Tuesday, April 16, 2024

दु:खद! प्रसिद्ध हॉलिवूड लेखक-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड, सत्तरच्या दशकावर केले राज्य

हॉलिवूडमधून दु:खद बातमी समोर येत आहे. ऑस्कर पुरस्काराचे नामांकन मिळालेले लेखक- दिग्दर्शक पीटर बोगदानोविच यांचे निधन झाले आहे. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी गुरुवारी (०६ जानेवारी) मध्यरात्री लॉस एंजेलिस येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांची मुलगी एंटोनिया बोगदानोविचने आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

“आपल्या प्रिय पीटरचे आज पार्किसंन्स आजारामुळे निधन झाले. या कठीण काळात तुमचे प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कुटुंब सर्वांचे आभार मानू इच्छिते,” असे त्यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले.

प्रभावशाली चित्रपट समीक्षक म्हणून सुरुवात केल्यानंतर बोगदानोविच यांनी १९६८ च्या ‘टार्गेट्स’ चित्रपटाचे दिग्दर्शनात पाऊल ठेवले. त्यापूर्वी ते १९५० च्या अमेरिकेच्या ‘द लास्ट पिक्चर शो’साठी त्यांनी सह-लेखन करण्याची जबाबदारीही पार पाडली.

पीटर बोगदानोविच यांनी १९७१ साली ‘द लास्ट पिक्चर शो’ दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांच्या प्रसिद्धीत कमालीची वाढ झाली. पुढे या चित्रपटाची तुलना १९४१ साली प्रदर्शित झालेल्या ‘सिटिझन केन’शी केली जाऊ लागली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या नामांकनासह ८ ऑस्कर नामांकने मिळाली. यासोबतच पीटर यांनी मास्क, डेझी मिलर आणि ए लाँग लास्ट लव्ह या संगीत नाटकाचे दिग्दर्शनही केले. उत्तम दिग्दर्शक असण्यासोबतच पीटर यांनी स्क्रीनसमोरही आपली प्रतिभा दाखवली. ‘द सोप्रानोस’मध्ये त्यांनी डॉक्टर मेल्फीची भूमिका केली होती.

पीटर यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर त्यांनी दोनदा लग्न केले होते. त्याने ‘लीगली युवर्स’ फेम अभिनेत्री लुईस स्ट्रॅटनशी लग्न केले होते. यानंतर त्यांनी चित्रपट निर्माती पॉली प्लॅटशीही लग्न केले. मात्र, पीटर यांनी दोन्ही पत्नींपासून घटस्फोट घेतला होता. त्यानंतर त्यांनी ‘लास्ट पिक्चर’ फेम सिबिल शेफर्ड आणि ‘प्लेबॉय प्लेमेट’ मॉडेल डोरोथी स्ट्रॅटन यांना डेट केले. पीटर यांना अँटोनियो बोगदानोविच आणि शशी बोगदानोविच नावाच्या दोन मुली आहेत.

‘द लास्ट पिक्चर शो’, ‘व्हॉट्स अप डॉक’, ‘पेपर मून’ हे पीटरचे सर्वोत्कृष्ट चित्रपट आहेत.

हे देखील वाचा