The Kashmir Files | ‘…म्हणून कपिल शर्माने फिल्म प्रमोशनला दिला नकार’, विवेक अग्निहोत्रींचा धक्कादायक खुलासा

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीझ झाला आहे. अशा परिस्थितीत निर्मात्यांना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करायचे होते. पण जे घडलं ते खूपच धक्कादायक होतं. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये दर आठवड्याला मोठे स्टार्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचतात. मात्र, कपिल शर्माने (Kapil Sharma) विवेक अग्निहोत्रींच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे प्रमोशन करण्यास नकार देत, या चित्रपटात कोणताही मोठा स्टार नाही, असे कारण दिले आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, “मी स्वत: त्याचा चाहता आहे, पण बॉलिवूडमध्ये नॉनस्टार दिग्दर्शक, लेखक आणि चांगल्या कलाकारांना कोणीच विचारत नाही.” खरं तर, ट्विटरवर एका युजरने विवेक यांना टॅग केले आणि ‘द कपिल शर्मा शो’मध्ये ‘द काश्मीर फाइल्स’चे प्रमोशन करण्याचा सल्ला दिला. यावर त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “द कपिल शर्मा शोमध्ये कोणाला आमंत्रित करावे, हे मी ठरवू शकत नाही. हे पूर्णपणे कपिल शर्मा आणि त्याच्या निर्मात्यांवर अवलंबून आहे. बॉलिवूडबद्दल बोलताना, एकदा श्री. बच्चन हे गांधींबद्दल म्हणाले होते, ‘तो राजा आहे, आम्ही रंक आहोत.” (the kashmir files director vivek agnihotri says kapil sharma refuse to promote movie)

दुसर्‍या ट्वीटमध्ये विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले की, “आमच्या चित्रपटात कोणताही मोठा व्यावसायिक स्टार नसल्याने, त्याने आम्हाला त्याच्या शोमध्ये आमंत्रित करण्यास नकार दिला. बॉलिवूडमध्ये नॉन-स्टार दिग्दर्शक, लेखक किंवा चांगल्या कलाकारांना कोणीच विचारत नाही.” विवेक अग्निहोत्रींच्या या ट्वीटवर चाहते जोरदार कमेंट करत आहेत आणि आपलं मत मांडत आहेत. बरेच लोक कपिल शर्माला जोरदार ट्रोल करत आहेत. मात्र, कपिल शर्माने याप्रकरणी सध्या मौन बाळगले आहे.

‘द कश्मीर फाइल्स’बद्दल बोलायचे झाले तर, चित्रपटाची कथा ९०च्या दशकात काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या निर्गमन आणि हत्या यांच्याशी संबंधित आहे. या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, भाषा सुंबळी, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ११ मार्च २०२२ला रिलीझ होणार आहे.

हेही वाचा –

Latest Post