Saturday, July 27, 2024

पुन्हा एकदा अभिनेता शंतनू मोघे साकारणार महाराजांची भूमिका, ‘या’ सिनेमातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. शिवाजी महाराजांचे अफाट कर्तृत्व आणि त्यांची महानता सर्वांनाच ठाऊक आहे. त्यांच्या अनेक गाजलेल्या आणि इतिहासात सुवर्णाक्षरात कोरलेल्या घटना चित्रपटांच्या रूपाने मोठ्या पडद्यावर उतरवण्यात आल्या. आजतागायत अनेक सिनेमांच्या माध्यमातून शिवाजी महाराजांबद्दल आणि त्यांनी स्वराज्यासाठी, मराठी मांसासाठी, हिंदुत्वासाठी केलेल्या अजोड कामाची माहिती लोकांना करून देण्यात आली. आता पुन्हा एकदा शिवाजी महारांजावर आधारित एक नवीन सिनेमा येऊ घातला आहे. या सिनेमाचे नाव आहे, ‘रावरंभा’.

रावरंभा या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता शंतनू मोघे साकारणार आहे. ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेत शंतनूने साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेचे तुफान कौतुक झाले. अक्षरशः खुद्द महाराजच असल्याचा भाग त्याला मालिकेत पाहून यायचा. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना त्याला महाराजांच्या भूमिकेत पाहायची संधी मिळणार आहे. सिनेमातील त्यांचा पहिला लुक समोर आला आहे. रावरंभा या सिनेमाची मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे. याआधी मराठी हिंदी मधील अनेक कलाकारांनी महाराजांची भूमिका उत्तम पद्धतीने रेखाटली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PriSha✨ (@priya_shantanu_fanclub)

शंतनूने या सिनेमाबद्दल आणि त्याच्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले, “मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठ्या पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद आहे. ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.”

‘रावरंभा’ हा भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपट येत्या ७ एप्रिल २०२३ ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘रावरंभा’ सिनेमातून महाराजांची कोणती मोहीम पाहायला मिळणार याबाबत अजून कोणतीच माहिती समोर आलेली नाही. याशिवाय सिनेमात कोणते कलाकार असणार हे देखील गुपित राखण्यात आले आहे. साताऱ्यामधील हा पहिला ऐतिहासिक चित्रपट असणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘सैराट’ चित्रपटानंतर सर्वात जास्त कमाई करणारा ‘वेड’ ठरला दुसरा मराठी चित्रपट

‘ट्रोल करणारी आर्मी मुद्दामच आहे’ म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केले बॉयकॉट ट्रेंडवर त्यांचे मत

हे देखील वाचा