Monday, July 13, 2026
Home साऊथ सिनेमा प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल, लावला जातोय ‘हा’ गंभीर आरोप

प्रसिद्ध अभिनेता आणि त्याच्या वडिलांवर गुन्हा दाखल, लावला जातोय ‘हा’ गंभीर आरोप

हैदराबाद पोलिसांनी तेलगू चित्रपट निर्माते बेलमकोंडा सुरेश (Bellamkonda Suresh) आणि त्यांचा मुलगा अभिनेता बेलमकोंडा साई श्रीनिवास (Bellamkonda Sai Srinivas) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघांविरुद्ध व्हीएल श्रवण कुमार नावाच्या फायनान्सरने ८५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप करत, पोलिसांना माहिती दिली आहे. शहर न्यायालयाच्या सूचनेनुसार, सेंट्रल क्राइम स्टेशन (सीसीएस) पोलिसांनी दोघांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. फायनान्सरने कोर्टात तक्रार केली होती की, निर्माता आणि त्याच्या मुलाने २०१८ मध्ये चित्रपट बनवण्यासाठी त्याच्याकडून हप्त्याने पैसे घेतले होते.

बेलमकोंडा सुरेश यांचा आरोप, जाणीवपूर्वक केली जात आहे बदनामी
फायनान्सर श्रवणने दावा केला की, निर्मात्याने मालिनी गोपीचंद दिग्दर्शित चित्रपटासाठी सहाय्यक निर्माता म्हणून कास्ट करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचवेळी बेलमकोंडा सुरेश यांनी याप्रकरणी खुलासा करण्यासाठी पत्रकार बैठक बोलावली आहे. यावेळी ते म्हणाले की, “श्रवण माझ्या गावचा रहिवासी आहे आणि तो चित्रपटाची तिकिटे मागायचा. माझ्या कुटुंबाची प्रतिष्ठा बदनाम करण्याचा हा हेतुपुरस्सर प्रयत्न आहे. त्यांच्या चित्रपटांमुळे प्रसिद्धी मिळवणाऱ्या श्रीनिवास आणि गणेश यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला आहे.”

‘पुरावे असतील तर मी प्रत्येक शिक्षेला तयार आहे’
निर्माते पुढे म्हणाले की, “मी कोणाकडून एक रुपयाही घेतला नाही. पुरावे असतील तर ते पोलिस आणि माध्यमांसमोर सादर करावेत. मी कोणत्याही शिक्षेला तयार आहे. २०१८ मध्ये ही घटना घडली होती आणि तसे असेल, तर त्याने मला एकही कॉल का केला नाही असा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी पुरावा म्हणून कॉल इतिहास सादर करावा.”

बेलमकोंडा सुरेश यांच्यावर मानहानीचा खटला दाखल
याप्रकरणी बेलमकोंडा सुरेश म्हणाले की, “जो कोणी माझ्या मुलांना दुखवण्याचा प्रयत्न करेल त्याला मी खपवून घेणार नाही. मी कायदेशीर मार्गाने त्याचे जीवन नरक बनवीन आणि मी त्याच्यावर मानहानीचा दावा करेन. ते फक्त माझ्या मुलांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामागे एक राजकारणी आहे जो आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच मी सर्व पुरावे आणि त्यांनी केलेले घोटाळे उघड करीन. मला आतापर्यंत पोलिसांकडून कोणतीही नोटीस मिळालेली नाही. गरज पडल्यास मी सहकार्य करेन.”

बेलमाकोंडा साई श्रीनिवास हा टॉलिवूडमधील एक आश्वासक स्टार आहे आणि पेन स्टुडिओ अंतर्गत ‘वीवी विनायक दिग्दर्शित छत्रपती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा