Saturday, June 29, 2024

हिंदी चित्रपटांमध्ये ग्लॅमरस ‘आई’ म्हणून मिळवली त्यांनी ओळख; पाहूयात मराठमोळ्या रीमा लागू यांच्या काही महत्वाच्या भूमिका

भारतीय चित्रपटांमध्ये नायक आणि नायिका यांसोबतच इतर अनेक कलाकारांनी सहाय्यक भूमिका करत, त्या भूमिकांना एक वेगळी ओळख आणि एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. मुख्य अभिनेता आणि मुख्य अभिनेत्री या दोन भूमिकांव्यतिरिक्त सिनेमातील इतर अनेक भूमिका महत्वाच्या असतात. अनेकदा तर हिरो आणि हिरोइनपेक्षा इतर कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटांमधील अशीच एक महत्वाची भूमिका म्हणजे ‘आई’. आपल्या मुलांना घडवणाऱ्या आईची वेगवेगळी अनेक रूपे चित्रपटांमधून आपल्याला दिसली. कणखर, प्रेमळ, भावनिक अशा अनेक भूमिकांमधून ‘आई’ प्रेक्षकांसमोर आली. ‘आई’ या भूमिकेला चित्रपटांमध्ये मानाचे स्थान मिळून देणाऱ्या आणि हिंदी चित्रपटांमधील आईला ग्लॅमरस रूप प्राप्त करून देणाऱ्या अभिनेत्री म्हणजेच रीमा लागू होय. आज रीमा लागू यांचा आज स्मृतिदिन.

रीमा लागू यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या आईकडून मिळाला होता. प्रसिद्ध अभिनेत्री मंदाकिनी भडभडे या त्यांच्या आई होत्या. लहानपणापासून आईकडून अभिनयाचे धडे गिरवल्यामुळे त्या अभिनयात अधिक सरस होत गेल्या. शिक्षणानंतर त्यांनी मराठी नाटकांमधून अभिनयक्षेत्रात प्रवेश केला. ‘घर तिघांचं हवं’, ‘चल आटप लवकर’, ‘झाले मोकळे आकाश’, ‘तो एक क्षण’, ‘पुरुष’, ‘बुलंद’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘विठो रखुमाय’, ‘सासू माझी ढांसू’ यासारख्या दर्जेदार नाटकांमधून त्यांनी स्वतःला एक सशक्त अभिनेत्री म्हणून सिद्ध केले. या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्या काही दमदार भूमिका.

मैंने प्यार किया 
राजश्री प्रॉडक्शनच्या १९८९ साली आलेल्या ‘मैंने प्यार किया’ सिनेमात रीमा यांनी सलमान खानची आई ‘सुमित्रा’ची भूमिका साकारली होती. अतिशय साधी, मुलाच्या आनंदात सहभागी होणाऱ्या, मुलाला त्याच्या सर्व चांगल्या निर्णयात साथ देणाऱ्या प्रसंगी कणखर अशा आईची भूमिका रीमा यांनी या सिनेमात साकारली. या सिनेमातील रीमा यांची भूमिका तुफान गाजली.

हम आपके हैं कौन? 
पुन्हा एकदा राजश्रीच्याच १९९४ साली आलेल्या ‘हम आपके हैं कौन?’ सिनेमात रीमा यांनी माधुरी दीक्षित आणि रेणुका शहाणे या दोघींच्या आईची भूमिका निभावली होती. या सिनेमातील रीमा लागू यांच्यावर आधारित ‘आज हमारे दिल मैं’ हे गाणे खूप गाजले. या सिनेमातील सामान्य घरातील साधी आई, मोठ्या मुलीच्या निधनानंतर लहान मुलीच्या संसारासाठी दुःख विसरून पुन्हा उभी राहते.

कुछ कुछ होता हैं :
१९९८ साली आलेल्या करण जोहरच्या या सिनेमात रीमा यांनी काजोलच्या आईची भूमिका साकारली होती. यात आई मुलीचे लग्न ठरले म्हणून आनंदी असते, मात्र आपल्या मुलीला तिचे प्रेम मिळाले नाही याबद्दल तिला रुखरुख देखील असते. आपली मुलगी लग्न करताना तडझोड करत आहे, हे तिला माहित असल्याने ती मुलीला लग्नासाठी तडझोड नाही तर प्रेम महत्वाचे आहे हे समजावत असते.

हम साथ साथ हैं
राजश्रीच्या १९९९ साली आलेल्या ‘हम साथ साथ हैं’ सिनेमात रीमा या चार मुलांच्या आई होत्या. ‘ममता’ असे त्यांच्या भूमिकेचे नाव होते. चार पैकी १ मोठा मुलगा सावत्र असूनही ती त्या मुलाला सख्या आईपेक्षा अधिक प्रेम देते. मात्र पुढे जाऊन लोकांच्या चुकीच्या सांगण्याला बळी पडून ती तिच्या सावत्र मुलाला दूर करते. मात्र काही काळाने तिला तिची चूक लक्षात येते आणि ती पुन्हा मुलाला घरी आणते.

वास्तव 
संजय मांजरेकर यांच्या १९९९ साली आलेल्या ‘वास्तव’ चित्रपटात रीमा यांनी दमदार आणि वास्तववादी अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली. एक आई आपल्या मुलाला मुक्ती देण्यासाठी स्वतः हून मुलाला गोळी मारते. अशा आईची भूमिका रीमा यांनी अतिशय प्रभावीपणे साकारली होती.

यांसोबतच त्यांनी ‘आक्रोश’, ‘कलयुग’, ‘रिहाई’, ‘कयामत से कयामत तक’, ‘कल हो ना हो’ यांसारख्या कित्येक सुपरहिट चित्रपटांमध्ये दमदार भूमिका निभावल्या. त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिका प्रचंड गाजल्या. अत्यंत ग्लॅमरस आई म्हणून त्यांनी लोकप्रियता मिळवली. त्यांना मिळालेल्या आईच्या प्रत्येक भूमिकेत त्यांनी वैविध्य जपले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खूपच बदललीय ‘लगान’ सिनेमातील ग्रेसी सिंग; २० वर्षांनंतर अशी दिसतेय आमिर खानची अभिनेत्री

-‘बंगाली ब्युटी’ मौनी रॉयने केले बेडरूममधील फोटो शेअर; कातिलाना अंदाजाने चाहते घायाळ

-‘पितृदिना’निमित्त अभिनेता आयुषमान खुरानाची भावुक पोस्ट; आपल्या नावाशी संबंधित सिक्रेटचाही केला खुलासा

हे देखील वाचा