माने (Kiran Mane ) यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “…मागच्या आठवड्यात मी मर्सिडिज बेन्झ घेतल्याची पोस्ट केली होती. खूप मोठी गोष्ट नव्हती. सेकंडहॅंड मिळाली म्हणून घेतलीवती. सहज आनंद शेअर करावा हा उद्देश होता. अचानक, अनपेक्षितपणे माझ्या चाहत्यांनी भरभरून आनंद व्यक्त केला. त्याचबरोबर तीनचार जणांनी मेसेंजरमध्ये येऊन ट्रोलही केलं. “मराठी कलाकार असूनही तुला एवढा पैसा कसा मिळाला रे? मराठीची अवस्था तर वाईट आहे, मग कुठला मार्ग निवडलास? असा सूर होता. मला हसू आलं. म्हणावंसं वाटलं, जो कलाकार आजच्या काळात डाॅ. आ.ह. साळुंखे तात्यांच्या विचारांनी प्रभावित झालाय, त्याला वाममार्गाला न जाताही श्रीमंत आणि सुखी होण्याची दुसरी ‘कला’ही साधलेली असते.

अभिनयकलेच्या ध्यासापोटी साहित्य, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करता-करता नकळत माझ्या आयुष्यात आलेला ‘परीस’ म्हणजे डाॅ.आ.ह. साळुंखे. कलावंतांना यशासोबत पैसा, मानसन्मान, फेम, सुखसुविधा सगळं-सगळं मिळतं… ते मिळण्यात वाईट काहीच नाही. त्यापाठीमागे भयाण संघर्षही असतो. त्याचबरोबर आ.ह. तात्या सांगतात की, हे स्वागतार्ह आहेच, पण कला ही केवळ या गोष्टी मिळवण्याचं साधन मात्र नाही. कलेच्या स्पर्शानं माणूस उन्नत आणि उमदा बनायला पाहिजे.

मला पूर्वी लै प्रश्न पडायचे. ‘मी अभिनेता कशासाठी व्हायचं??? फक्त पैसा, प्रसिद्धी हवं असेल तर ती इतर गोष्टी करूनही मिळू शकते? मग मला कलाकार होऊन वेगळं काय मिळवायचंय??? माझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तात्यांच्या लाखमोलाच्या विचारांनी मला दिली. तात्या सांगतात… एकदा कलेचा स्पर्श झाला, की माणसाच्या मनातली सर्व प्रकारची कुरूपता आपोआप विरून विरघळून जायला पाहिजे. अहंकाराला थारा मिळता कामा नये. मत्सरानं मन गढूळ होता कामा नये. द्वेष, तिरस्कार, तुच्छता हे टाळायला हवं. उपरोध, उपहास यांना महत्त्व आहेच. पण उपरोध वगैरेंमधे कपट वा कुटिलता असता कामा नये. जी कला सृष्टीला सुंदर बनविणार, ती कुरूप मनातून कशी जन्माला येईल ?

डिजर्व्हिंग असूनही एखादा किरकोळ पुरस्कार, अवाॅर्ड नाकारला जाणं हे माझ्या आयुष्यात अनेकवेळा झालंय… अशावेळी पुर्वी मी दु:खी व्हायचो… तिखट शब्दांत नाराजी व्यक्त करायचो. अशावेळी तात्या एखाद्या पुस्तकातनं हळूवारपणे खांद्यावर हात ठेवून कानात सांगायचे, अरे.. असं का करतोस? कला-साहित्याच्या स्पर्शानंतरही आपले विचार इतके खुजे का ठेवायचे? मी म्हणायचो, मग काय, आपला स्वाभिमानही जपायचा नाही की काय?” तात्या स्मितहास्य करून सांगायचे, आपला स्वाभिमान योग्य रीतीनं जपणं वेगळं आणि त्याला काटेरी बनवणं वेगळं. मला असं वाटतं, की सच्चा कलावंत उमदा, विनम्र आणि समंजसच असतो. तू तसा हो.

… उपजत मिळालेली अभिनयकला मी जपली. अभ्यासानं वाढवली. तिला चरितार्थाचं साधन बनवलं. पण त्या कलेबरोबर येणार्‍या जबाबदार्‍यांचं ओझं पेलवायची आणि मानापमान पचवण्याची शक्ती देणार्‍या.. माझ्या जगण्याला सुंदर अर्थ देणार्‍या… डाॅ.आ.ह.साळुंखे तात्यांना वाढदिवसाच्या खुप खुप मनापासून सदिच्छा. तात्या, खुप खुप जगा. आमचं आयुष्य प्रकाशमान करत रहा.”

किरण माने यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिले की, “किरणदा…लेखणीला तोड नाही… तात्याला वाढदिवसाच्या बक्कळ शुभेच्छा.” तर दुसऱ्याने लिहिले की, “बळीराजा ते संत तुकाराम, गौतम बुद्ध ते महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज ते उमाजीराजे नाईक यांच्यावर अपार संशोधन करत या महापुरुषांचे विविध पैलू आपल्या लेखणीतून जगासमोर मांडणारे तसेच फुले – शाहू – आंबेडकर विचारधारेला नवसंजीवनी देत असंख्य युवकांमध्ये चिकित्सा करण्याचे धाडस निर्माण करणारे संस्कृतपंडीत आणि लेखक, व्याख्याते, जेष्ठ विचारवंत, प्राच्यविद्यापंडीत डॉ. आ.ह. साळुंखे सरांना जन्मदिनाच्या मंगलमय सदिच्छ” अशा अनेक कमेंट आल्या आहेत. (Mulgi Jhali Ho fame on Star Pravah channel marathi actor kiran mane talk about acting skills and writer a h salunkhe birthday)

आधिक वाचा-
‘३ इडियट्स’मध्ये झाला दुर्लक्षित, मात्र ‘गुड्डू भैय्या’ बनून जिंकली त्याने मनं; वाचा अली फजलचा जीवनप्रवास
अनन्या पांडेचे फोटो पाहून चाहत्यांच्या काळजाचा तुकडाच पडला; पाहा झलक

हे देखील वाचा