Monday, July 8, 2024

तेलंगणामध्ये ‘द काश्मिर फाईल्स’ चित्रपटाचे प्रदर्शन सुरू असताना ‘पाकिस्तान झिंदाबाद’चे नारे; पाहा Video

सध्या देशभरातील चित्रपटगृहांमध्ये विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या ‘द काश्मिर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचीच चर्चा सुरू असल्याचे दिसत आहे. या चित्रपटाच्या कथेचे सध्या जगभरातून कौतुक होताना दिसत असून, चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. ‘द काश्मिर फाइल्स’ हा चित्रपट १९९० च्या काळात काश्मिरी पंडितांवर झालेल्या भीषण अन्याय आणि अत्याचारावर आधारित आहे.

याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तेलंगणामधील एका चित्रपटगृहात ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू असताना, काही अज्ञात व्यक्तींनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचे वृत्तसमोर आले आहे. या घटनेनंतर चित्रपटगृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच मारहाणीची घटना झाल्याचे वृत्तही समोर आले आहे. या घटनेने सध्या सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

हा सगळा प्रकार तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात घडला आहे. दिनांक १८ मार्च रोजी काही समाजकंटकांनी चित्रपटगृहातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी भारताविरोधी घोषणा देत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले होते. या सगळ्या प्रकाराने संतप्त झालेल्या लोकांनी या समाजकंठकांना चांगलाच चोप दिला आहे. याबाबत चित्रपटगृहाच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली मात्र त्याआधीच या अज्ञातांनी त्याठिकाणाहून पळ काढला. आता सिनेमागृहामधील सीसीटीव्ही फुटेजवरून या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

या सगळ्या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना पोलिसांनी आम्ही या घटनेचा तपास करत असून आत्तापर्यंत याबाबत कोणतीही तक्रार दाखल झाल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर काही लोक हेतुपूर्वक तेढ निर्माण करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द काश्मिर फाइल्स’ चित्रपटात अनुपम खेर, मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी यांनी प्रमूख भूमिका साकारल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

हे देखील वाचा