Saturday, March 2, 2024

पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

अभिनेते रमेश देव (Ramesh Deo)यांची गणना सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांमध्ये केली जाते. रमेश देव यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत सुमारे 300 हिंदी सिनेमे, 200मराठी सिनेमे, 40च्या आसपास नाटकं, शिवाय काही हिंदी, मराठी मालिकांमध्ये देखील काम केले. दुसरीकडे, त्यांच्या पत्नीबाबत बाेलायचे झाले तर, त्यांनी मराठीसाेबतच बाॅलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप साेडली आहे. अशात आज म्हणजेच साेमवारी (27 मार्च)ला सीमा देव त्यांचा 81 वा वादिवस साजरा करत आहेत. यानिमित्त जाणून घेऊया त्यांची लवस्टाेरी…

रमेश देव यांच्या चित्रपटांसोबतच त्यांचे वैयक्तिक आयुष्य देखील खूपच रंजक आहे. त्यांनी 1953 साली अभिनेत्री सीमा देव (Seema Deo) यांच्यासोबत लग्न केले होते. तब्बल इतक्या वर्षांनी आता या प्रेमळ जोडप्याची साथ सुटली आहे. पण काल, आज आणि उद्याही या जोडीची चर्चा ही होतच राहील. याचं कारण म्हणजे रील लाईफ जोडी ते रियल लाईफ पार्टनर पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अतिशय रंजक राहिलेला आहे.

अभिनेता रमेश देव आणि अभिनेत्री सीमा देव यांना मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट ऑन-स्क्रीन आणि ऑफ-स्क्रीन जोडपे म्हटले जाते. यातील सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे, या दोघांनी मराठी चित्रपटांपेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये जास्त काम केले आहे. तर आज पाहूयात कशी सुरू झाली या जोडप्याची प्रेमकहाणी!

सुरू करूया त्यांच्या पहिल्या भेटीपासूनच! या दोघांची पहिली भेटही खूपच रंजक होती. सीमा सिनेमात काम मिळावे, म्हणून फिल्मीस्थानमध्ये ऑडिशन देण्यासाठी त्यांच्या आईसोबत चर्नी रोडवरून लोकलमध्ये चढल्या. त्यावेळी सीमा अवघ्या 15वर्षांच्या होत्या. त्या त्यांच्या आईची साडी नेसून मोगर्‍याचा गजरा डोक्यात माळून ऑडिशनसाठी निघाल्या होत्या. तर दुसरीकडे ग्रँटरोडवर रमेश देव त्याच लोकलमध्ये चढले. त्यावेळी ‘आंधळा मागतो एक डोळा’ चित्रपट प्रदर्शित झाला असल्याने रमेश देव यांना लोकांनी ओळखण्यास सुरुवात केली होती. या सिनेमात रमेश यांची खलनायकाची भूमिका होती.

सीमा यांनी त्यांना पाहताक्षणीच ओळखले आणि आईला सांगितले, हेच ‘आंधळा मागतो एक डोळा’ सिनेमातील दुष्ट खलनायक आहे. त्यावर त्यांच्या आईने त्यांना रागावून ‘त्यांच्याकडे बघू नको’ असे सांगितले. तसेच, सीमा यांनी लावलेल्या मोगर्‍याच्या गाजऱ्याचा संपूर्ण डब्यात सुगंध पसरला होता.

संपूर्ण डबा रिकामा असतानाही रमेश देव सीमा यांच्याच बाजूला जाऊन बसले. ते पाहून सीमाच्या आई रागावल्या. तर रमेश यांनी त्यांना ‘तुम्ही सगळा डबा विकत घेतला आहे का?’ असा प्रतिप्रश्न केला. हा प्रश्न ऐकून सीमा यांच्या आई शांत झाल्या. हीच रमेश आणि सीमा देव यांची पहिली भेट होती. पहिल्या भेटीतच रमेश सीमांच्या प्रेमात पडले. ‘सुंदर मुलगी आहे, आता हिला पटवावे, असेच त्या वेळी माझ्या मनात आल्याचे’ रमेश देव प्रांजळपणे कबूल करायचे.

रियल-लाइफ कपलने तब्बल 73चित्रपटांमध्ये पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. या दोघांचे अनेक चित्रपट पडद्यावर आले आणि प्रेक्षकांना दोघांची जोडी खूप आवडली. याच काळात दोघांनी 1962मध्ये ‘वरदक्षिणा’ हा चित्रपट केला होता. चित्रपटाच्या कथानकानुसार, सीमा यांना दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्यास मदत करताना, रमेश यांचे पात्र प्रेमात पडते. हा तोच चित्रपट होता ज्यातून दोघांनाही एकमेकांबद्दलचे प्रेम वाटू लागले आणि त्याच वर्षी दोघांनीही नात्याचा विलंब न लावता लग्न केले.

त्यांना अजिंक्य आणि अभिनव असे दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस झाला तेव्हा त्यांच्या मुलांनी हा वाढदिवस खूप जंगी साजरा करत, आई-बाबांच्या लग्नाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचे लग्न लावून दिले होते. विशेष म्हणजे यासाठी खास पत्रिका छापण्यात आल्या होत्या. या लग्नाला उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अनिल कपूर, हेमा मालिनी यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.(ramesh deo and seema deo love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
धर्म बदलल्यानंतर राखी सावंतने पहिल्यांदाच रोजा ठेवला; बुरखा परिधान केलेला व्हिडीओ व्हायरल

प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी वाराणसीतील हॉटेलमध्ये लावून घेतला गळफास

हे देखील वाचा