जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात अनेक धमाल चित्रपट रिलीज झाले. त्यातीलच एक म्हणजे बहुचर्चित, बहुप्रतिक्षित ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ३ जून रोजी थेटरमध्ये रिलीज झाला. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), संजय दत्त (Sanjay Dutt), सोनू सूद (Sonu Sood), मानव वीज, मानुषी छिल्लर (Manushi chhillar) अशी मोठी स्टारकास्ट आहे. तसेच डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी यांचे दिग्दर्शन लाभले असून यश राज फिल्मच्या बॅनरखाली हा चित्रपट बनलाय. काय आहे चित्रपटाची कथा चला जाणून घेऊ.
‘पृथ्वीराज रासो’ या महाकाव्यावर आधारीत ३०० कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट आहे. सम्राट पृथ्वीराज चौहान हे अखेरचे हिंदू शासक होते, तसेच त्यांना भारतीत शूर राजे महारांजांपैकी एक मानले जाते. त्यामुळे त्यांच्या शौर्यगाथेवरील चित्रपट येणार म्हणल्यावर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. चित्रपटाचा सेट, कलाकारांचे पोषाख पाहून हा बिगबजेट चित्रपट असल्याची खात्री पटते. अखेरचे हिंदू सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या काळातील मोठ्या महलांचे सेटही आकर्षक आहेत. दिल्लीतील सेट लाल रंगात, राजस्थानचे पिवळ्या रंगात अशा काही बारीक सारीक गोष्टीही मन जिंकून घेतात. तसेच युद्धावेळी वापरण्यात आलेले सेटही तुम्हाला त्या काळात घेऊन जातात. तसेच त्याकाळाप्रमाणे कलाकारांनी परिधान केलेले पोषखही भावतात.
चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाल्यास सम्राट पृथ्वीराज यांचे शासन, जनतेप्रतीचे प्रेम, स्त्रीयांबद्दलचा आदर, आपल्या जबाबदारीबद्दल असलेली आस्था चांगल्याप्रकारे मांडण्यात आली आहे. इतकंच नाही तर चित्रपटातील ऍक्शन सीनही रोमांचक आहेत. हर हर महादेवचे नारे ऐकताना अंगावर काटे उभे राहातात. चित्रपटात तराईनची दोन युद्ध दाखवण्यात आली आहेत. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे युद्धावेळी किंवा कोणत्याही महत्त्वाच्या घटना दाखवताना अतिरंजितपणा टाळण्यात आला आहे. त्यामुळे चित्रपट मुळ कथेला धरून पुढे जातो. कथेमध्ये पृथ्वीराज आणि संयोगिता यांच्यातील प्रेमप्रसंगही मन मोहित करतात. संयोगिताचे महत्त्वही या चित्रपटातून कळून येते. चित्रपटाच्या अखेरीस चंदबरदाईचा दोहा आणि प्रसंग प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवतो आणि त्याचबरोबर डोळ्यांत पाणीही आणतो. असे असले तरी फार लांबलचक न खेचता २ तास १५ मिनिटे हा चित्रपट प्रेक्षकांचे शेवटपर्यंत मनोरंजन करतो हे नक्कीच.
अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराजाच्या भूमिकेत आहे. पण, ही भूमिका निभावताना अक्षय कुठेतरी निराश करतो असे वाटते. शूर राजाची भूमिका निभावताना त्याच्या भाषेतील रुबाब आणि देहबोली कुठेतरी मार खाते असं वाटतं. बाकी त्याने ऍक्शन सिनमध्ये मनं जिंकली आहेत. त्यातुलनेत नक्कीच संजय दत्त काका कान्हा यांच्या भूमिकेत आणि सोनू सुद चंदबरदाईच्या भूमिकेत भाव खाऊन जातात. मनुषी छिल्लरने या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने कन्नौजची राजकुमारी ते सम्राट पृथ्वीराज यांची पत्नी संयोगिताची भूमिकेत आपली छाप पाडली आहे असे म्हणता येईल.
याशिवाय मोहम्मद घोरीच्या भूमिकेत मानव वीज शानदार राहिला आहे. त्याने युद्धावेळीचे, युद्ध हरल्यानंतरचे आणि पुन्हा बदला घेतल्यानंतरचे भाव चांगल्यारितीने साकारले आहेत. त्याबरोबर आशितोष राणाने कन्नौजचे महाराज जयचंद्र यांच्या भूमिकेत छाप पाडली आहे. साक्षी तन्वरने कन्नौजची महाराणीची भूमिका निभावली आहे. छोट्याशा भूमिकेतही ती लक्षात राहाते. तसेच इतर कास्टनेही त्यांच्या अभिनयाने नाराज केलेले नाही. त्याचमुळे चित्रपट शेवटपर्यंत काहीतरी घडत असल्याने बोअर होत नाही. चित्रपटाचे संगीतही उत्तम जमले आहे. चित्रपटातील कथेला अनुसरुन आलेली गाणी कुठेही उगीचीच मजा घालवत नाहीत. अखेरीस योद्धा गाणं संयोगिता आणि इतर स्त्रींयांनी दाखवलेल्या शुरतेचे वर्णन करते. तर बॅकग्राऊंड संगीतही प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत असल्याचे जाणवते.
चित्रपटात एकूण ५ गाणी असून चार गाणी शंकर अहसान लॉय यांनी संगीतबद्ध केली आहेत. तसेच वरूण ग्रोव्हरचे शब्द आहेत, तर आदर्श शिंदे, निती मोहन, अरजीत सिंग, श्रेया घोषाल, सुनीधी चौहान यांसारख्या गायकांच्या आवाजात गाणी रेकॉर्ड झाली आहेत. एकूणच ट्रेलरने जेवढे चाहत्यांना निराश केलेले तेवढा चित्रपट करत नाही हे नक्की, त्यामुळे एकदातरी भारतातील एका शुर राजाची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट पाहायलाच हवा.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा