×

राष्ट्रीय बालिका दिन: ‘दंगल’ते ‘चक दे इंडिया’सह ‘या’ चित्रपटांनी मांडली महिलांच्या जिद्दीची कहाणी

सोमवारी (२४ जानेवारी) ‘राष्ट्रीय बालिका दिन’ साजरा केला जात आहे. महिलांच्या सुरक्षितता, त्यांनी अनेक क्षेत्रांत घेतलेली उत्तुंग भरारी यावर आजच्या दिवशी दरवर्षी अनेक कार्यक्रम राबविले जातात. हा दिवस सर्वात प्रथम २००८ मध्ये साजरा करण्यात आला. याची सुरुवात महिला आणि बाल विकास मंत्रालयाने केली होती. चित्रपटक्षेत्रातही महिलांच्या विषयावर आधारित अनेक चित्रपट आजपर्यंत प्रदर्शित झाले आहेत. आजच्या बालिका दिनाच्या निमित्ताने नजर टाकूया अशाच काही महिलांवर आधारित असलेल्या चित्रपटांबद्दल.

भारतात सगळीकडे सध्या मुलींच्या अनेक समंस्याबद्दल चर्चा होताना दिसत आहे. आपल्या देशात कायद्यानुसार आणि परंपरेनुसार लग्नानंतर मुलींवर सर्वस्वी हक्क हा वडिलांचा नसून, तिच्या पतीचा असल्याचं सांगण्यात येतं. मात्र आता या कायद्यात बदल होताना दिसत आहे. राजस्थान हायकोर्टाने यावर महत्वपूर्ण निकाल देताना आता लग्नानंतरही मुलीला आपल्या वडिलांच्या जागेवर नोकरी करता येऊ शकेल, असं सांगितलं आहे. म्हणजेच मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान मानण्यात आलं आहे. सोबतच केंद्र सरकारचा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नाराही देशाला महिला सक्षमीकरणाकडे घेऊन जात असल्याचं दर्शवत आहे. आपण असे काही चित्रपट पाहुया, ज्यांनी महिलासुद्धा कोणत्याच क्षेत्रात कमी नसल्याचा संदेश दिला आहे.

दंगल
महिलांवर आधारित चित्रपटांमध्ये सर्वप्रथम नाव घेतलं जातं, ते म्हणजे बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी ठरलेल्या ‘दंगल’ चित्रपटाचं. हा चित्रपट हरियाणाचे कुस्तीपटू महावीर सिंग फोगट आणि त्याच्या दोन मुली गीता आणि बबीता यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट २३ डिसेंबर २०१६ला प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं आजही प्रचंड कौतुक केलं जातं. या चित्रपटाने कमाईचे सर्व रेकॉर्ड तोडले होते. त्या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणून ‘दंगल’ चित्रपटाचे नाव घेतले जाते. फक्त भारतातच नव्हे, तर चित्रपटाने विदेशातही कमाईचे नवनवे रेकॉर्ड केले होते. या चित्रपटात हरियाणामधील कुस्तीपटू आणि त्यांच्या मुलींची कथा चित्रीत केली गेली आहे. ज्या राज्यामध्ये सर्वाधिक महिला अत्याचाराच्या घटना घडतात, स्त्रीभ्रुण हत्या होतात, त्या राज्यातील एक सामान्य व्यक्ती आपल्या मुलींना कुस्तीच्या आखाड्यात उतरवण्याची हिम्मत दाखवतो, त्यांना पुरुषांशी दोन हात करण्याचे धडे देतो. गावकरी आणि समाजाच्या विरोधात जाऊन आपल्या मुलींना पहिलवान बनवुन इतिहास घडवतो.

चक दे इंडिया
या यादीत महिलांच्या विषयावर आधारित आणखी एक चित्रपट म्हणजे ‘चक दे इंडिया’. क्रिकेटच्या मैदानात हरवलेल्या भारतीय प्रेक्षकांना हॉकीकडे घेऊन जाणे, हे मोठे आव्हान त्यावेळी निर्मात्यांपूढे होते. आणि महिला हॉकी म्हणजे तर आणखीनच अवघड परिस्थिती होती. मात्र निर्माते आदित्य चोप्रा, लेखक जयदीप सहानी आणि शाहरुख खानने हे आव्हान स्वीकारून एका दर्जेदार चित्रपटाची निर्मिती केली. यामध्ये शाहरुख खानने साकारलेल्या धीर गंभीर भूमिकेचं सर्वत्र कौतुक केलं गेलं. लाटणं, बेलणं सांभाळणाऱ्या या भारतीय महिला आहेत, त्या छोटे कपडे घालून मैदानावर पळणार आहेत का, ना प्रेक्षक आहे ना प्रायोजक आहे, असं म्हणत या महिला संघाची थट्टा उडवली जाते आणि त्यांची परवानगीही नाकारली जाते. या पार्श्वभूमीवर त्यांच्या परदेशी जाण्यालाही परवानगी नसताना, त्या सहभागी होतात आणि इतिहास घडवतात अशी या चित्रपटाची कथा आहे.

मेरी कोम
आणखी एका जिगरबाज भारतीय बॉक्सिंगपटू मेरी कोमची कथा सांगणारा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आपल्या असामान्य कामगिरीने बॉक्सिंगमध्ये यशस्वी ठरलेल्या मेरी कोमच्या परिस्थितीवर भाष्य केलं गेलं होतं. चित्रपटात प्रियांका चोप्राने प्रमुख भूमिका साकारली होती.

कजरिया
याचबरोबर ‘कजरिया’ चित्रपटानेही स्त्रीभ्रुण हत्येविरोधात कथा रंगवली होती. महिलांसंबधित अनेक महत्वाचे विषय यामध्ये दाखवण्यात आले होते. यामध्ये एका अशा गावाची कथा रंगवली आहे, ज्यामध्ये अनेक अंधश्रद्धाना बळी पडत नवजात मुलींची हत्या केली जाते. या चित्रपटाने अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळवले होते. चित्रपट २०१५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

हेही वाचा :

Latest Post