Friday, December 8, 2023

‘लता मंगेशकर’ नावामुळेच शक्ती कपूरांच्या वडिलांनी त्यांना ‘या’ चुकीसाठी केले होते माफ, रंजक आहे किस्सा

भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले होते. त्यांच्या दुःखद निधनानंतर आतापर्यंत आपण त्यांच्या बद्दल अनेक गोष्टी ऐकल्या, पहिल्या, वाचल्या. मात्र अजूनही त्यांच्या आठवणी, किस्से संपायचे नाव घेत नाही. आभाळालाही लाजवेल एवढे मोठे आणि महान कर्तृत्व लता दीदींनी केले. दीदी कायमच त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून आपल्या सोबत आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांसोबत असतील. लताजींना सहवास लाभलेले, त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांच्याशी या ना त्या कारणाने संबंध आलेले अनेक दिग्गजांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना आदरांजली वाहिली होती. लता मंगेशकर यांचे जावई असलेल्या शक्ती कपूर यांनी देखील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी लता दीदींमुळे त्यांचे लग्न टिकल्याचे आणि वडिलांनी माफ केल्याचे सांगितले. रविवारी (दि. 03 सप्टेंबर) शक्ती कपूर 71वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने आपण हा किस्सा जाणून घेऊयात…

शक्ती कपूर (Shakti Kapoor) यांनी शिवांगी कोल्हापूरे (Shivangi Kolhapure) यांच्याशी 1982मध्ये लग्न केले. मात्र, त्यांच्या वडिलांना हे लग्न मान्य नव्हते. म्हणून शक्ती कपूर आणि शिवांगी यांनी पळून जात लग्न केले. या लग्नामुळे शक्ती कपूर यांचे वडील सिकंदरलाल कपूर खूपच नाराज झाले. शक्ती कपूर यांनी सांगितले की, “माझे वडील माझ्यासोबत बोलत नव्हते. माझ्या आईने मोठ्या मुश्किलीने त्यांना एकदा मला आणि माझ्या पत्नीला भेटण्यासाठी तयार केले. जेव्हा त्यांनी माझ्यापेक्षा 10/12 वर्षांनी लहान असलेल्या शिवांगीला पहिले, तर ते म्हणाले खूपच गोड मुलगी आहे. त्यानंतर शिवांगीने काही ओळी गायल्या. तेव्हा ते म्हणाले, ही तर खूपच सुंदर गाते. तेव्हा मी म्हणालो, ही लता मंगेशकर यांच्या परिवाराशी संबंधित आहे. त्यावर ते म्हणाले, तुझ्या सर्व चुका माफ कारण तू खूपच मोठ्या कुटुंबात लग्न केले. त्यानंतर त्यांनी शिवांगीला लताजींच्या काही ओळी गाण्यास सांगितले. शिवांगीने गाणे गायल्यावर ते खूपच भावनिक झाले होते.”

पुढे शक्ती कपूर म्हणाले, “मी नेहमीच माझ्या पत्नीला म्हणतो की, तुमच्या कुटुंबात कोणी मदर इंडिया आहे, तर त्या फक्त लताजी. एवढ्या कमी वयात त्यांनी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली. खूप कमी वयात त्यांनी भरपूर संघर्ष केला. मी एक क्रिकेटर होतो, मला वाटले की, त्या शतक बनवतील मात्र 8 रन कमी पडले. त्यांनी माझ्या मुलाला सिद्धांतला एका अशा पातळीवर नेले होते, जिथे तो राष्ट्रीय खेळाडू बनू शकेल, पण त्याने अभिनेता होण्याचे ठरवले. माझी मुलगी श्रद्धा यासाठी चांगले गाते की, तिच्यामध्ये मंगेशकर कुटुंबाचे जीन्स आहेत. माझा मुलगा देखील गातो आणि शिवांगी देखील खूपच सुंदर गाते.”

शिवांगी कोल्हापुरी आणि पद्मिनी कोल्हापुरे या दोघी बहिणी लता मगेशकर यांच्या भाच्या आहेत. शिवांगी आणि पद्मिनी यांचे वडील पंडित पंढरीनाथ कोल्हापुरे हे लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांचे भाचे होते. त्याअर्थाने शक्ती कपूर हे लता मंगेशकर यांचे जावई आहेत.

हेही वाचा-
फिरोज खानच्या गाडीला टक्कर मारून ‘विलन’ बनले शक्ती कपूर; काय आहे अभिनेत्याचं खरं नाव?
‘या’ भुमिकांमुळे केले होते प्रेक्षकांच्या मनावर राज्य! आजही विवेक ओबेरॉयच्या होतात चर्चा

हे देखील वाचा