सिनेमात जाड स्वरातील डब होणारा राणीचा आवाजच पुढे बनला तिची ओळख, आमिरनेही मागितली होती माफी

हिंदी सिनेसृष्टीमधे आजपर्यंत अगणित अभिनेत्रींनीं त्यांच्या अभिनयाची चुणूक प्रेक्षकांना दाखवली. प्रत्येक अभिनेत्रीने तिची एक वेगळी ओळख तयार केली. जसे मधुबाला, ऐश्वर्या म्हटले की समोर येते सौंदर्य, माधुरी दीक्षित म्हटले की निखळ हास्य आणि अप्रतिम नृत्य अशीच एक वेगळी आणि अढळ ओळख तयार करणारी एक अभिनेत्री म्हणजे, राणी मुखर्जी. राणीचे नाव घेतले की, आठवते तिचा वेगळा आवाज आणि तिचे बोलके डोळे. एकेकाळी बॉलिवूडवर खऱ्या अर्थाने राज्य केलेल्या राणी मुखर्जी सोमवारी (21 मार्च) रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ती आली, तिने पाहिले, तिने जिंकले असे जर कोणी राणीबद्दल म्हटले तर ते बिलकुल अतिशयोक्ती ठरणार नाही. आज राणीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया तिची अभिनयाची कारकीर्द.

राणीचा जन्म २१ मार्च १९७८ रोजी मुंबईमध्ये एका बंगाली आणि चित्रपटांशी निगडित मुखर्जी परिवारात झाला. राणीचे वडील राम मुखर्जी हे त्याकाळचे प्रसिद्ध दिग्दर्शक, आई कृष्णा मुखर्जी पार्श्वगायिका, तर मोठा भाऊ राज मुखर्जी चित्रपट निर्माता होता. मुंबईतच राणीचे संपूर्ण बालपण गेले. १९९४ साली राणीला ‘आ गले लाग जा’ या सिनेमासाठी विचारणा झाली. मात्र, ती खूपच लहान असल्याने तिच्या आई- वडिलांनी तिला अभिनय करायला परवानगी नाकारत शिक्षण पूर्ण करण्यास सांगितले. पुढे दोन वर्षांनी राणीने बंगाली सिनेमा ‘बेयर फूल’ या सिनेमात काम केले.

त्यानंतर राणीला ‘राजा की आयेगी बारात’ या हिंदी सिनेमासाठी विचारणा झाली, आणि तिने ही ऑफर स्वीकारली. हा सिनेमा जरी फ्लॉप ठरला असला तरी, राणीला चांगली ओळख मिळाली आणि तिच्या कामाचे कौतुक देखील झाले. या सिनेमाच्या शूटिंग आधी राणीने रोशन तनेजा यांच्या अभिनयाच्या स्कुलमधून प्रशिक्षण घेतले होते. या सिनेमानंतर राणीने विक्रम भट्ट यांच्या ‘गुलाम’ या सिनेमात आमिरसोबत काम केले, आणि हा सिनेमा तुफान गाजला. या चित्रपटातील ‘आती क्या खंडाला’ हे गाणे आजही सर्वांच्या लक्षात आहे. या चित्रपटाने राणीला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे राणीचा आवाज कोणालाच आवडत नव्हता या सिनेमातही तिचा आवाज डब केला गेला. तिच्या आवाजावर कोणालाच विश्वास नसल्याने तिचा आवाज डब करण्यात आला होता.

याच वर्षी राणीने करण जोहरचा पहिला दिग्दर्शित सिनेमा ‘कुछ कुछ होता हैं’ केला आणि राणीची गणती बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाऊ लागली. या सिनेमात राणीची जरी सहाय्यक भूमिका असली, तरीही तिने तिच्या आवाजाने या भूमिकेला एका उंचीवर नेऊन ठेवले. या सिनेमात पहिल्यांदा राणीचा खरा आवाज ठेवण्यात आला होता. पुढे तिचा हा आवाजच तिची ओळख बनला. राणीने तिच्या दमदार अभिनयाने, नृत्याने सर्वच प्रकारच्या भूमिका अगदी लीलया पेलल्या. राणीने बॉलिवूडच्या सुपरहिट अशा खान त्रिकूटासोबत काम केले, शिवाय तिने गोविंदा, सैफ अली खान, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन, शाहिद कपूर, अनिल कपूर अशा अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले.

सन २००५ साली आलेल्या ‘ब्लॅक’ सिनेमाने राणीने तिच्या अभिनयाने सर्वांनाच तिचे कौतुक करण्यास भाग पडले. संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमात राणीने एका आंधळ्या आणि बोलू न शकणाऱ्या मुलीची भूमिका निभावली होती. या सिनेमात अमिताभ बच्चन यांची देखील मुख्य भूमिका होती. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले. राणीला देखील तिच्या या भूमिकेसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. या सिनेमाने राणीमधील एक प्रतिभासंपन्न अभिनेत्री जगासमोर आली.

राणीने तिच्या करियरमध्ये गंभीर, विनोदी, ऍक्शन आदी सर्व प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘वीर झारा’, ‘नो वन किल्ड जेसिका’, ‘युवा’, ‘सांवरिया’ आदी चित्रपटांमधील तिच्या सहाय्यक भूमिका देखील तितक्याच दमदार आणि लक्षात राहणाऱ्या ठरल्या. यातील काही भूमिकांसाठी तिला फिल्मफेयरचे पुरस्कार मिळाले, तर सर्वच भूमिकांसाठी तिला अनेक पुरस्कारांचे नामांकन मिळाले.

राणी आणि आमिरबद्दल एक किस्सा खूपच प्रसिद्ध आहे. आमिरला राणीचा आवाज जाड स्वरातील आणि त्रासदायक वाटायचा. तत्कालिन अभिनेत्रींच्या तुलनेत राणीचा आवाज जास्त जाड स्वरातील होता. म्हणून आमिरने ‘गुलाम’ सिनेमातील राणीचा आवाज डब करण्यास सांगितले. मात्र, आमिरचा हा निर्णय राणीला आवडला नव्हता. परंतु सिनेसृष्टीत नवीनच असल्यामुळे ती शांत राहिली. पुढे करणच्या ‘कुछ कुछ होता हैं’ मध्ये राणीचा खरा आवाज वापरला गेला, आणि सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर जेव्हा आमिरने राणीचा आवाज ऐकला, तेव्हा तो खूपच ओशाळला. कारण राणीचा आवाज खूपच सुंदर आणि शांत, मधुर होता. त्यामुळे त्याने राणीला फोन करत ‘गुलाम’मध्ये तिचा आवाज डब करण्यासाठी तिची माफी मागितली.

राणीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर तिने यशराज फिल्म्सचे सर्वेसर्वा आदित्य चोप्रासोबत लग्न केले. आदित्य अगोदरच विवाहित असल्याने राणीला खूप ट्रोल केले गेले. मात्र, आदित्यने या नात्याआधीच त्याच्या पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. राणीने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि एप्रिल २०१४ ला इटलीमध्ये खासगी स्वरूपात आदित्यसोबत लग्न केले. यादोघांना आदिरा नावाची ५ वर्षांची मुलगी आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

Latest Post